कष्टाळू, इतरांना साहाय्य करणार्‍या आणि मुलांवर चांगले संस्कार करणार्‍या नान्नज (जिल्हा सोलापूर) येथील (कै.) श्रीमती प्रभावती गोविंदराव पाटील (वय ७२ वर्षे) !

२६.३.२०२१ या दिवशी नान्नज (जिल्हा सोलापूर) येथील श्रीमती प्रभावती गोविंदराव पाटील (वय ७२ वर्षे) यांचे निधन झाले. त्यांची मुलगी आणि जावई यांना त्यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

(कै.) श्रीमती प्रभावती गोंविदराव पाटील

सौ. सुवर्णा श्रीपाद पेठकर  (मुलगी), पंढरपूर, जिल्हा सोलापूर.

सौ. सुवर्णा श्रीपाद पेठकर

१. बालपणी हलाखीची स्थिती असणे  आणि कष्ट करून लहान भावंडांची काळजी घेणे

‘आईचा जन्म अत्यंत गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला. तिचे वडील (माझे आजोबा, (कै.) नानासाहेब देसाई) कपड्याच्या गिरणीत कामाला होते. पुढे ती गिरणी बंद पडल्यावर ते काहीही न सांगता घरातून निघून गेले आणि २ वर्षांनी परत आले. त्या काळात तिची आई (माझी आजी, (कै.) लक्ष्मीबाई नानासाहेब देसाई) स्वयंपाकाची कामे करत असे. घरी अन्नाची उणीव असल्याने माझी आई तिच्या पाठच्या भावंडांना जेवू घालत असे आणि स्वतः चणेफुटाणे खाऊन रहात असे. माझ्या आईने तिच्या भावंडांना कधीही काही न्यून पडू दिले नाही. ‘भावंडांना वह्या मिळाव्यात’, यासाठी ती पुस्तकांच्या भांडारांच्या (‘बूक डेपो’च्या) मालकांच्या वह्या आणि पुस्तके गाडीतून उतरवायला जात असे. माझ्या आईला त्या डेपो मालकांकडून कोरी पाने मिळत असत आणि ती त्या पानांच्या वह्या बनवून भावंडांना देत असे.

२. विवाहानंतर घर सांभाळण्याच्या समवेत शेतीची कामेही करणे

वयाच्या १४ व्या वर्षी आईचे लग्न झाले. माझे वडील ((कै.) गोविंदराव रामचंद्र पाटील) भोळसट होते. आमचे घर नामवंत होते. आमचा शेतीवाडीचा व्याप पुष्कळ मोठा होता. माझे आजोबा ((कै.) रामचंद्र यशवंत पाटील) निवृत्त मामलेदार होते. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आई शेतातील सर्व कामे करत असे. ती मजुरांच्या बरोबरीने कामे करून घरचेही सर्व बघत असे. त्या काळात तिने ‘द्राक्षांची बाग लावणे, माल विकणे (मार्केटिंग), बागेची मशागत करणे’ इत्यादी शेतीची कामे आनंदाने केली. तिचे शिक्षण सातव्या इयत्तेपर्यंत झाले होते, तरीही तिने कोणतेही गार्‍हाणे न करता पुरुषांच्या बरोबरीने कामे केली.

३. कठीण प्रसंगांत माहेरकडच्या  नातेवाइकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणे

माझा मामा (आईचा भाऊ, श्री. कमलाकर देसाई) एका औषधाच्या दुकानात कामाला होता. त्याच्या मालकाने मामावर पैसे चोरल्याचा आरोप करून त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात खोटी तक्रार नोंदवली. त्या वेळी आईने स्वतःचे अलंकार मोडून त्याला सोडवले. आता तो मामा आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसाय व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत आहे. माझ्या दुसर्‍या मामाला (श्री. सुरेश देसाई यांना) अपघात झाला असतांना आईने औषधोपचारासाठी पैसे देऊन त्याला आधार दिला. आईने तिच्या लहान बहीणीच्या (श्रीमती छाया दिलीप हवेले यांच्या) लग्नात आर्थिक साहाय्य केले. आईने या सर्व गोष्टी तिला मिळालेल्या पैशांच्या बचतीतून केल्या.

४. आईच्या ५ नणंदा वयाने तिच्याहून मोठ्या होत्या. नणंदा माहेरी आल्यावर आई ‘त्यांना कोणताही त्रास होऊ नये’, याची काळजी घेत असे.

५. शेजार्‍यांना साहाय्य करणे

आईच्या सासरची परिस्थिती थोडी बरी होती. शेजारचे लोक आणि महिला आईकडे येऊन ‘आमच्या घरी काही नाही. आम्हाला धान्य द्या’, असे सांगत. तेव्हा आई त्यांना घागरी भरून धान्य द्यायची. आई शेजार्‍यांच्या घरी जाऊन त्यांच्या सुख-दुःखाच्या प्रसंगांत त्यांना शारीरिक स्तरावरही साहाय्य करायची. त्यामुळे सर्वांच्याच मनात आईविषयी प्रेम आणि आदरभाव होता.

