त्रेतायुगात प्रभु श्रीरामाने रावणासुराच्या संहारासाठी केलेले नवरात्रीचे व्रत !

१. नारदमुनींनी प्रभु श्रीरामाला ‘रावणासुराच्या वधासाठी आदिशक्तीला प्रसन्न करून घे’, असे सुचवून आदिशक्तीचा महिमा वर्णन करून नवरात्रीचे व्रत सांगणे

‘रावणाने सीताहरण केल्यावर सीतेच्या शोधासाठी अरण्यात फिरत असतांना श्रीराम आणि लक्ष्मण यांच्यासमोर नारदमुनी येतात. नारदमुनी श्रीरामाला रावणासुराच्या वधासाठी आदिशक्तीला प्रसन्न करून घेण्यासाठी ‘नवरात्रीचे व्रत’ करण्याविषयी सुचवतात. श्रीराम लगेच नारदमुनींना होकार देतात आणि या व्रताविषयी माहिती सांगायला सांगतात. तेव्हा नारदमुनी श्रीरामाला म्हणतात, ‘‘हे श्रीमन्नारायणस्वरूप श्रीराम, या आधी श्रीविष्णूने मधू-कैटभ या असुरांचा वध करण्यासाठी सुमेरू पर्वतावर नवरात्रीचे व्रत केले होते. वृत्रासुराच्या वधासाठी शिवाने नवरात्रीचे व्रत केले होते. (देवी भागवत) ब्रह्मदेव अन् इंद्रदेव या देवांनी आणि भृगु, वसिष्ठ, कश्यप, विश्वामित्र आदी ऋषींनीही देवीचे नवरात्रीचे व्रत केले आहे; म्हणून हे श्रीरामा, रावणासुराच्या वधासाठी तू हे नवरात्रीचे व्रत करावेस.’’

श्रीराम विचारतो, ‘‘हे नारदमुनी, जिच्या कृपेने रावणाचा वध होऊ शकतो, अशी देवी कोणती आहे ? त्या देवीविषयी मला सांगा.’’ नारदमुनी श्रीरामाला सांगतात, ‘‘श्रीरामा, ती आदिशक्ति आहे. संपूर्ण सृष्टीची निर्मिती तिच्यापासून झाली आहे आणि तिच्याविना ही सृष्टी चालूच शकत नाही. खरेतर त्या शक्तीविना कुणी हलूही शकत नाही. सृष्टीची निर्मिती करणार्‍या ब्रह्मदेवाची ती निर्मितीशक्ति आहे, पालनकर्त्या श्रीविष्णूची ती पालकशक्ति आहे आणि लयकर्त्या शंकराची ती लयकारी शक्ति आहे. आदिशक्तीची अनंत नावे आहेत. त्या नावांचा महिमा सांगायला मी असमर्थ आहे.’’

२. प्रभु श्रीराम नवरात्रीचे व्रत भावपूर्ण आचरत असतांना अष्टमीला आदिशक्तीने दर्शन देऊन ‘पुढील नवरात्रीत तुझे रावणासुराशी युद्ध चालू असतांना मी तुझ्या बाणात प्रवेश करीन आणि दशमीला रावणाचा वध होईल’, असे सांगणे

नारदमुनींनी श्रीरामाला ‘नवरात्रीचे व्रत कसे करावे ?’ याविषयी सांगितले. त्यानंतर १ – २ दिवसांनीच आश्विन मासाला आरंभ होणार असल्यामुळे नारदमुनी श्रीरामाच्या समवेत राहून नवरात्रीचे व्रत करायचे ठरवतात. श्रीराम अत्यंत भावभक्तीने आदिशक्तीचे ‘नवरात्रीचे व्रत’ करतात. अष्टमी तिथीच्या मध्यरात्री आदिशक्ति सिंहावर बसून श्रीराम आणि लक्ष्मण यांना दर्शन देते. त्या वेळी देवी श्रीरामाला म्हणाली, ‘हे श्रीरामा, तू भगवान नारायणाचा अंश आहेस. रावणाच्या वधासाठी देव-देवतांनी तुला प्रार्थना केल्यावर तू हा अवतार धारण केला आहेस. हे श्रीरामा, तुझ्या मनात असल्याप्रमाणे रावणासुराचा वध होईल. तुझ्या सेवेसाठी देवता वानर रूपात आल्या आहेत. प्रत्येक वानरामध्ये माझी शक्ती अंतर्भूत आहे. लक्ष्मण शेषनागाचा अवतार आहे आणि त्याच्याकडून रावणपुत्र मेघनादाचा संहार होईल. पुढच्या वर्षी नवरात्रीच्या वेळी रावणाशी युद्ध चालू असतांना नवमीला मी तुझ्या बाणामध्ये प्रवेश करीन आणि दशमीला तुझ्याकडून रावणासुराचा संहार होईल. त्यानंतर १० सहस्र वर्षे तू पृथ्वीवर राज्य करशील आणि नंतर परत वैकुंठाला जाशील.’

देवीचे हे शब्द ऐकून श्रीरामाला अत्यंत आनंद होतो. पुढे देवीने सांगितल्याप्रमाणेच सर्व घडते.

– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), जयपूर, राजस्थान (१६.९.२०२१)