उद्या भाद्रपद कृष्ण पक्ष द्वादशी (३.१०.२०२१) या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणार्या सौ. मैत्रेयी भूषण कुलकर्णी यांचा ४० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सहसाधिकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात जाणवलेले पालट पुढे दिले आहेत.
सौ. मैत्रेयी कुलकर्णी यांना ४० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. प्रेमभाव
‘सौ. मैत्रेयीमध्ये उपजतच प्रेमभाव हा गुण आहे. कुणालाही त्रास होत असेल, कुणाला काही हवे असेल किंवा कुणी रुग्णाईत असेल, तर ती त्यांना मनापासून साहाय्य करते.
२. काटकसर
तिच्याकडे कधीच आवश्यकतेपेक्षा अधिक साहित्य नसते. ती स्वतःचे कपडेही काटकसरीने वापरते. वैयक्तिक गोष्टी आणि सेवा यांमध्ये तिचा हा गुण प्रकर्षाने जाणवतो.
३. परिपूर्ण सेवा करणे
तिची सेवा करण्याची पद्धत व्यवस्थित आणि नीटनेटकी आहे. तिची सेवा परिपूर्ण असते. त्यात कोणतीही गडबड नसते. तिच्याकडे रांगोळी काढण्याची सेवा असतांना ती वेगवेगळ्या आणि सुबक रांगोळ्या काढते. एखाद्या सेवेची कार्यपद्धत घालून दिली, तर ती नेटाने त्याचे पालन करते. त्यात ‘काही राहिले आहे’, असे होत नाही.
४. मैत्रेयीमध्ये जाणवलेले पालट
४ अ. दायित्व घेऊन सेवा करणे : पूर्वी तिला असणार्या आध्यात्मिक त्रासामुळे ती कुठल्याच सेवेचे दायित्व घेत नसे. प्रतिदिन करायची सेवा करतांना तिचा पुष्कळ संघर्ष व्हायचा; परंतु मागील ४ – ५ मासांपासून ती लहान-लहान सेवाही दायित्व घेऊन करते. ‘एखादी सेवा तुला करायला जमू शकेल’, असे तिला सांगितल्यावर लगेच ती सेवा स्वीकारून प्रयत्न करते. दायित्व घेऊन सेवा करणे हा गुण मुळातच तिच्यात आहे. त्यामुळे तिच्या सेवेचा कधी पाठपुरावा घ्यावा लागत नाही.
४ आ. जवळीक साधणे : ती आधी अलिप्त रहायची आणि केवळ तिच्या यजमानांशी (श्री. भूषण कुलकर्णी यांच्याशी) बोलायची. अलीकडे ती सर्वांशी स्वतःहून बोलते आणि मिळून मिसळून रहाते. सहसाधकांना कार्यक्रम किंवा सणाच्या निमित्ताने साहाय्य हवे असल्यास ती आनंदाने साहाय्य करते.
४ इ. शिकण्याच्या वृत्तीत वाढ होणे : नवीन ‘प्रिंटर’मध्ये प्रिटिंगसाठी कागद ठेवणे आणि शाई पालटणे हे तिने पुष्कळ अल्प कालावधीत शिकून घेतले. आधी असे काही आल्यास तिच्या मनात ‘ते मला जमेल का ? मी हे प्रथमच करत आहे’, असे विचार असायचे.
४ ई. व्यष्टी साधनेचे प्रयत्न करणे : पूर्वी तिच्याकडून व्यष्टी साधनेचे प्रयत्न काहीच होत नव्हते. तिला आध्यात्मिक त्रासामुळे काही कळायचे नाही आणि आकलनही व्हायचे नाही; परंतु आता ती प्रतिदिन दैनंदिनी लिहिणे, फलकावर चुका लिहिणे, सत्संगात चूक सांगणे इत्यादी प्रयत्न करत आहे. व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगितलेले प्रयत्नही ती करते आणि जे प्रयत्न तिच्याकडून झाले नाहीत त्याविषयी ती प्रांजळपणे सांगते.
५. स्वतःला पालटण्याची तळमळ
अ. सौ. मैत्रेयीचा स्वीकारण्याचा भाग वाढला आहे. त्यामुळे तिला कोणतीही गोष्ट सहजतेने सांगता येते.
आ. तिला तिच्या प्रतिक्रियात्मक बोलण्याच्या संदर्भातील काही चुका लक्षात आणून दिल्यानंतर तिने त्यासाठी पुष्कळ चांगले प्रयत्न करून स्वतःमध्ये पालट केले.
इ. पूर्वी आध्यात्मिक त्रासामुळे तिची सतत चिडचिड होत असे. आता तिचा तोंडवळा आनंदी दिसतो. तिच्या सहवासातही आनंद आणि हलकेपणा जाणवतो.
– कु. अंजली क्षीरसागर (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) आणि सौ. नंदिनी चितळे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.९.२०२१)