६. इतरांच्या मनात विश्वासार्हता निर्माण करणे

आमच्या घरी एक वयस्कर मोलकरीण होती. तिच्या अंतसमयी तिने माझ्या आईला बोलावून घेतले आणि तिची नथ अन् सोन्याचे मणी आईला दिले. तिने आईला तिच्या  (मोलकरणीच्या) नातीच्या लग्नात त्यांचा उपयोग करण्यास सांगून प्राण सोडले. मोलकरणीच्या नातीच्या लग्नाच्या वेळी आईने ते अलंकार संबंधितांना दिले आणि स्वतःहून साहाय्यही केले. त्या वेळी सर्व उपस्थितांना कृतज्ञता वाटून गहिवरून आले.

७. पुष्कळ कष्ट करून मुलांना शिक्षण  देणे आणि त्यांच्यावर चांगले संस्कार करणे

आईने तिचे दुःख कुणालाही सांगितले नाही. ती प्रत्येक प्रसंगाला धीरोदात्तपणे सामोरे गेली. तिने कधीच स्वतःचा विचार केला नाही. तिने आम्हा भावंडांवर (सौ. सुवर्णा श्रीपाद पेठकर, श्री. वैभव गोविंदराव पाटील आणि श्री. विशाल गोविंदराव पाटील यांच्यावर) चांगले संस्कार करून आम्हाला पदवीधर केले. ‘मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत’, यासाठी तिने पुष्कळ कष्ट घेतले. ‘गरीब परिस्थितीतही समाधानी कसे रहावे ? इतरांच्या सहानुभूतीची अपेक्षा न करता प्राप्त परिस्थितीत आनंदाने कसे रहावे ?’, हे तिने आम्हाला शिकवले. त्यामुळे आम्ही सर्व भावंडे लहानपणापासून समजूतदार झालो आणि कोणत्याही प्रसंगात स्थिर रहाण्यास शिकलो.

८. तिची देवावर पुष्कळ श्रद्धा होती. ती (कै.) नानासाहेब धर्माधिकारी यांच्या दासबोध निरूपणाच्या बैठकीला जायची.

९. कुटुंबियांना साधनेत साहाय्य करणे

‘मी आणि माझे पती आधुनिक वैद्य (डॉ.) श्रीपाद सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करतो. माझी मुलगी कु. श्रावणी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात रहाते’, या गोष्टींचा आईला अभिमान वाटायचा. ती कुलदेवी आणि दत्त यांचा जप करत असे. तिने कधीही आमच्या साधनेला विरोध केला नाही. मी हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या सेवेसाठी १० – १५ दिवस बाहेरगावी असतांना ती माझ्या घरी येऊन रहात असे आणि जावयांसाठी स्वयंपाक करत असे. ‘सतत घरातील कामे करत रहाणे आणि नामजप करणे’, यांत तिचा दिवस आनंदाने जात असे

१०. आईला आलेली अनुभूती – श्री व्यंकटेश  स्तोत्राचे पठण केल्यावर शेषनागाचे दर्शन होणे

एकदा आईने ३ दिवस मध्यरात्री २१ वेळा श्री व्यंकटेश स्तोत्राचे पठण केले. त्या वेळी तिला शेषनागाचे दर्शन झाले. ‘तो शेषनाग घराच्या मुख्य प्रवेशदारातून आत आला आणि देवघरात येऊन स्थिरावला’, असे तिला जाणवले.

११. आईच्या निधनानंतर जाणवलेले सूत्र

आईला न्यूमोनिया (फुप्फुसांना जंतूसंसर्ग होणे) झाल्यामुळे तिला रुग्णालयात भरती केले होते. ती त्या काळातही शांत आणि स्थिर होती. २६.३.२०२१ या दिवशी आईचे निधन झाले. आईच्या निधनानंतर घरात दाब न जाणवता पुष्कळ शांत वाटत होते. घरातील वातावरण प्रसन्न होते. घरातील सर्व जण श्री गुरुकृपेने स्थिर होते.

‘हे परात्पर गुरुमाऊली, तुमच्या कृपेने आम्हाला अशी आई लाभली. ‘तिचे गुण आमच्यामध्ये यावेत’, यासाठी आमच्याकडून प्रांजळपणे प्रयत्न होऊ देत. तुमच्या अनंत कृपेने तिला उत्तम गती प्राप्त होऊ दे’, अशी आपल्या परम पावन चरणी कोटीशः प्रार्थना !’ (५.४.२०२१)

आधुनिक वैद्य (डॉ.) श्रीपाद पेठकर (जावई), पंढरपूर, जिल्हा सोलापूर.

आधुनिक वैद्य श्रीपाद पेठकर

प्रेमभाव

‘माझ्या सासूबाईंनी माझ्यावर, तसेच नातवंडे (श्री. चैतन्य आणि कु. श्रावणी पेठकर) आणि मुलीच्या सासरचे लोक यांच्यावर भरभरून प्रेम केले. आमच्या दुःखाच्या प्रसंगांत त्यांनी वेळोवेळी आमच्याकडे येऊन आम्हाला धीर दिला. त्यांनी माझ्यावर स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम केले.’ (५.४.२०२१)