श्रीमती शुभांगी गुहागरकर यांच्या मुलीला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

‘रामनाथी आश्रमातील सौ. मनाली भाटकर यांना त्यांची आई श्रीमती शुभांगी सुरेश गुहागरकर (वय ७५ वर्षे) यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

श्रीमती शुभांगी गुहागरकर
‘६० टक्के आणि त्यापुढील पातळी साध्य झालेल्या साधकांच्या गुणवैशिष्ट्यांचे लिखाण केवळ न वाचता ‘त्यात दिलेली गुणवैशिष्ट्ये स्वतःत आहेत का ?’, याचा अभ्यास करावा आणि स्वतःमध्ये नसतील, ती गुणवैशिष्ट्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. असे केले, तरच गुणवैशिष्ट्ये छापण्याचे सार्थक होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
सौ. मनाली भाटकर

१. देवावरील श्रद्धेमुळे घरात येणार्‍या अडचणी आणि कठीण प्रसंग यांना धिराने तोंड देणे

‘माझ्या आईने (श्रीमती शुभांगी गुहागरकर) घरात येणार्‍या अडचणी आणि कठीण प्रसंग यांना देवावरील श्रद्धेमुळे धिराने तोंड दिले. तिने प्रारब्धभोग आनंदाने स्वीकारले. ती म्हणते, ‘‘देवामुळेच मी आयुष्यातील कठीण प्रसंगांना तोंड देऊ शकले. देवानेच मला ते सहन करण्याची शक्ती दिली.’’ आईचे लग्न झाले, तेव्हा घरात तिचे सासरे (कै. गोविंद गणपत गुहागरकर) सासू (कै. सुनंदा गोविंद गुहागरकर) आणि ३ लहान नणंदा (कै. ज्योती जयदेव मयेकर, श्रीमती प्रणाली द्विजेंद्र करंगुटकर आणि कै. सुगंधा देवेंद्र भाटकर) होत्या. त्या वेळी त्यांचे शिक्षण व्हायचे होते. घरची आर्थिक स्थिती बेताची असल्याने आईने चाकरी करण्याचा निर्णय घेतला. माझा जन्म झाल्यानंतर माझ्या बारश्याच्या दिवशी तिला प्राथमिक शिक्षिकेच्या चाकरीसाठी बोलावणे आले. त्या स्थितीत तिने मला आजीकडे ठेवले आणि ती चाकरीवर रुजू झाली. त्या वेळी तिने ‘स्वतःच्या प्रकृतीचा किंवा एवढ्या लहान बाळाला ठेवून चाकरीसाठी कसे जाऊ ?’, असा विचार न करता कुटुंबाचा विचार केला आणि कुटुंबाला आर्थिक साहाय्य केले.

२. चाकरीसाठी दूरवर चालत येणे-जाणे हसत स्वीकारणे

तिला मिळालेली शाळा दूर होती. प्रतिदिन ५ – ६ कि.मी. अंतर चालत जाऊन-येऊन करावे लागत असे; पण तिने ते हसत स्वीकारले. त्यानंतर आईचे केळशी (तालुका दापोली) येथे स्थानांतर (बदली) झाले. त्यामुळे सुटीत आंजर्ल्याला घरी येणे आणि परत केळशीला जाणे यासाठी प्रत्येक वेळी १० – १२ कि.मी. चालावे लागत असे. ती आम्हालाही तिच्या समवेत चालत घेऊन जायची; कारण त्या वेळी गाडीची सुविधा नव्हती.

३. ‘पतीचे निधन आणि मुलाचा गंभीर आजार’, अशा कठीण प्रसंगात खचून न जाता स्थिर राहून परिस्थितीला सामोरे जाणे

९.७.२०१७ या दिवशी माझ्या वडिलांचे (कै. सुरेश गोविंद गुहागरकर यांचे, ६१ टक्के आध्यात्मिक पातळी) निधन झाले. त्यानंतर दीड वर्षाने माझ्या पाठच्या भावाला (श्री. मिलिंद सुरेश गुहागरकर) अर्धांगवायूचा झटका आला. त्याची उजवी बाजू लुळी पडली. त्या वेळीही तिने खचून न जाता देवावर श्रद्धा ठेवली आणि त्या कठीण प्रसंगाला सामोरी गेली. ‘हे देवाच्या कृपेमुळेच झाले’, अशी तिची ठाम श्रद्धा आहे. एक-दीड मासात भावाला चालता येऊ लागले; परंतु दोन वर्षे झाली, तरी अजून त्याला बोलता येत नाही. त्याही स्थितीत आई स्थिर असायची.

