प्रेमळ, स्थिर आणि समंजसपणा असणारे सांगोला येथील कै. अशोक गजानन देशमुखे यांच्या मृत्यूपूर्वी अन् मृत्यूनंतर त्यांच्या सुनेला जाणवलेली सूत्रे !

कै. अशोक देशमुखे

‘माझे सासरे कै. अशोक गजानन देशमुखे (वय ७१ वर्षे) यांना २७.१०.२०२० या दिवशी देवाज्ञा झाली. त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनाच्या आधी अन् नंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

१. गुणवैशिष्ट्ये

माझे सासरे पुष्कळ समंजस, प्रेमळ आणि नीटनेटके होते. ते सर्वांना सांभाळून घ्यायचे अन् सर्वांशी आदराने बोलायचे.

सौ. सविता देशमुखे

२. सासर्‍यांना रुग्णालयातून घरी परत आणल्यावर त्यांच्यात चांगले पालट होणे

त्यांना न्यूमोनिया झाल्याने २८ दिवस म्हणजे १३.९.२०२० पर्यंत त्यांना सोलापूर येथील रुग्णालयात भरती केले होते. तेथून परत सांगोला येथे घरी आल्यावर त्यांच्यात पुष्कळ चांगले पालट जाणवले. ते एखाद्या लहान मुलाप्रमाणेच वागत होते. त्यांना कुणी काही म्हणाले, तरी ते शांतपणे ऐकायचे. ते कुणी काही सांगेल, ते करायचे. त्यांनी दत्ताचा नामजप करण्यास आरंभ केला होता.

३. हृदयविकाराचे झटके येऊनही शांत आणि स्थिर रहाणे

त्यांना २६.१०.२०२० या दिवशी त्रास होत होता, तरीही ते स्थिर होते आणि ‘काय होत आहे ?’, याविषयी कुणाला सांगत नव्हते. दुपारी अडीचच्या सुमाराला त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तरीही ते स्थिर होते आणि मी ‘मी बरा आहे’, असेच म्हणत होते. दुसर्‍या दिवशी दुपारी त्यांना दुसरा झटका आला. त्या वेळी स्थानिक वैद्यांनी आम्हा सर्व कुटुंबियांना बोलावले आणि म्हणाले, ‘‘त्यांना त्वरित रुग्णालयात घेऊन जावे लागेल.’’ हे ऐकल्यावरही ते स्थिर आणि शांत होते. आम्ही त्यांना अकलूजला नेण्याचे ठरवले. त्या वेळीही ते एखाद्या निरागस मुलासारखे गाडीत बसले.

४. सासर्‍यांची जीभ आणि पाय जड होणे अन् रुग्णालयात पोचण्यापूर्वीच त्यांना मृत्यू येणे

माझे यजमान (श्री. संतोष) सासर्‍यांना अकलूजला घेऊन गेले होते. ‘ते पोचले का ?’, हे विचारण्यासाठी मी यजमानांना भ्रमणभाष केला. त्या वेळी सासरे माझ्याशी बोलले. ते मला म्हणाले, ‘‘सविता, माझी जीभ आणि पाय जड झाले आहेत.’’ तेव्हा मला प्रथमोपचार वर्गात शिकवलेले आठवले आणि ‘त्यांची स्थिती गंभीर होत चालली आहे’, हे मला जाणवू लागले. मी श्रीकृष्ण आणि गुरुमाऊली यांना प्रार्थना केली, ‘हे श्रीकृष्णा, हे गुरुमाऊली, तुम्हीच योग्य काय ते करा. त्यांचा त्रास तुम्हीच दूर करा. तुम्हाला जे अपेक्षित आहे, ते घडवा आणि आम्हाला ते स्वीकारता येऊ दे.’ अशी २ मिनिटे प्रार्थना केल्यावर मला भ्रमणभाष आला आणि त्यांनी शेवटचा श्वास माझ्या यजमानांच्या खांद्यावर सोडल्याचे मला कळले.

५. सासर्‍यांच्या मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे

५ अ. गुरुकृपेने घरातील सर्वजण स्थिर असणे आणि सासर्‍यांचा तोंडवळा पुष्कळ तेजस्वी दिसणे : सासर्‍यांच्या पश्चात ४ मुले, ४ सुना, एक विवाहित मुलगी आणि ५ नातवंडे आहेत. ते गेल्यावर घरातील सर्वजण स्थिर राहिले होते. विशेष म्हणजे सासूबाई लवकर स्थिर झाल्या. ‘हीसुद्धा गुरूंचीच कृपा आहे’, असे मला वाटते. रात्री ९.३० वाजता सासर्‍यांचा मृतदेह घरी आणला. रात्री अडीचच्या सुमारास त्यांचा तोंडवळा पुष्कळ तेजस्वी दिसत होता आणि प्रसन्न वाटत होते. त्या वेळी कुणालाच कसलीच भीती, ताण किंवा त्रास जाणवला नाही.

५ आ. कावळ्याने त्वरित अन्नाला स्पर्श करणे : निधनानंतर तिसर्‍या दिवशी कावळ्यासाठी ठेवलेल्या अन्नाला कावळ्याने त्वरित स्पर्श केला. त्या वेळी माझ्याकडून पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली. काही जण म्हणत होते, ‘यापूर्वी या घरातील ६ ते ७ माणसे गेली. तेव्हा कावळ्याने लगेच स्पर्श केला नव्हता.’

५ इ. चौथ्या दिवशी सकाळी कावळ्याने चहा पिणे, ‘त्याने असे प्रतिदिन करू नये आणि सासर्‍यांच्या लिंगदेहाला गती मिळावी’, यासाठी साधिकेने केलेली प्रार्थना गुरुमाऊलींनी ऐकल्याचे जाणवणे : चौथ्या दिवशी सकाळी मी चहा पित असतांना एक कावळा पुष्कळ ओरडत होता. त्या वेळी सासूबाई म्हणाल्या, ‘‘माडीवर चहा नेऊन ठेव.’’ मी तिथे चहा ठेवल्यावर कावळा लगेच चहा पिऊन गेला. ‘प्रतिदिन असे केले, तर लिंगदेहाला गती मिळत नाही’, हे मला इतरांकडून समजले. यामुळे मी दुसर्‍या दिवशी पहाटेच सासर्‍यांना प्रार्थना केली, ‘तुम्ही आमच्यात अडकू नका.’ नंतर मी गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘गुरुदेव, तुम्हीच त्यांची साधना करवून घ्या आणि त्यांना गती द्या.’ त्या दिवसापासून एकही कावळा आला नाही. ‘गुरुदेव माझी प्रत्येक प्रार्थना ऐकत आहेत’, याची मला जाणीव होऊन गुरुदेवांच्या प्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.’

– सौ. सविता संतोष देशमुखे, सांगोला (कै. अशोक गजानन देशमुखे यांची सून) (१९.१२.२०२०)