उतारवयातही आश्रमजीवनाशी जुळवून घेणारे आणि देवाच्या अनुसंधानात असणारे ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रभाकर पिंगळे (वय ८६ वर्षे) आणि सौ. कमलिनी पिंगळे (वय ७८ वर्षे) !
श्री. प्रभाकर पिंगळे (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) आणि सौ. कमलिनी पिंगळे (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) हे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे आई-वडील आहेत. ते उतारवयात आश्रमात रहायला येऊनही त्यांनी आश्रमजीवनाशी चांगल्या प्रकारे जुळवून घेतले आहे. त्यांच्या नातीला (मुलाच्या मुलीला, सौ. वैदेही गुरुप्रसाद गौडा यांना) जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात झालेले पालट यांविषयी येथे दिले आहे.
‘गुरु शिष्याला पितृऋणातून मुक्त करतात’, याची आलेली अनुभूती !
‘आम्ही आई-वडिलांच्या जवळ राहून त्यांची जेवढी सेवा केली असती आणि काळजी घेतली असती, त्याहून कितीतरी अधिक पटींनी आश्रमातील साधक त्यांची काळजी घेत आहेत अन् त्यांची सेवा करत आहेत. ही परात्पर गुरु डॉक्टरांची कृपाच आहे. ‘गुरु शिष्याला, तसेच साधकांना पितृऋणातून मुक्त करतात’, याचीच अनुभूती आम्ही घेत आहोत. त्यासाठी आम्ही परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे (मुलगा) (राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती) देहली आणि आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती चारुदत्त पिंगळे (सून), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.८.२०२१)
१. गुणवैशिष्ट्ये
१ अ. आश्रमजीवनाशी समरस होण्याचा प्रयत्न करणे : ‘माझी आजी (सौ. कमलिनी पिंगळे, ६३ टक्के आध्यात्मिक पातळी) आणि आजोबा (श्री. प्रभाकर पिंगळे, ६३ टक्के आध्यात्मिक पातळी) गेल्या १० मासांपासून सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात वास्तव्याला आहेत. ‘त्यांचे आश्रमजीवनाशी समरस होण्याचे प्रयत्न गतीने चालू आहेत’, असे मला जाणवते.
१ आ. आवड-नावड आणि आसक्ती अल्प होणे ः आजीची जेवणाविषयीची आवड-नावड आणि वस्तूंविषयीची आसक्ती न्यून झाल्यासारखी जाणवते. ती आश्रमातील महाप्रसाद आनंदाने ग्रहण करते.
१ इ. ‘नात जवळ असावी’, अशी अपेक्षा नसणे ः मी आणि आजी-आजोबा अनुमाने १ ते दीड मास वेगळ्या खोल्यांत रहात होतो; मात्र या कालावधीत त्यांनी ‘मी त्यांच्या जवळच रहायला हवे’, असा आग्रह कधी केला नाही किंवा तसे कधी विचारलेही नाही. आम्ही प्रतिदिन २ – ३ घंटे एकत्र असायचो.
१ ई. मंत्रपठण करणे आणि स्तोत्र म्हणणे ः सध्या आजी-आजोबा ढवळी येथे रहात आहेत. आश्रमात ज्याप्रमाणे सकाळी आणि सायंकाळी ठराविक वेळी आरती असते, त्याच वेळी आजी ‘सनातन चैतन्यवाणी ॲप’च्या माध्यमातून आरती लावते आणि ती स्वतः म्हणते. आश्रमात सकाळी १० वाजता दत्तमाला मंत्राचे पठण करतात, त्याच वेळी आजी घरी पठण करते. आजी सायंकाळी ‘श्रीरामरक्षास्तोत्र आणि हुनमान चालीसा’ म्हणते. यातून तिची सत्मध्ये रहाण्याची तळमळ दिसून आली.
१ उ. देवाच्या अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करणे ः एकदा आजोबा आजीला म्हणाले, ‘‘मला कृष्ण हवा आहे. तो तुझ्याशी बोलतो; पण माझ्याशी बोलत नाही.’’ तेव्हा आजीने त्यांना सांगितले, ‘‘तुम्ही श्रीकृष्णाचे नाम घ्या आणि त्याच्याशी बोला. म्हणजे तो तुमच्याशी बोलेल. परात्पर गुरु डॉक्टरांचे नाव घेतले, तर तेही तुमच्याशी बोलतील. तुम्ही ‘श्री गुरुदेव दत्त !’, असा नामजप करत दत्तगुरूंशी बोललात, तर तेसुद्धा तुमच्याशी बोलतील.’’ त्या वेळी आजोबांनी लगेचच नामजप चालू केला. नंतर त्यांनी अकस्मात् हात जोडून नमस्कार केला आणि म्हणाले, ‘‘परात्पर गुरु डॉक्टर आले आहेत. त्यांना माझा नमस्कार !’’ यातून ‘ते दोघेही देवाच्या अनुसंधानात असतात’, असे लक्षात आले.
