कोलकात्यामध्ये प्रथमच श्री दुर्गादेवीची सार्वजनिक ठिकाणी करण्यात येणारी पूजा महिला पुजारी करणार !

स्त्रियांनी पूजा करणे जरी धर्मशास्त्रसुसंगत असले, तरी वेदोक्त मंत्रांचा उच्चार करण्यावर स्त्रियांना बंधने आहेत. स्त्रियांची जननेंद्रिये ही शरिराच्या आत असल्याने मंत्रोच्चाराने निर्माण होणार्‍या शक्तीमुळे त्यावर परिणाम होऊ शकतो. यामुळे धर्माशास्त्रात असे सांगितले आहे; मात्र बेगडी स्त्रीमुक्तीवादापायी आणि धर्मशास्त्राविषयी घोर अज्ञान यांमुळे ‘महिला पुजार्‍यांची नेमणूक’ यांसारखे प्रकार पुढे येत आहेत ! – संपादक

(डावीकडून) पॉलोमी चक्रवर्ती, सेमांती बनर्जी, डॉ. नंदिनी भौमिक आणि रूमा रॉय

कोलकाता (बंगाल) – यंदा बंगालमध्ये श्री दुर्गादेवीची सार्वजनिक ठिकाणी करण्यात येणारी पूजा प्रथमच ४ महिला पुजारी करणार आहेत. इतिहासात प्रथमच अशी घटना घडत आहे. शहरातील ‘साऊथ कोलकाता क्लब’ने हा निर्णय घेतला आहे.

१. याविषयी पूजा समितीचे प्रद्युम्न् मुखर्जी यांनी सांगितले की, खुंटी पूजेपासून (मंडप बनवण्याची प्रारंभीची पूजा) विजयादशमीपर्यंतची पूजा एखाद्या महिला पुजार्‍याने यापूर्वी कधीही केलेली नाही; पण आमच्या क्लबमध्ये ४ महिला पुजार्‍यांचे हे पथक पूजा करून नवी परंपरेला प्रारंभ करील. पूजा करण्याची त्यांची स्वतंत्र शैली आहे. (या महिलांच्या पूजेच्या स्वतंत्र शैलीसंदर्भात त्यांनी बंगालशी संलग्न असलेल्या पुरी पिठाच्या शंकराचार्यांचे मार्गदर्शन घेतले आहे का ? धर्मशास्त्राधारित पूजा केल्यानेच यजमान आणि पुरोहित यांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो, हे लक्षात घ्या ! – संपादक)  डॉ. नंदिनी भौमिक, रूमा रॉय, सेमांती बॅनर्जी आणि पॉलोमी चक्रवर्ती या महिला ही पूजा करणार आहेत. त्या गेल्या एक दशकापासून शहरात विवाह, गृहप्रवेश अशा महत्त्वाच्या समारंभात पुरोहित म्हणून काम करत आहेत; पण पुजारी म्हणून त्या प्रथमच मूर्तीपूजा करतील. ‘लोक हा पालट स्वीकारतील, अशी आमची अपेक्षा आहे’, असे त्यांचे म्हणणे आहे.

२. डॉ. नंदिनी भौमिक यांनी सांगितले की, आजकाल लोक पूजाविधींमध्ये आवडीने सहभागी होण्याऐवजी इतर गोष्टींमध्येच सहभागी होतात. असे लोक पूजाकार्यात आवडीने सहभागी होतील, हे पहाणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.