१७ ते २३.६.२०२१ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. तेजल पात्रीकर (संगीत विशारद) यांच्या आवाजात ‘निर्विचार’ हा नामजप ध्वनीमुद्रित करण्यात आला. त्यानंतर रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील तीव्र आध्यात्मिक त्रास असलेले साधक, आध्यात्मिक त्रास असलेले ६० टक्के अन् त्यांहून अधिक आध्यात्मिक पातळीचे साधक, आध्यात्मिक त्रास नसलेले साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेले ६० टक्के अन् त्यांहून अधिक आध्यात्मिक पातळीचे साधक, असे एकूण १८ साधक अन् संत यांना ७ दिवस प्रतिदिन १० मिनिटे ऐकवण्यात आला.
त्या वेळी मूळ विदेशात रहाणार्या आणि सध्या रामनाथी आश्रमात राहून साधना करत असलेल्या काही साधकांना झालेले त्रास अन् आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. आध्यात्मिक त्रास असलेले विदेशी साधक
कु. ॲलिस स्वेरदा, इंग्लंड १७.६.२०२१ या दिवशी घेतलेला प्रयोग
अ. ‘निर्विचार’ हा ध्वनीमुद्रित नामजप चालू होण्यापूर्वी माझ्या मनात अनेक विचार येत होते आणि मला पुष्कळ अस्वस्थ वाटत होते.
आ. नामजप चालू झाल्यावर ‘रामनाथी, गोवा येथील सनातनचा संपूर्ण आश्रम समष्टीसाठी नामजप करत आहे आणि आश्रम हालत आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी माझ्या मनातील विचार न्यून होऊन मला आतून शांत वाटू लागले.
इ. नामजप संपल्यानंतरही काही वेळ माझी शांत स्थिती टिकून राहिली; पण नंतर काही वेळाने माझ्या मनात नकारात्मक विचार चालू झाले.
२६.६.२०२१ या दिवशी घेतलेला प्रयोग
अ. नामजप ऐकतांना आरंभी मला चांगले वाटले; मात्र काही वेळाने मला त्रास देणारी वाईट शक्ती नामजप करण्यात अडथळा आणू लागली. त्यामुळे मला ‘अस्वस्थ वाटून नामजप करू नये’, असे वाटू लागले. त्या वेळी माझ्या मनात स्वतःविषयी पुष्कळ नकारात्मक विचार येत होते.
आ. ‘निर्विचार’ हा ध्वनीमुद्रित नामजप लावलेला असतांना मी ‘महाशून्य’ हा प्राणशक्ती वहनानुसार शोधलेला नामजप केला. तेव्हा मला होणारा आध्यात्मिक त्रास ५ मिनिटांत न्यून झाला.’ (२६.६.२०२१)
श्री. पीटर कोनाव्हेलिस, ऑस्ट्रेलिया १७.६.२०२१ या दिवशी नामजप ऐकतांना आलेल्या अनुभूती
अ. ‘निर्विचार’ हा नामजप ऐकतांना मला पुष्कळ शांत वाटत होते.
आ. या नामजपामध्ये मला एक प्रकारचा गोडवा जाणवत होता.
इ. थोड्या वेळाने मी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या एकदम शिथिल (रिलॅक्स) झालो अन् मला आनंद जाणवू लागला. त्या वेळी माझे डोके आपोआप हळूवारपणे गोलाकार फिरत होते.
ई. काही मिनिटांनंतर मी आणखी शिथिल (रिलॅक्स) झालो. त्या वेळी माझी मान आपोआप खाली झुकली आणि मला ध्यान लागल्याप्रमाणे वाटले.
१९.६.२०२१ या दिवशी ‘निर्विचार’ हा नामजप ऐकतांना ‘आतून काय जाणवते ?’, हे अनुभवण्याचा केलेला प्रयत्न
अ. आरंभी मला होणारा आध्यात्मिक त्रास वाढला. नंतर मला शांत वाटू लागले.
आ. १७.६.२०२१ या दिवशीच्या तुलनेत नामजप ऐकतांना आज मला आनंद न जाणवता तटस्थ (न्यूट्रल) वाटत होते.
