‘पुणे येथील सनातनच्या साधिका सौ. प्रतिभा नामदेव फलफले यांच्या आईचे (श्रीमती जानकीबाई कोंडिबा पवार (वय ६९ वर्षे)) ५.७.२०२१ या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. श्रीमती जानकीबाई पवार यांचे २.१०.२०२१ या दिवशी तिसरे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्ताने त्यांची ज्येष्ठ कन्या सौ. प्रतिभा नामदेव फलफले यांना त्यांच्या आईची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, आईची मृत्यूपूर्वीची स्थिती आणि मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. साधेपणा
‘घरची आर्थिक परिस्थिती चांगली असली, तरी आईचे रहाणीमान साधे होते. तिला परिस्थितीचा गर्व नव्हता.
२. त्यागी वृत्ती
अ. आई गावातील गरजू लोकांना आवश्यकतेनुसार घरातील वस्तू सहजतेने देऊन साहाय्य करायची.
आ. आईने माझ्या लहान भावाच्या (श्री. तात्यासो पवार) विवाहानंतर सुनेला (सौ. अस्मिता पवार) घरातील दायित्व सहजतेने दिले. तिचा कधीही ‘सूनबाईने माझ्या पद्धतीने घरातील कामे करावीत’, असा अट्टाहास नसायचा.
३. देवावरील श्रद्धा
अ. आईची माझ्या आधीची ३ अपत्ये (२ मुले आणि १ मुलगी) जन्माला येऊन लगेच दगावली. असे कठीण प्रसंग जीवनात येऊनही आईची देवावरची श्रद्धा कायम होती.
आ. आई कर्मकांड आणि उपवास अतिशय श्रद्धेने अन् नियमांचे काटेकोरपणे पालन करून करत असे.
४. मुलांवर साधनेचे संस्कार करणे
अ. आम्ही लहान असतांना आम्हाला ती पहाटे मंदिरात काकड आरतीला घेऊन जात असे.
आ. जेवतांना ‘रामाचे नाव घेऊन जेवायला आरंभ करा’, असे सांगत असे.
इ. ती अशिक्षित असल्याने आमच्याकडून पोथीवाचन करून घ्यायची.
ई. प्रतिदिन सकाळी उठल्यावर आधी देवतेचे स्मरण करून देवाचे दर्शन घ्यायला सांगत असे.
उ. आईने आम्हा सर्व भावंडांवर धार्मिक संस्कार केले. लहान असल्यापासून तिने रांगोळी काढणे, प्रासंगिक व्रतवैकल्ये असतांना संबंधित देवतेची कथा वाचणे, असे प्रयत्न आमच्याकडून करवून घेतले.
५. आईची मृत्यूपूर्वीची स्थिती
५ अ. आईचे आजारपण : २३.११.२०२० या दिवशी अर्धांगवायूचा झटका येऊन माझी आई अत्यवस्थ झाल्याने तिला उपचारांसाठी रुग्णालयात भरती केले. तेव्हा आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होईल कि नाही ते ३ दिवस सांगू शकत नाही’’; परंतु गुरुकृपेने तिने उपचारांना प्रतिसाद दिला. नंतर तिला बरे वाटू लागले; परंतु अर्धांगवायूमुळे तिला अंघोळ घालणे, तिचे वैयक्तिक आवरणे, तिला जेवू घालणे या कृती इतरांना कराव्या लागत होत्या. त्यामुळे माझी सर्वांत लहान बहीण (कु. शामबाला पवार) नोकरी सोडून आईजवळ राहिली. तिने आईची सेवा अतिशय मनापासून आणि प्रेमाने केली.
५ आ. मायेपासून अलिप्त होणे
१. आई रुग्णाईत असतांना मी तिच्याशी भ्रमणभाषवर बोलायचे. तेव्हा ती पुष्कळ आनंदी असायची. ती अतिशय समाधानी होती. ‘तिला तिच्या मुलांची चिंता वाटत आहे किंवा ती त्यांच्यात अडकली आहे’, असे मला कधी जाणवले नाही.
२. ‘तिला पूर्वी आवडत असलेले पदार्थ किंवा फळे खायला देऊ का ?’, असे विचारल्यावर ती ‘नको’ म्हणायची. तिचे ‘अमुक गोष्ट हवी किंवा नको’, असे नसायचे. तिच्या डोळ्यांमध्ये तृप्तता जाणवायची.
३. आईने तिच्या आजारपणात ‘भूतकाळातील प्रसंग आठवणे किंवा भविष्यकाळात आपले कसे होईल ?’, याविषयी चर्चा केली नाही.
४. तिला घर, संपत्ती आणि स्वतःच्या वस्तू यांविषयीही आसक्ती नव्हती.
५. ‘तिला स्वतःच्या मृत्यूचे भयही वाटत नव्हते’, असे माझ्या लक्षात आले.
६. आईच्या मृत्यूपूर्वी साधिकेने केलेले साधनेचे प्रयत्न अन् आलेल्या अनुभूती
अ. आई रुग्णाईत असतांना अधूनमधून माझ्या मनात काळजीचे विचार यायचे. तेव्हा ‘गुरुदेव तिच्याजवळ आहेत’, असा भाव मी ठेवू लागले. तिला गुरुचरणी अर्पण केल्यानंतर माझ्या मनातील तिच्याविषयीचे काळजीचे विचार न्यून झाले.
आ. आईचे निधन होण्याच्या ३ दिवस आधीपासून मी तिच्या खोलीमध्ये बसून साधना करणे, ऑनलाईन सत्संगात सहभागी होणे, साधकांशी सेवेनिमित्त बोलणे आणि अन्य सेवा केल्या. त्यामुळे ‘आईला या सर्व माध्यमांतून गुरुदेवांनी चैतन्य दिले’, असे मला वाटले.
इ. आईच्या खोलीत मी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन ग्रंथ’ ठेवला. त्यामुळे तिला गुरुदेवांच्या छायाचित्राचे दर्शन होत असे. आईने निधनाच्या आदल्या दिवशी तो ग्रंथ मागितला. मी तिला ग्रंथ देऊन सांगितले, ‘‘गुरुदेवांना नमस्कार कर.’’ तेव्हा तिने डोके टेकवून गुरुदेवांच्या छायाचित्राला नमस्कार केला. त्यानंतर त्यातील गुरुदेवांची काही छायाचित्रे दाखवून तिला नामजप करण्याची आठवण करून दिली. त्या वेळी ‘गुरुदेवांनीच तिला दर्शन देऊन चैतन्य दिले’, असे मला जाणवले.
ई. तिच्या खोलीत भ्रमणभाषवर सतत नामजप लावला होता. तिला नामजप करण्याची आठवण केल्यावर ‘मी नामजप करत आहे’, असे ती मला सांगायची.
उ. मी गुरुदेवांना ‘तुम्हाला अपेक्षित असेच होऊ द्या’, अशी मनोमन प्रार्थना केली. त्यानंतर अर्ध्या घंट्याने आईचे निधन झाले. नंतर माझ्या बहिणीनेही (कु. शामबाला पवार) हीच प्रार्थना केल्याचे कळले. आम्ही एकमेकींना प्रार्थना करण्याविषयी सुचवले नव्हते. गुरुदेवांनीच आमच्याकडून योग्य प्रार्थना करवून घेतली. ५.७.२०२१ या दिवशी आईचा मृत्यूही शांतपणे झाला. ‘गुरुदेवांनी तिला त्रास न होता अलगद बाहेर काढले’, असे मला वाटले.
७. आईच्या निधनानंतर आलेल्या अनुभूती
अ. ‘आईच्या मृत्यूनंतर भावनिक न होता सर्व सिद्धता शांतपणे आणि साधना म्हणून करूया’, असा विचार गुरुदेवांनी दिल्यामुळे आईच्या पुढील गोष्टी सेवा म्हणून करता आल्या. तेव्हा चांगले वाटत होते. त्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि पू. (सौ.) अश्विनी पवार यांचे आपोआप स्मरण झाले. ‘संतांच्या स्मरणातून गुरुदेवांनी मला चैतन्य दिले’, यासाठी कृतज्ञता वाटली.
आ. ‘आईच्या मृतदेहाभोवती दत्ताच्या नामपट्ट्या आणि कापूर यांचे मंडल केल्यानंतर तिच्याभोवती पिवळ्या रंगाचे संरक्षककवच निर्माण झाले आहे’, असे मला दिसले. ‘घरात कुणाचे निधन झाले आहे’, असे वाटत नव्हते.
इ. ‘आईने मला जन्म दिला, माझ्यावर चांगले संस्कार केले आणि आज तिच्यामुळेच मी साधना करू शकत आहे’, या कृतज्ञताभावाने मी तिच्या मृतदेहाला नमस्कार केला. त्यानंतर माझे मन शांत झाले.
ई. अंत्यविधी झाल्यानंतर ती रहात असलेल्या खोलीत शांत वाटत होते.
आई श्रीकृष्णाचा नामजप करत असे. आईला मृत्यूही अतिशय शांतपणे आला. या कठीण काळात गुरुदेवांनीच माझ्यासारख्या क्षुद्र जिवाची आणि कुटुंबियांची काळजी घेतली अन् आम्हाला बळ देऊन स्थिर ठेवले, त्यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. प्रतिभा नामदेव फलफले (मोठी मुलगी), पुणे (१५.९.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |