‘सनातनच्या साधिका सौ. राधा रवींद्र साळोखे आणि कु. शीतल चिंचकर यांना कै. (सौ.) चंद्ररेखा जाखोटिया (जीजी) यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
सौ. राधा रवींद्र साळोखे, सनातन आश्रम, देवद, पनवेल
१. आजारपणातही परिस्थिती स्वीकारून नेहमी सकारात्मक आणि उत्साही रहाणे अन् आध्यात्मिक प्रगती करून घेणे
‘मी वर्ष २०१४ पासून जीजींना ((कै.) सौ. चंद्ररेखा जाखोटिया यांना) ओळखते. जीजींच्या कंबरेखालचा भाग निकामी झाला होता; पण त्यांनी ती परिस्थिती स्वीकारली होती. ‘या स्थितीत मी काय करू शकते ?’, याचे चिंतन करून त्या साधनेचे प्रयत्न करायच्या. त्याही स्थितीत त्यांनी साधनेचे चांगले प्रयत्न केले आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून त्या जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाल्या. शारीरिक स्थितीमुळे त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी इतरांवर अवलंबून रहावे लागायचे; पण त्यांनी ती परिस्थिती स्वीकारून त्यावर मात केली. एवढ्या आजारपणातही त्या नेहमी सकारात्मक आणि उत्साही असायच्या.
२. प्रेमभाव
अ. शारीरिक थकव्यामुळे मी बर्याचदा आश्रमातील खोलीतच थांबायचे. तेव्हा जीजी माझ्या यजमानांकडे ‘लवकर बरी होऊन खाली ये’, असा मला निरोप पाठवायच्या.
आ. त्या नाशिकला त्यांच्या माहेरी जायच्या. तेव्हा मला गोड पदार्थ आवडत असल्याने माझ्यासाठी आठवणीने गोड खाऊ घेऊन यायच्या.
३. व्यष्टी साधनेची तळमळ
तीव्र शारीरिक त्रासांतही त्या स्वभावदोष निर्मूलनासाठी सारणी लिखाण करणे, स्वयंसूचना सत्र करणे, तसेच दैनंदिनी लिहिणे इत्यादी सर्व प्रयत्न नियमित होण्यासाठी प्रयत्न करायच्या. त्यात त्यांनी कधीच सवलत घेतली नाही.
४. सेवेची तळमळ
अ. जीजींना पायांत असह्य वेदना व्हायच्या. त्यामुळे त्या झोपूनच जपमाळा सिद्ध करण्याची सेवा करायच्या. दुपारनंतर थोडे बरे वाटल्यावर त्या टंकलेखनाची सेवा करायच्या.
आ. समाजातील जिज्ञासूंकडून येणारे प्रश्न, तसेच अडचणी यांची दूरभाषद्वारे निवारण करण्याची, तसेच त्यांना साधना सांगण्याची सेवा काही काळ जीजींकडे होती. त्यांनी त्या सेवेची घडी बसवण्याचाही प्रयत्न केला.
कोणत्याही स्थितीत त्या सेवारत रहाण्याचा प्रयत्न करायच्या. एवढ्या तीव्र शारीरिक त्रासांत त्या ५ – ६ घंटे सेवा, तसेच त्यांचे नामजपादी उपाय पूर्ण करायच्या.
देवाने जीजींच्या माध्यमातून हे सर्व शिकण्याची मला संधी दिली. यासाठी कोटीशः कृतज्ञता ! ‘त्यांची पुढील आध्यात्मिक प्रगती जलद गतीने व्हावी’, अशी परात्पर गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना !’ (२१.६.२०२१)
कु. शीतल चिंचकर
१. तीव्र वेदना होत असतांनाही सेवेची प्रत्येक संधी शोधून सेवा करणे
जीजींना सेवेची पुष्कळ तळमळ होती. त्यांच्या पायांत तीव्र वेदना व्हायच्या, तरीही त्या संगणकावर टंकलेखन करायच्या आणि संकलन शिकण्याचा प्रयत्न करायच्या. त्या जपमाळा बनवण्याची सेवाही करायच्या. त्यांना रुग्णालयात भरती केले असतांना मी १ मास त्यांच्या समवेत होते. तेथे त्यांनी ‘सनातनची सात्त्विक उत्पादने आणि सनातनचे ग्रंथ’ यांच्या वितरणाची (विक्रीची) सेवा केली. तीव्र वेदना होत असतांनाही त्या सेवेची प्रत्येक संधी शोधायच्या.
२. दुखण्यामुळे चालत जाऊन सेवा करू शकत नसल्याने परात्पर गुरुदेवांना ‘माझ्याकडून हातांनी सेवा करून घ्या’, अशी प्रार्थना करणार्या सौ. जीजींची सेवेची तळमळ !
वर्ष २०१७ मध्ये सौ. जीजींची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली. त्या निमित्ताने झालेल्या त्यांच्या सत्काराच्या वेळी मनोगत व्यक्त करतांना त्या म्हणाल्या होत्या, ‘‘मी प्रतिदिन परात्पर गुरुदेवांना सांगते, ‘दुखण्यामुळे मी चालत जाऊन सेवा करू शकत नाही; पण तुम्ही मला हात दिले आहेत, तर माझ्याकडून हातांनी सेवा करून घ्या.’’ त्यांच्या बोलण्यातून त्यांची सेवेची तळमळ आणि दुर्धर आजारपणाविषयी त्यांच्या मनात असलेली सकारात्मकता शिकायला मिळाली.
३. मनात येणारे नकारात्मक विचार जाण्यासाठी भावाच्या स्तरावर प्रयत्न करणे
शारीरिक वेदनांची तीव्रता वाढल्यावर काही वेळा जीजींच्या मनात नकारात्मक विचार यायचे. त्यावर मात करण्यासाठी त्यांनी भावाच्या स्तरावरील प्रयत्न वाढवले.
४. परात्पर गुरुदेवांप्रती पुष्कळ भाव असणे
जीजींच्या मनात परात्पर गुरु डॉक्टरांप्रती पुष्कळ भाव होता. त्या भावपूर्ण प्रार्थना करायच्या आणि भावपूर्ण प्रार्थना केल्यावर ‘मन शांत होऊन परात्पर गुरुदेवांची आठवण येते’, असे सांगायच्या.’ (२८.६.२०२१)