कपिल सिब्बल यांच्या घरावर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून तोडफोड

  • पक्षाच्या अध्यक्षपदाविषयी सिब्बल यांनी केले होते विधान

  • काँग्रेस नेते आनंद शर्मा यांची आक्रमणाच्या घटनेवर टीका

ही आहे गांधीवादी काँग्रेसची मानसिकता ! इतरांना लोकशाहीचे डोस पाजणार्‍या काँग्रेसमध्येच हुकूमशाही आणि गुंडगिरी ठासून भरली आहे, हे यातून पुन्हा एकदा उघड झाले आहे ! अशा काँग्रेसला गांधी आणि लोकशाही यांचे नाव घेण्याचाही अधिकार नाही ! – संपादक

नवी देहली – काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय कायदा मंत्री कपिल सिब्बल यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाविषयी केलेल्या विधानानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नवी देहलीतील निवासस्थानाबाहेर निदर्शने करत तोडफोड केली. या घटनेचा काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी निषेध करत तोडफोड करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे. काँग्रेसमध्ये निवडून आलेला अध्यक्ष नाही. निर्णय कोण घेत आहे ? हे आम्हाला ठाऊक नाही, असे विधान सिब्बल यांनी केले होते. तसेच त्यांनी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक बोलावण्याची मागणी केली होती.

आनंद शर्मा यांनी ट्वीट करून म्हटले की, कपिल सिब्बल यांच्या घरावरील आक्रमणामुळे धक्का बसला आहे. या निंदनीय कृतीमुळे पक्षाची अपकीर्ती होते आणि त्याचा तीव्र निषेध केला पाहिजे. काँग्रेसचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायम ठेवण्याचा इतिहास आहे. मत आणि धारणा यांतील मतभेद लोकशाहीमध्ये अविभाज्य आहेत. असहिष्णुता आणि हिंसा हे काँग्रेसच्या मूल्यांपासून अन् संस्कृतीसाठी वेगळे आहेत. त्यामुळे या प्रकरणातील दोषींना ओळखून त्यांच्यावर कारवाई केली जावी, अशी विनंती मी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना करत आहे.