मास्टर दीनानाथ मंगेशकर शासकीय संगीत विद्यापिठाला मुंबई विद्यापिठाच्या परिसरात जागा देण्याच्या प्रस्तावावर कुलगुरु राजकारण करत असल्याचा युवा सेनेचा आरोप

  • राज्यपाल आणि सरकार यांच्यातील कुरघोडीचे पडसाद उमटले मुंबई विद्यापिठाच्या अधिसभेत
  • युवासेनेच्या सदस्यांनी अधिसभेत केले ठिय्या आंदोलन
मुंबई विद्यापिठाच्या अधिसभेत आंदोलन करतांना युवा सेनेचे सदस्य

मुंबई, १० ऑक्टोबर (वार्ता.) – मुंबई विद्यापिठाच्या ‘कलिना कॅम्पस’मध्ये मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने विद्यापीठ चालू करण्यासाठी राज्यशासनाकडून पाठवण्यात आलेल्या प्रस्तावावर ७ मास होऊनही विद्यापिठाकडून निर्णय घेण्यात आलेला नाही. या प्रकरणी कुलगुरु प्रा. सुहास पेडणेकर राजकारण करत असल्याचा आरोप युवा सेनेच्या सदस्यांनी ८ ऑक्टोबर या दिवशी मुंबई विद्यापिठाच्या अधिसभेत केला. युवा सेनेचे सदस्य प्रदीप सावंत यांनी या विषयाचा स्थगन प्रस्ताव अधिसभेत सादर केला. या एकाच विषयावर ३ घट्यांहून अधिक काळ चर्चा झाली. या वेळी युवा सेनेच्या सदस्यांनी अधिसभेतच ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे अधिसभा १५ मिनिटांसाठी स्थगित करण्यात आली.

मास्टर दीनानाथ मंगेशकर शासकीय संगीत विद्यापिठासाठी लागणारा सर्व व्यय मंगेशकर कुटुंबियांकडून करण्यात येणार आहे. मार्च २०२१ मध्ये शासनाकडून आलेला हा प्रस्ताव निर्णयासाठी विद्यापिठाने भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवला आहे. यावर युवा सेनेच्या सदस्यांनी अधिसभेत आक्रमक पवित्र घेतला. ‘विद्यापिठाला निर्णय घेण्याचा अधिकार असतांना हा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवून निर्णय घेण्यात जाणीवपूर्वक दिरंगाई करण्यात येत आहे’, असा आरोप युवा सेनेच्या सदस्यांनी केला. मनसेचे सदस्य सुधाकर तांबोळे यांनी ‘विद्यापिठाकडे अनेक प्रस्ताव आले आहेत; मात्र जागेची मर्यादा आहे. शासनाचा प्रस्ताव चांगला आहे; मात्र त्यासाठी विद्यापिठाचीच जागा का हवी आहे ? शासनाकडे अन्य जागा असतांना त्या ठिकाणी हे विद्यापीठ उभारावे’, अशी भूमिका मांडली.

मुंबई विद्यापिठाच्या कलिना कॅम्पस येथे मास्टर दीनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय उभारण्याचा प्रस्ताव राज्यशासन आणि कुलपती यांच्याकडे कार्यवाहीसाठी पाठवण्याची घोषणा कुलगुरु प्रा. सुहास पेडणेकर यांनी केली. त्यानंतर युवासेनेच्या सदस्यांनी अधिसभेत केलेले ठिय्या आंदोलन मागे घेतले.

शासन आणि राज्यपाल यांच्या वादात विद्यापिठाचा बळी जावू नये ! – प्रदीप सावंत, सदस्य, युवा सेना

शासन आणि राज्यपाल यांच्यातील संघर्षाला विद्यापिठाने बळी पडू नये. मुंबई विद्यापिठाच्या परिसरात संगीत विद्यापीठ झाल्यास विद्यार्थ्यांना संगीतक्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन लाभेल. याचा संपूर्ण भार राज्यशासन उचलण्यास सिद्ध असतांना विद्यापिठाला जागा देण्यात काय अडचण आहे. हे विद्यापीठ झाल्यास मुंबई विद्यापिठाचाच नावलौकिक होईल. कुलगुरु मंगेशकर कुटुंबियांचा आदर करत असल्याचे म्हणत आहेत, तर या प्रस्तावावर अद्याप उत्तरही का देण्यात आलेले नाही. या प्रकरणी विद्यापीठ शासनाशी संवाद का साधत नाही ? कुलगुरु यामध्ये राजकारण करत आहेत, असा आमचा ठाम आरोप आहे.

शासनाची जागा असूनही विद्यापिठाकडे मागावी लागते, हे दुर्दैव ! – वैशाली रोडे, शासननियुक्त प्रतिनिधी

विद्यापिठाच्या जागेत झोपडपट्टी पुनर्वसनाचे अतिक्रमण करण्यात आले आहे, याविषयी विद्यापिठाने राज्यपालांना कळवले आहे का ? आतापर्यंत विद्यापिठाकडून अन्य कारणास्तव जागा देण्यात आल्या आहेत, त्यासाठी राज्यपालांची अनुमती घेण्यात आली होती का ? विद्यापिठाची जागा ही शासनाची आहे, असे असतांना आम्ही सौजन्याने मागत आहोत. शासनाची जागा असूनही विद्यापिठाकडे जागा मागावी लागते, हे दुदैव आहे.

या प्रकरणी मी मुख्यमंत्र्यांची भेट मागितली आहे ! – प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरु, मुंबई विद्यापीठ

याविषयी शासनाकडून कोणतेही अधिकृत पत्र आलेले नाही. मंत्रीमंडळामध्ये झालेल्या विषयांचे केवळ इतिवृत्तांत शासनाकडून विद्यापिठाकडे पाठवण्यात आले आहे. विद्यापिठाची ८ एकर जागा मुंबई विकास प्राधिकरणाला देण्यात आली आहे. विद्यापिठाच्या २४३ एकर जागेवर ६७ इमारती आहेत. येत्या २-३ वर्षांत आणखीही काही प्रस्ताव आहेत. याविषयी आराखडा निश्चित करण्याचे काम चालू आहे. सद्य:स्थितीत विद्यापिठाकडे एकाच ठिकाणची अधिकतम जागा २.५ एकर आहे. संगीत विद्यापिठाविषयी मी स्वत: राज्यपालांची भेट घेतली आहे. ही विकासप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यापिठाकडे जागेसाठी आलेल्या प्रस्तावांचा विचार करण्यात येईल, असे राज्यपालांनी कळवले आहे. विद्यापिठाने मास्टर दीनानाथ मंगेशकर शासकीय संगीत विद्यापिठाचा प्रस्ताव फेटाळलेला नाही. विद्यापिठाची जागा देण्याचा अधिकार कुलगुरूंचा नाही, त्यामुळे हा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवण्यात आला आहे. याविषयात मुख्यमंत्र्यांचेही सहकार्य लागेल. त्यांची भेट मी मागितली आहे.