मूळच्या सांगली येथील कै. (सौ.) चंद्ररेखा जाखोटिया मागील ११ वर्षांपासून सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमात रहात होत्या. १६.६.२०२१ या दिवशी त्यांचे निधन झाले. त्यांच्या धाकट्या जाऊबाई सौ. विद्या जाखोटिया यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. कै. (सौ.) चंद्ररेखा (जीजी) ‘जाऊबाई’ न वाटता मोठ्या बहिणीप्रमाणे वाटून साधिकेला त्यांचा आधार वाटणे
‘कै. (सौ.) चंद्ररेखा जाखोटिया माझ्या मोठ्या जाऊबाई होत्या. मी तिला मोठी बहीण म्हणून ‘जीजी’ असेच म्हणायचे. तीसुद्धा मोठ्या बहिणीप्रमाणे मला सर्व साहाय्य करत असल्याने मला तिचा आधार वाटायचा. तिच्यामुळे मला माझे सासर हे माहेरासमानच वाटायचे. मला माझ्या अडचणी तिला मनमोकळेपणाने सांगता यायच्या.
२. साधनेला आरंभ केल्यावर झोकून देऊन सेवा करणे
आम्ही दोघींनी एकत्रितच सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करण्यास आरंभ केला. तिने साधनेच्या पहिल्या दिवसापासून झोकून देऊन सेवा केली.
३. स्वतःच्या मुलांसमवेत धाकट्या जाऊबाईंच्या लहान मुलांनाही सांभाळणार्या जीजी !
३ अ. साड्यांचा व्यवसाय करतांना धाकट्या जाऊबाईला बाहेरगावी जावे लागल्यावर जीजींनी तिच्या लहान मुलांनाही सांभाळणे : माझ्या जीवनात प्रतिकूल प्रसंग आल्याने मला साड्यांचा व्यवसाय करावा लागला. मला साड्या विकत घेण्यासाठी सुरत, इंदूर आणि कोलकाता येथे जावे लागायचे. मी आणि माझे यजमान ८ ते १२ दिवस बाहेरगावी असायचो. त्या वेळी माझी मुले सुयोग आणि सुप्रिया लहान होती. आम्ही बाहेरगावी गेल्यावर माझी मुले जीजींकडे रहायची. मला तिचे पुष्कळ साहाय्य व्हायचे.
३ आ. जाऊबाई धर्मप्रसारासाठी बाहेरगावी गेल्यावर जीजींनी तिच्या मुलांची ‘आई’ बनून काळजी घेणे आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘तुम्हाला २ नाही, तर ४ मुले आहेत’, असे समजा’, असे सांगणे : मी धर्मप्रसारासाठी ४ वर्षे बाहेरगावी होते. त्या वेळी माझी मुले (सुयोग आणि सुप्रिया) लहान होती. तेव्हा जीजी ‘आई’ म्हणून त्यांची काळजी घ्यायची. मुलेही तिच्या सान्निध्यात आनंदाने रहायची. त्यामुळे मला मुलांची काळजी वाटायची नाही. एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी जीजीला सांगितले, ‘‘तुम्हाला २ नाही, तर ४ मुले आहेत’, असे समजा !’’ (माझी २ मुले आणि जीजीची २ मुले अशा ४ मुलांची ती आई होती.)
४. ‘हर्निया’चे शस्त्रकर्म झाल्यावर जीजींच्या कंबरेखालील भाग निष्क्रीय होणे आणि साधनेचा ध्यास असल्याने जीजींनी आश्रमात राहून संगणक शिकून संगणकीय सेवा करणे
जीजीचे ‘हर्निया’चे (‘अंतर्गळ’ म्हणजे अवयवांना त्यांच्या जागी स्थिर ठेवणारे स्नायू शिथिल झाल्याने अवयव गळणे) शस्त्रकर्म करण्यात आले. तेव्हापासून तिचा कंबरेच्या खालचा भाग निष्क्रीय झाला. गुरुचरणांचा ध्यास लागल्याने ‘कोणत्याही परिस्थितीत साधना सोडायची नाही’, असे जीजीला वाटत असल्याने ती आश्रमात राहून वैद्यकीय उपचार घेत सेवाही करू लागली. सेवेसाठी तिने संगणक शिकून घेतला.
५. श्री. आनंद (जीजींचा धाकटा मुलगा) आणि अन्य कुटुंबीय यांनी जीजींची मनोभावे सेवा करणे अन् संतांनी ‘आनंद आईच्या ऋणातून मुक्त झाला’, असे सांगणे
जीजीच्या शारीरिक त्रासांची तीव्रता दिवसेंदिवस वाढत होती. मी तिचे त्रास शब्दांत सांगूही शकत नाही. श्री. आनंद (जीजींचा धाकटा मुलगा), अन्य कुटुंबीय आणि आश्रमातील साधक यांनी जीजीची पुष्कळ मनोभावे सेवा केली. एका संतांनी आनंदला सांगितले, ‘‘आनंद आईच्या ऋणातून मुक्त झाला !’’
६. आश्रमातील चैतन्य आणि परात्पर गुरुमाऊलींची कृपा यांमुळे जीजींचे तीव्र प्रारब्ध सुसह्य होणे अन् परात्पर गुरुमाऊलींनी त्यांच्या पूर्ण कुटुंबाचा उद्धार करणे
जीजीला होणारा तीव्र त्रास आणि तिचे प्रारब्ध हे आश्रमातील चैतन्य, संतांचे आशीर्वाद, आध्यात्मिक उपाय अन् गुरुमाऊलींची कृपा यांमुळेच सुसह्य झाले. नातेवाईक आणि परिचित जीजीला भेटायला आश्रमात येत. तेव्हा आश्रमातील साधकांनी केलेले साहाय्य पाहून सर्वजण थक्क होत. हे केवळ आणि केवळ सनातन संस्थेमध्येच होऊ शकते. गुरुचरणांचा ध्यास लागलेला जीव आणि त्याचे पूर्ण कुटुंब यांचा गुरुमाऊलींनी उद्धार केला. जीजी जीवनमुक्त झाली आणि तिच्या जन्माचे सार्थक झाले.
हे गुरुमाऊली, जीजीच्या जीवनप्रवासातून पुष्कळ शिकण्यासारखे आहे. आम्हा सर्व साधकांसमोर तिचा आदर्श आहे. तिच्यातील सहनशीलता, व्यापकता, प्रेमभाव, गुरुचरणांचा ध्यास, चिकाटी आदी सर्व गुण माझ्यातही येऊ देत. ‘कोणत्याही स्थितीत गुरुचरणांचा ध्यास सुटू नये’, अशी आपल्या चरणी प्रार्थना !’
– सौ. विद्या जाखोटिया (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सांगली (कै. (सौ.) चंद्ररेखा जाखोटिया यांच्या धाकट्या जाऊबाई)
(२.७.२०२१)