‘श्री. विष्णुपंत जाधव यांची सून सौ. कीर्ती जाधव यांना जाधवकाकांच्या वाढदिवसानिमित्त स्फुरलेली आणि जाधवकाकांच्या सत्कार सोहळ्यात त्यांनी वाचून दाखवलेली कविता येथे दिली आहे.
मुले म्हणतात, ‘‘बाबा केवळ आहेत आमचे’’ ।
पण आमचे बाबा आमच्यासह आहेत सर्वांचे ।
प्रेम त्यांचे कधीच पाहिले नाही केवळ कुटुंबापुरते ।
त्यांच्या प्रेमाची खोली मोजण्याचे नाही कुठले मापक माझ्याकडे ।
कृतज्ञता देवा, तू असे बाबा दिलेस ।। १ ।।
सनातन कुटुंब तर आहेच प्राधान्य त्यांचे ।
शेतातील मजुरापासून ते ओळखीच्या प्रत्येकाचाच ।
विचार केल्याविना त्यांना शांत न बसवे ।
असेच त्यांना प्रत्येक वेळी अनुभवले ।
कृतज्ञता देवा, तू असे बाबा दिलेस ।। २ ।।
कर्तव्य करण्या सदैव ते तत्पर असती ।
निरपेक्ष ते सदैव असती ।
‘अजून मी कुठे न्यून पडतो ?’,
हेही लहान होऊन नेहमी ते विचारती ।
‘बाबा, हे सर्व तुम्हाला कसे जमते ?’,
याचे नेहमी आश्चर्य वाटते ।
कृतज्ञता देवा, तू असे बाबा दिलेस ।। ३ ।।
‘बाबा’ या शब्दाला आहेत ते जागणारे ।
ते केवळ बाबाच नाहीत, तर आईही होतात आमचे ।
न सांगताही मनातील ते ओळखतात ।
कृतज्ञता देवा, तू असे बाबा दिलेस ।। ४ ।।
न रागावता आमच्याएवढे होऊन समजावतात ते आम्हाला ।
त्यांच्याशी बोलण्या कधी संकोच न वाटे ।
असे आहेत आमचे हे गोड बाबा निराळे ।
कृतज्ञता देवा, तू असे बाबा दिलेस ।। ५ ।।
असोत ते आश्रमात अथवा बाहेरच्या वातावरणात ।
पण त्यांचे मन मात्र नित्य राही गुरुस्मरणात ।
त्यामुळे प्रत्येक प्रसंगात, प्रत्येक परिस्थितीत ।
ते निर्णय देती आध्यात्मिक स्तरावर ।
कृतज्ञता देवा, तू असे बाबा दिलेस ।। ६ ।।
आमच्याही मनाला ते कधीच घसरू न देती ।
मायेतील सुखात जरी असलो, तरी ।
‘अध्यात्म कसे जगायचे ?’, हेच ते नेहमी शिकवती ।
अनेक गुण आहेत त्यांच्यामध्ये ।
कृतज्ञता देवा, तू असे बाबा दिलेस ।। ७ ।।
त्यांचा प्रत्येक गुण टिपता येऊ दे देवा, आम्हाला ।
हीच आर्त प्रार्थना तुझ्या चरणांना ।
कृतज्ञता देवा, तू असे बाबा दिलेस ।
कृतज्ञता देवा, तू असे बाबा दिलेस ।। ८ ।।
– सौ. कीर्ती जाधव (सून), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (६.१०.२०२०)