४. प्रेमळ

अ. आई अतिशय प्रेमळ असून ती घरातील, नातेवाईक, शेजारी आणि गावातील माणसे यांच्याशी प्रेमाने बोलते. त्यांच्या अडी-अडचणीला त्यांना साहाय्य करते. गावातील लोकांना तिच्याविषयी विश्वास आणि आदर आहे.

आ. घरी आलेल्या कुणालाही ती काहीतरी खायला देऊनच पाठवते. सगळ्यांना आग्रहाने खायला करून देणे, तसेच ‘अडलेल्यांना साहाय्य करणे’, हा तिचा मूलभूत स्वभावगुण आहे.

इ. आमच्या घरी काम करायला मुली होत्या. त्यांच्यावर ती स्वतःच्या मुलीप्रमाणे प्रेम करायची. (त्या आजारी पडल्या की, त्यांना वैद्यांकडे नेऊन त्यांची काळजी घेत असे. एका घरकाम (गृहकृत्य साहाय्यक) करणार्‍या मुलीला शिवणवर्गाला (शिवण कसे शिवायचे यासाठी घेतलेला वर्ग) स्वतःचे पैसे देवून पाठवले आणि तिला स्वतःच्या पायावर उभे केले. त्या मुलींची लग्न झाल्यावरही त्या आईकडे माहेरपणासाठी येतात.

५. इतरांचा विचार करणे

आई स्वतःपेक्षा इतरांचा विचार अधिक करते. स्वतःला काही नसले, तरी चालेल; पण ‘इतरांना कसे मिळेल’, असे तिला वाटते. पूर्वी आमची आर्थिक स्थिती ठीक नसतांना ती घरातील सर्वांना कपडे आणायची; मात्र स्वतःला काहीच घ्यायची नाही.

६. शिस्त

तिला चुकीचे वागलेले आणि खोटे बोललेले मुळीच आवडत नाही. सगळ्या गोष्टी ठरलेल्या वेळेत होण्याकडे तिचा कटाक्ष असतो, उदा. सकाळी वेळेत उठणे, न्याहारी, जेवण आणि झोपणे या कृती वेळेवर करणे.

७. मुलांची काळजी न करता त्यांना देवावर सोपवणे

पूर्वी आईला मुलांची अधिक काळजी वाटायची; पण आता तिने मुलांना देवावर सोपवले आहे. आपल्याला जेवढे करता येईल, तेवढे करत रहायचे. ‘देवाला जसे अपेक्षित आहे, तसे होईल’, असे तिला वाटते.

८. लहान वयातच मुलांवर देवभक्तीचे संस्कार करणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्याविषयी कौतुक करणे

आम्हा तीनही भावंडांवर, तसेच माझ्या दोन्ही भावांच्या मुलांवरही तिने लहान वयातच देवभक्तीचे संस्कार केले. एकदा आई रामनाथी आश्रमात आली होती. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘तुम्ही मुलांवर चांगले संस्कार केलेत’, असे म्हणून तिचे कौतुक केले.

९. उत्साही आणि शिकण्याची आवड असणे

आई नेहमी उत्साही असते. तसेच नेहमी सकारात्मक विचार करते. या वयातही तिला प्रत्येक गोष्ट शिकण्याची आवड आहे.

१०. धार्मिकतेची आवड असणे

आई प्रतिदिन नामजप करणे, देवळात जाणे, स्वामी समर्थांची पोथी वाचणे, गुरुचरित्राचे पारायण करणे हे नित्यनेमाने करते. घरात कितीही अडचण असली, तरी ती श्री विठ्ठलाच्या मंदिरात जात असे. प्रत्येक सोमवारी ‘शिवस्तुती’ आणि गुरुवारी ‘दत्तस्तुती’ घरातील सर्वजण एकत्र बसून म्हणतात. हे अनुमाने ४० वर्षे चालू आहे. आई पूर्वी प्राथमिक शिक्षिका म्हणून चाकरी करायची. तेव्हाही ती चाकरी आणि घरातील कामे करून प.पू. गजानन महाराज यांची पोथीवाचन अन् नामजप करायची.

११. पूर्वीपेक्षा ती शांत झाली असून तिचे अनावश्यक बोलणेही अल्प झाले आहे. तिच्यातील प्रेमभावही वाढला आहे. ‘तिचा आध्यात्मिक स्तर वाढला आहे’, असे वाटते.

‘परात्पर गुरुदेव, आईविषयीचे लिखाण लिहिण्याची तुम्हीच प्रेरणा दिलीत आणि माझ्याकडून लिहून घेतलेत. तसेच अशी आई तुम्ही मला दिलीत, त्याविषयी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सौ. मनाली भाटकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.  (२९.७.२०२१)