कोपर्डी येथे बलात्कार करून मुलीची हत्या केल्याचे प्रकरण
नाशिक – कोपर्डी (तालुका कर्जत, जिल्हा नगर) बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘नॉट बीफोर मी’ (खटल्यात स्वतः सुनावणी करण्यास नकार देणे) हा शेरा देत नकार दिला. त्यामुळे ४ ऑक्टोबर या दिवशी ही सुनावणी स्थगित करण्यात आली असून खटला दुसर्या न्यायमूर्तींकडे वर्ग केल्यानंतर प्रत्यक्ष सुनावणीला प्रारंभ होणार आहे.
१. १३ जुलै २०१६ या दिवशी कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराने राज्यभर संतापाची लाट निर्माण झाली. घटनेचे गांभीर्य पाहून या खटल्याचे वेगाने अन्वेषण करण्यात आले आणि खटलाही चालवण्यास घेण्यात आला.
२. त्यानुसार जितेंद्र शिंदे उपाख्य पप्पू, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या ३ आरोपींना २२ नोव्हेंबर २०१७ या दिवशी नगर सत्र न्यायालयाने मुलीवरील बलात्कार आणि हत्येचा गुन्हा यांसाठी फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यावर आरोपींकडून मुंबई उच्च न्यायालयात अपील प्रविष्ट करण्यात आले होते.
३. न्यायमूर्ती रणजित मोरे यांच्यापुढे खटल्याची सुनावणी चालू होती; मात्र ‘दळणवळण बंदी’च्या काळात न्यायालयाचे कामकाज थंडावले होते. त्यानंतर न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपिठासमोर ४ ऑक्टोबर या दिवशी याचे कामकाज चालू होणार होते.
लवकरच पुन्हा सुनावणीस प्रारंभ होईल !
‘हे प्रकरण आता दुसर्या न्यायमूर्तींच्या खंडपिठाकडे वर्ग करण्यात येईल आणि खटल्याची नियमित सुनावणी होण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयातील सुनावणी दृष्टीक्षेपात असल्याने पीडित मुलीच्या पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.’ – उमेशचंद्र यादव, विशेष सरकारी अधिवक्ता