वर्धा येथील कै. विजय डगवार (वय ६६ वर्षे) यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

वर्धा येथील सनातनचे साधक विजय डगवार यांचे १४.६.२०२१ या दिवशी निधन झाले. सेवेनिमित्त डगवारकाकांचा साधकांशी सतत संपर्क होत असे. वर्धा येथील साधकांना जाणवलेली विजय डगवार यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

कै. विजय डगवार

१. श्री. शशिकांत पाध्ये, वर्धा

१ अ. व्यष्टी साधनेचे गांभीर्य : ‘डगवारकाकांशी माझा पुष्कळ जुना परिचय होता. मागील ७ – ८ मासांपासून ते नियमितपणे व्यष्टी साधनेच्या ‘ऑनलाईन’ आढाव्याला उपस्थित रहात असत. एखाद्या दिवशी काही कारणांमुळे त्यांना आढाव्याला उपस्थित रहायला जमले नाही, तर ते दुसर्‍या दिवशी क्षमायाचना करत असत. त्यांच्याकडून प्रयत्न अल्प झाल्यास ते खंत व्यक्त करत असत.

१ आ. त्यांना साहाय्य मागितल्यास ते साहाय्य करण्यास नेहमी तत्पर असायचे.’

२. श्री. दीपक जमनारे, वर्धा

२ अ. शिस्तप्रियता आणि नीटनेटकेपणा : ‘ते अतिशय शिस्तप्रिय आणि स्पष्टवक्ते होते. ते कार्यालयामध्ये वेळेत जायचे. त्यांना घरातही नीटनीटकेपणा आणि स्वच्छता आवडायची. ते महत्त्वाच्या कागदपत्रांची धारिका व्यवस्थित करून ठेवायचे.

२ आ. ते रामनाथी आश्रमात गेले होते. तेथील अनुभव ते भावपूर्णरित्या सांगायचे.’

३. कु. अर्चना रामकृष्ण निखार, वर्धा

३ अ. प्रामाणिकपणा : ‘त्यांच्याकडून साधनेचे प्रयत्न अल्प झाले, तर ते व्यष्टी साधनेच्या आढाव्यात तसे प्रामाणिकपणे सांगायचे. त्यांना एखादी कृती जमत नसेल, तर ते तसे सांगायचे. व्यष्टी साधनेसाठी त्यांना डगवारमावशींचे (त्यांच्या पत्नी श्रीमती मंदाकिनी डगवार, आध्यात्मिक पातळी ६९ टक्के) साहाय्य घेण्यास सांगितल्यावर ते ‘हो’ म्हणायचे आणि तसे प्रयत्न करायचे.

३ आ. काटकसर : ते व्यष्टी साधनेचा आढावा लिहिण्यासाठी वर्तमानपत्रासह येणार्‍या विज्ञापनांच्या पाठकोर्‍या पत्रकांचा वापर करायचे.’

४. श्री. जगदीश इंगोले, वर्धा

४ अ. कुणी सनातन संस्थेच्या विरोधात बोलल्यास त्याचा चांगला प्रतिवाद करणे : ‘काका २० वर्षांपासून सनातन संस्थेच्या संपर्कात होते. तेव्हा डगवारमावशी सेवा करायच्या आणि काका नोकरी करायचे. प्रारंभी संस्थेच्या कार्यात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता; परंतु समाजात कुणी सनातन संस्थेच्या विरोधात बोलले, तर ते त्यांना आवडत नसे. ते त्याचा चांगला प्रतिवाद करायचे. हळूहळू ते नामजप करू लागले. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर ते व्यष्टी साधनेसह समष्टी सेवाही करू लागले.

४ आ. घराला सेवाकेंद्र बनवण्याचा प्रयत्न करणे : त्यांनी सनातन संस्थेच्या कार्यक्रमांसाठी त्यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर एक सभागृह बांधले, तसेच संत आणि साधक यांच्या रहाण्यासाठी चांगली सोय केली. अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या घराला सेवाकेंद्र बनवण्याचा प्रयत्न केला.’

५. सौ. सत्याली देव, चंद्रपूर

५ अ. ‘डगवारकाकांशी बोलत असतांना त्यांच्यात बालकभाव असल्याचे जाणवायचे.

५ आ. वेळेचे पालन करणे : काका अध्यात्म जगायचे. त्यांच्यात साधनेसाठी आवश्यक गुण मुळातच होते. एकदा त्यांच्या समवेत एका विवाह समारंभाला जाण्याचा योग आला. तेव्हा ते वेळेपूर्वी १ घंटा सिद्ध होते. आम्हाला थोडा वेळ लागला. तेव्हा ते म्हणाले, ‘‘आपण सत्संगाच्या ठिकाणी वेळेच्या आधीच जातो ना ?’’

५ इ. प्रेमभाव

१. काका घरी आलेल्यांचे प्रेमाने आदरातिथ्य करायचे. एकदा काकांकडे पाहुणे येणार होते. तेव्हा त्यांनी त्यांच्या निवासाची व्यवस्था इतकी चांगली केली होती की, ती पाहून माझी भावजागृती होत होती. ‘त्यांच्याकडे संतच येणार आहेत’, या भावाने त्यांनी ती सिद्धता केली होती’, असे मला जाणवले.

२. मी त्यांच्यापेक्षा वयाने लहान असूनही ते मला ‘ताई’ म्हणत असत. ते मला वडिलांसारखे वाटायचे आणि त्यांनी माझ्यावर मुलीसारखेच प्रेम केले.

‘परात्पर गुरुदेवांच्या कृपेने मला त्यांच्याकडून शिकता आले’, त्याविषयी कोटीशः कृतज्ञता !

