उदय माहूरकर लिखित ‘वीर सावरकर – द मॅन हू कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टीशन’ या पुस्तकाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते होणार प्रकाशन !

केंद्रीय माहिती आयोगाचे आयुक्त असून ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्‍लेषक आहेत पुस्तकाचे लेखक उदय माहूरकर !

‘वीर सावरकर – द मॅन हू कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टीशन’ पुस्तकाचे मुखपृष्ठ

मुंबई – स्वातंत्र्यवीर सावरकर हे भविष्यातील घटनांचा अचूक अनुमान वर्तवणारे दूरदर्शी नेतृत्व होते. याची तत्कालीन कागदपत्रांच्या पुराव्यांसह सविस्तर माहिती देणारे पुस्तक केंद्र सरकारचे माहिती आयुक्त, ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्‍लेषक उदय माहूरकर यांनी चिरायू पंडित यांच्या सहकार्याने लिहिले आहे. ‘रूपा पब्लिकेशन’द्वारे प्रकाशित ‘वीर सावरकर – द मॅन हू कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टीशन’ (स्वातंत्र्यवीर सावरकर – अशी व्यक्ती जी भारताची फाळणी रोखू शकली असती) असे या पुस्तकाचे नाव असून १२ ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते देहली येथे या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

भारताची फाळणी रोखण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी शेवटपर्यंत केलेल्या प्रयत्नांचे तत्कालीन कागदपत्रांसहित पुरावे देऊन या पुस्तकात विश्‍लेषण करण्यात आले आहे. चीनसमवेत झालेल्या युद्धाचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ८ वर्षे आधीच भाकीत केले होते. फाळणीनंतर भारताला अणूबाँबने सज्ज करण्याचा सल्लाही सावरकर यांनीच नेहरू यांना दिला होता; मात्र अशी कोणतीच पावले न उचलण्यात आल्याने भारताला प्रगतीसाठी २५ वर्षांहून अधिक काळ लागला. तोपर्यंत चीनने आगेकूच करत भारतास मागे टाकले होते, असे अनेक संदर्भ या पुस्तकात देण्यात आले आहेत.