इ. शेवटच्या १० मिनिटांत मला गळून गेल्यासारखे वाटले. मला झोप येत नव्हती; परंतु दिवसा स्वप्ने पाहिल्याप्रमाणे माझ्या मनात पुष्कळ विचार येत होते.
इतर दिवसांच्या तुलनेत ‘आज लावलेला ‘निर्विचार’ हा नामजप अधिक निर्गुण स्तरावरील आहे’, असे मला जाणवले.’ (१९.६.२०२१)
२. आध्यात्मिक त्रास असलेल्या सौ. योया वाले (फ्रान्स) (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के) यांना झालेले त्रास अन् आलेल्या अनुभूती
२ अ. ‘निर्विचार’ नामजप ऐकतांना साधिकेला स्वतःचा आध्यात्मिक त्रास उणावत असल्याचे जाणवणे : ‘नामजप ऐकतांना मला माझ्या सहस्रारचक्राच्या स्थानी संवेदना जाणवत होत्या. त्या वेळी ‘निर्विचार’ या नामजपातून माझ्या सहस्रारचक्राच्या ठिकाणी शक्ती प्रवाहित होत असून माझ्यावर आध्यात्मिक स्तरावरील लाभ होत आहेत’, असे मला जाणवले. नामजपामुळे माझ्या मनाची शुद्धी होऊन ‘माझा आध्यात्मिक त्रास उणावत आहे’, असे मला जाणवले.
२ आ. नामजप झाल्यानंतर साधिकेला ‘अंगठा आणि तर्जनी ही बोटे एकमेकांना चिकटली आहेत’, असे लक्षात येणे : नामजप ऐकतांना मी अंगठा आणि तर्जनी (अंगठ्याच्या जवळील बोट) या हाताच्या बोटांची मुद्रा करून (बोटांची टोके एकमेकांशी जुळवून) नामजप ऐकत होते. नामजप झाल्यानंतर ‘मला माझा अंगठा आणि तर्जनी या बोटांची टोके एकमेकांना चिकटली आहेत’, असे वाटले. मला बोटे हालवता येत नव्हती; पण ‘जवळजवळ ५ मिनिटे त्यांतून शक्ती प्रवाहित होत आहे’, असे मला जाणवत होते. ‘हा नामजप सगुण-निर्गुण स्तरावरील आहे’, असे मला जाणवले.’
२ इ. नामजप लावण्यापूर्वी साधिकेला शरिरात पुष्कळ उष्णता जाणवणे आणि नामजप ऐकतांना आध्यात्मिक स्तरावरील लाभ झाल्यामुळे पुष्कळ घाम येऊन साधिकेच्या शरिरातील उष्णता न्यून होऊ लागणे : नामजप लावण्यापूर्वी मला शरिरात पुष्कळ उष्णता जाणवत होती आणि थोडे अस्वस्थही वाटत होते. नामजप ऐकतांना मला माझ्या शरिरात आणि शरिराभोवती हळूहळू थंडावा जाणवू लागला. नंतर माझ्या शरिरातील उष्णता न्यून होत गेली. त्या वेळी मला पुष्कळ घाम आला; परंतु शरिरात मात्र थंडावा जाणवत होता. मला जवळजवळ १५ मिनिटे घाम येत होता. नामजप ऐकतांना पुष्कळ आध्यात्मिक स्तरावरील लाभ होत होते. नामजपातील निर्गुण तत्त्वामुळे मला माझ्या आज्ञाचक्रस्थानीही थंडावा जाणवत होता.
२ ई. नामजप ऐकतांना जाणवलेली अन्य सूत्रे
१. माझ्या मनात कोणतेच विचार नव्हते आणि मला आतून शांत वाटत होते.
२. ‘निर्विचार या नामजपातून वायुतत्त्व आणि निर्गुण स्तरावरील स्पंदने प्रवाहित होत आहेत’, असे मला जाणवले.
३. ‘माझ्याभोवती असलेल्या मनोमयकोषाचे अस्तित्व न्यून होत आहे’, असे मला जाणवले.’ (१८.६.२०२१)
३. आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधिका सौ. देवयानी होर्वात (स्कॉटलँड) यांना आलेल्या अनुभूती
१८.६.२०२१ या दिवशी नामजप ऐकण्यापूर्वी, नामजप ऐकतांना आणि नामजप ऐकल्यानंतर आलेल्या अनुभूती
३ अ. नामजप ऐकण्यापूर्वी (प्रयोगापूर्वी) – ‘स्वतःकडे चांगली स्पंदने येत आहेत’, असे साधिकेला जाणवणे : ‘काही वैयक्तिक प्रसंगांमुळे आज माझ्या मनाची स्थिती चांगली नव्हती. माझ्या मनात पुष्कळ नकारात्मक विचार येऊन मला वाईट वाटत होते. मला पुष्कळ राग येत होता आणि त्या स्थितीतून बाहेरही पडता येत नव्हते. असे असले, तरी ‘निर्विचार’ हा नामजप ऐकण्यापूर्वी (प्रयोगापूर्वी) माझ्याकडे चांगली स्पंदने येत आहेत’, असे मला जाणवत होते. त्या वेळी ‘मला नकारात्मक स्थितीतून बाहेर पडता यावे, यासाठी ही सकारात्मक स्पंदने माझ्याकडे येत आहेत’, असे मला वाटले.
३ आ. नामजप ऐकतांना
१. ‘चांगल्या शक्तीचा प्रवाह सहस्रारातून माझ्या देहात प्रवाहित होत असून संपूर्ण देह चांगल्या शक्तीने भारित झाला आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी मला माझ्या हातात पुष्कळ शक्ती जाणवत होती.
२. नामजपावर माझे पूर्ण लक्ष केंद्रित झाले होते. माझ्या मनातील नकारात्मक विचार न्यून होऊन मनात कोणतेच विचार नव्हते. माझ्या मनात त्रासदायक विचार येणेही पूर्णपणे थांबले होते.
३. मी नकारात्मक स्थितीतून पूर्णतः बाहेर आले आणि ध्यानावस्थेत गेले होते.
३ इ. प्रयोगानंतर
१. नामजप ऐकवण्याचे थांबले. तेव्हा मी ध्यानावस्थेत होते. मला ‘माझे डोळे उघडू नयेत आणि आनंदाच्या याच स्थितीत रहावे’, असे वाटत होते.
२. मला माझ्याभोवती तेजस्वी प्रकाश जाणवू लागला; परंतु मला सभोवतालची अन्य कोणतीच जाणीव होत नव्हती. मला पुष्कळ स्थिर आणि शांत वाटत होते.’
२०.६.२०२१ या दिवशी नामजप ऐकतांना आणि ऐकल्यानंतर जाणवलेली सूत्रे
१. नामजप ऐकतांना : ‘वरच्या दिशेने आणि माझ्या डाव्या बाजूला असलेल्या ध्वनीक्षेपक यंत्राकडून (‘स्पीकर’कडून) माझ्याकडे प्रकाश येत आहे’, असे मला जाणवले.
२. नामजप ऐकल्यानंतर
अ. ध्वनीक्षेपक यंत्रावरील नामजप बंद करण्यात आला, तरीही मी ध्यानावस्थेत होते. या स्थितीतून बाहेर येण्यासाठी मी जाणीवपूर्वक प्रयत्न करत होते; परंतु मला त्याच स्थितीत रहावेसे वाटत होते.
आ. मला सकारात्मक आणि हलके वाटू लागले. मला पाठ आखडण्याचा त्रास आहे. नामजप ऐकण्यापूर्वी मला पाठदुखीचा पुष्कळ त्रास होत होता. प्रयोग संपल्यावर तो त्रास पूर्णतः उणावला. माझी पाठदुखी आणि डोकेदुखीही न्यून झाली.
इ. मला आतून शांत वाटत होते. ‘नामजप ऐकल्यानंतर माझा भाव जागृत झाला’, असे मला जाणवत होते. मला इतर साधकांप्रती प्रेम वाटत होते आणि साधकांमध्ये संघटितपणा जाणवत होता.
‘मला एक वेगळीच दृष्टी प्राप्त झाली होती’, असे मला वाटले.’ (२०.६.२०२१)
संकलक – कु. तेजल पात्रीकर (संगीत विशारद), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय. (२१.८.२०२१)