६. सौ. सुषमा चंदनखेडे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), चंद्रपूर

६ अ. व्यवस्थितपणा : ‘आम्ही काकांकडे गेलो असतांना मी त्यांच्याकडे नागवेलीचे रोप मागितले होते. तेव्हा त्यांनी ते व्यवस्थितपणे सिद्ध करून वाहनात आणून ठेवले. त्या वेळी चंद्रपूरहून आश्रमात पाठवण्यासाठी काही साहित्य दिले होते. त्या साहित्याची त्यांनी चांगल्या पद्धतीने बांधणी केली होती. त्याकडे पाहूनच पुष्कळ चांगले वाटत होते.

७. श्री. गुणवंत चंदनखेडे, चंद्रपूर

७ अ. अभ्यासू वृत्ती : ‘एकदा पू. पात्रीकरकाकांचे चंद्रपूरला मार्गदर्शन असतांना डगवारकाका आले होते. तेव्हा माझी त्यांच्याशी प्रथम भेट झाली. काकांनी पू. पात्रीकरकाकांचा सत्संग ऐकला आणि अभ्यास करून सत्संगाचा सारांश सांगितला.’

८. सौ. विजया दामोदर भोळे, वर्धा

८ अ. ‘डगवारकाका प्रत्येक गुरुपौर्णिमेला न मागता स्वतःहून अर्पण द्यायचे.

८ आ. प्रेमभाव : मला पायदुखीचा त्रास असल्याचे काकांना ठाऊक होते. मी सेवेनिमित्त त्यांच्या घरी गेल्यास सेवा संपल्यानंतर ते स्वतःहून मला माझ्या घरी सोडायचे. मी रस्त्यात दिसले, तर वाहन थांबवून ते माझी विचारपूस करायचे आणि ‘वाहनाने घरी नेऊन सोडतो’, असे मला म्हणायचे.

८ इ. काकांनी घरी काही औषधी वनस्पतींची लागवड केली होती.

८ ई. स्वतः धर्माचरण करून इतरांकडूनही करवून घेणे : शास्त्रानुसार सण आणि उत्सव साजरे करण्यासाठी ते आधीच नियोजन करून ठेवत असत. गुढीपाडव्याला गुढी उभारतांना ते स्वतः सात्त्विक पोशाख परिधान करायचे आणि ताईलाही (त्यांची पत्नी श्रीमती मंदाकिनी डगवार यांनाही) नऊवारी साडी नेसून सिद्धता करण्यास सांगायचे.’

९. श्री. नीरज क्षीरसागर, वर्धा

९ अ. प्रेमभाव

१. ‘काकांकडे गेल्यावर ते माझ्या मुलाशी प्रेमाने बोलायचे. ते त्याच्याशी त्याच्या वयाचे होऊन खेळायचे, तसेच त्याला त्याच्या आवडीचा खाऊ द्यायचे.

२. त्यांच्या निधनाच्या आधी १५ दिवस ते मला म्हणाले होते, ‘‘श्रीरंगला माझ्याकडे ठेवून तुम्ही सेवेला जात जा. मी त्याला सांभाळीन.’’

३. मध्यंतरी मला ‘कोरोना’चा संसर्ग झाला होता. तेव्हा ते माझ्या प्रकृतीची नियमितपणे विचारपूस करत होते.’

विजय डगवार यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर साधकांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

१. निधनापूर्वी – काकांसाठी नामजप करतांना कोणताही त्रास न होणे आणि ‘त्यांच्या बाजूला बसून नामजप करत आहे’, असे जाणवणे

‘काका रुग्णाईत असतांना मला काकांसाठी नामजप करायला सांगितला होता. तेव्हा माझ्याकडून तो नामजप एकाग्रतेने झाला. एरव्ही कोणताही नामजप करतांना मला त्रास होतो; पण या वेळी नामजप करतांना मला कोणताही त्रास झाला नाही. ‘नामजप करतांना मी त्यांच्या बाजूला बसून आहे’, असे मला जाणवत होते.’ – सौ. सुषमा चंदनखेडे, चंद्रपूर

२. निधनानंतर

२ अ. काकांच्या अंत्यविधीच्या वेळी ‘ते समोर उभे आहेत’, असे दिसणे, त्यांचा तोंडवळा शांत आणि आनंदी दिसणे अन् ‘त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली आहे’, असे वाटणे : काका गेल्याचे कळल्यावर प्रथम मला वाईट वाटले. नंतर त्यांचा अंत्यविधी होईपर्यंत ‘ते समोर उभे आहेत’, असे मला दिसत होते. त्या वेळी त्यांचा तोंडवळा शांत आणि आनंदी दिसत होता. तेव्हा ‘त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली असून ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले आहेत’, असे मला वाटले.’

– सौ. सत्याली देव, चंद्रपूर

२ आ. ‘मृत्यूसमयी काकांचा तोंडवळा एरव्हीपेक्षा चांगला दिसत होता. ‘ते तरुण आहेत’, असे मला जाणवले. त्यांच्याकडे पाहून शांत वाटत होते.’

– श्री. किशोर किरसान, वर्धा

२ इ. ‘१५.६.२०२१ या दिवशी अंत्यविधीच्या वेळी ‘काकांच्या चितेजवळ परात्पर गुरुमाऊली आली आणि ती काकांना अलगद उचलून घेऊन गेली’, असे मला सूक्ष्मातून दिसले.’

– श्री. प्रशांत बाकडे, वर्धा

(सर्व सूत्रांचा दिनांक २२.६.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक