देहलीतील न्यायालयात दोघा गुंडांकडून एका गुंडाची गोळ्या झाडून हत्या

पोलिसांच्या गोळीबारात दोघे आक्रमणकर्ते गुंड ठार

साधे गुंड दिवसाढवळ्या न्यायालयात पोलिसांच्या उपस्थितीत एखाद्याची हत्या करू धजावतात, तर प्रशिक्षित आणि आधुनिक शस्त्रांनी सज्ज असणारे जिहादी आतंकवादी देशाच्या राजधानीत कधीही अन् कुठेही आक्रमण करून कुणालाही ठार करू शकतात, हे पोलिसांना लज्जास्पद ! – संपादक

घटनास्थळ (वर्तुळात) ठार झालेला गुंड जितेंद्र उपाख्य गोगी

नवी देहली – देशाची राजधानी देहलीतील रोहिणी न्यायालयात दोघा गुंडांनी जितेंद्र उपाख्य गोगी या कुख्यात गुंडाची गोळ्या झाडून हत्या केली. त्या वेळी न्यायालयात सुरक्षेसाठी तैनात असणार्‍या पोलिसांनी गोगी याची हत्या करणार्‍या दोघा गुंडांना गोळ्या झाडून ठार केले. ठार झालेल्या या दोघा गुंडांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. हे दोघेही अधिवक्त्यांच्या वेशात न्यायालयात आले होते. जितेंद्र उपाख्य गोगी गेल्या २ वर्षांपासून तिहार कारागृहात अटकेत होता. त्याला खटल्याच्या सुनावणीसाठी न्यायालयात आणण्यात आले होते. त्या वेळी ही घटना घडली. गोगी याची हत्या करणारे टिल्लू टोळीचे गुंड होते. ठार झालेल्या दोघा गुंडांपैकी एकावर ५० सहस्र रुपयांचे बक्षीस होते.