१ ऊ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या अनुसंधानात रहाणे
१. आजोबांची स्मृती अल्प झाली आहे, तरीही ते प.पू. गुरुदेवांच्या अनुसंधानात असतात. एकदा त्यांना ‘समोर कुणी देवता दिसतात का ? रेणुकादेवी, दत्तात्रेय दिसतात का ?’, असे विचारले असता ते म्हणाले, ‘‘मला समोर प.पू. गुरुदेव दिसतात.’’
२. ते मधून मधून म्हणतात, ‘‘परात्पर गुरु डॉक्टरांना सांगा, ‘माझे सर्व तुम्हीच करा. मी परत इथेच जन्म घेणार आहे.’’ आजोबा कधी कधी ‘परम पूज्य’ अशी हाक मारतात. ते म्हणतात, ‘‘मला परात्पर गुरुदेवांची सेवा करायची आहे.’’
३. परात्पर गुरु डॉक्टर प्रथम आजोबांना भेटल्यावर त्यांनी आजोबांना सांगितले होते, ‘‘आता तुम्ही आश्रमातच रहा.’’ त्या वेळी आजोबांनी त्यांना सांगितले, ‘‘मला इथे रहायचे नाही.’’ आता आजोबांना हे आठवल्यावर त्यांना त्यांच्या बोलण्याची खंत वाटते. त्यामुळे आता ते म्हणतात, ‘‘परात्पर गुरु डॉक्टर, मला क्षमा करा.’’ परात्पर गुरुदेवांचे नाव घेतले की, ते लगेच हात जोडून नमस्कार करतात.
४. आजोबा कधी कधी ‘काय बोलतात ?’, ते लक्षात येत नाही. एकदा आम्ही त्यांच्याकडे गेल्यावर ते अकस्मात् त्यांच्या संपत्तीविषयी (प्रॉपर्टीविषयी) बोलू लागले. ते म्हणाले, ‘‘माझी सगळी संपत्ती परात्पर गुरु डॉक्टरांची आहे.’’
१ ए. आजीने आजोबांची सेवा न थकता अव्याहत करणे आणि स्वतःला मिळालेला आनंद आजोबांनाही मिळण्यासाठी प्रयत्न करणे ः आजी आजोबांची सेवा न थकता अव्याहत करत असते. सद्गुरु पिंगळेकाकांच्या वाढदिवसानिमित्त साधकांनी एक लहानशी ध्वनीचित्र चकती बनवली होती. ती चकती मी आजीला दाखवली. त्या वेळी आजी लगेच भ्रमणभाष हातात घेऊन आजोबांना पहायला सांगू लागली. आजोबांना दिसत नाही; पण ‘स्वतःला मिळालेला आनंद त्यांनाही मिळावा’, असे तिला वाटते.
१ ऐ. आजोबांना नामजप करायला सांगितल्यावर त्यांनी नामजप करणे ः वयोमानानुसार आजोबा पुष्कळ वेळा लहान मुलाप्रमाणे वागतात. ते कधी कधी असंबद्ध बोलतात. तेव्हा त्यांना ‘श्री गुरुदेव दत्त !’ हा नामजप करा’, असे सांगितले की, ते नामजप करतात आणि शांत होतात.
१ ओ. आजीने भाववृद्धी सत्संग ऐकणे आणि भावावस्थेत रहाणे ः आजी भाववृद्धी सत्संग समरस होऊन ऐकते. त्या वेळी भ्रमणभाषवर एखाद्या देवतेचे चित्र आले, तर ती लगेचच नमस्कार करते. यातून तिचा भाव व्यक्त होतो आणि ती भावस्थितीत रहाते.
१ औ. भाव
१. आजी-आजोबांच्या समवेत जे साधक सेवा करतात, ते पाहून आजी म्हणते, ‘‘ते श्रावणबाळासारखी सेवा करतात.’’
२. आजींच्या प.पू. गुरुदेवांप्रतीच्या भावात पुष्कळ वृद्धी झाली आहे. ती म्हणते, ‘‘त्यांच्या कृपेमुळेच झाले. आम्ही त्यांच्याच कृपाछत्राखाली आहोत.’’
३. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याविषयी आजीच्या मनात पुष्कळ भाव आहे. त्या यज्ञाला बसतात, तर ‘तिथे साक्षात् देवीच बसली आहे’, असे तिला वाटते. तिच्या मनात यज्ञयागाप्रतीही पुष्कळ भाव आहे.
२. जाणवलेले पालट
अ. आजीच्या केसांवर पिवळसर छटा आली आहे. तिचे पांढरे झालेले केस चमकतात.
आ. आजोबांच्या डोळ्यांभोवतीची त्वचा काळी झाली आहे; परंतु त्यांचा तोंडवळा तेजस्वी दिसतो.’
– सौ. वैदेही गुरुप्रसाद गौडा (नात, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), मंगळूरू (१५.८.२०२१)