भारताने विश्वविजयी व्हावे !

संपादकीय

  • भारताच्या क्षेपणास्त्राला विरोध करणारा चीन म्हणजे ‘चोर तो चोर, वर शिरजोर !’
  • भारत संरक्षण क्षेत्रात सामर्थ्यशाली झाल्यास तो दिवस विश्वविजयाचा असेल !

अंतराळातील वाटचाल असो किंवा संरक्षणदलाच्या दृष्टीने केलेली युद्धसज्जता असो, या सर्व गोष्टी संपूर्ण विश्वासाठी नवीन राहिलेल्या नाहीत; कारण बरीच राष्ट्रे त्यात स्वयंपूर्ण होऊ पहात आहेत. काही यशस्वी ठरतात, तर काही अयशस्वी ! असे असले, तरी प्रत्येक राष्ट्र विविध पद्धतींनी बलशाली होत विश्वात स्वत:ची मोहोर उमटवण्याचा प्रयत्न करत आहे. भारतानेही आजपर्यंत अत्याधुनिक शस्त्रे, विमाने, तसेच क्षेपणास्त्रे विकसित केली, नव्हे अजूनही तो करतच आहे. या कामगिरीमुळे संपूर्ण आशिया खंडात भारतालाही अन्य मोठ्या राष्ट्रांप्रमाणेच मानाचे स्थान मिळाले आहे. याच मानाच्या शिरपेचात तुरा खोवणारे ‘अग्नी-५’ हे क्षेपणास्त्र त्यामुळेच महत्त्वाचे ठरत आहे. आपण सर्वजण या क्षेपणास्त्राचे नाव ऐकून आहोतच. भारत पुन्हा एकदा या आंतरखंडीय क्षेपणास्त्राच्या चाचणीची सिद्धता करत आहे. यातून भारताची युद्धक्षमता वाढेल आणि ती सुधारेलही. अणूस्फोटके वाहून नेण्याची क्षमता असलेले ‘अग्नी-५’ हे विश्वातील अत्यंत घातक क्षेपणास्त्रांपैकी एक मानले जाते. अमेरिका, रशिया, फ्रान्स, चीन आणि उत्तर कोरिया या देशांकडे अशा प्रकारची क्षमता असलेली क्षेपणास्त्रे आहेत. भारतानेही आतापर्यंत पाच वेळा ‘अग्नी-५’ची चाचणी केली; मात्र यंदाची चाचणी विशेष महत्त्वाची आहे. चीनची राजधानी बीजिंग आणि तेथील १९ महत्त्वाची शहरे या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येत असल्याने चीनच्या उरात धडकी भरली आहे. ‘भारताने ही चाचणी रोखावी अन्यथा शस्त्रस्पर्धा भडकेल’, अशी भीती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी व्यक्त केली. प्रवक्त्यांचे विधान पहाता शस्त्रस्पर्धा नेमकी कोण भडकावू पहात आहे ?, हे विश्वाला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे चीनने भारतावर बिनबुडाचे आरोप करणे अत्यंत चुकीचे आहे. भारताच्या क्षेपणास्त्राला विरोध करू पहाणारा चीन म्हणजे ‘चोर तो चोर, वर शिरजोर’, असेच आहे. प्रत्येक वेळी विध्वंसक पाऊल उचलूनही चीन स्वतः निष्पाप आणि निष्कंलक असल्याप्रमाणेच वर्तन करत असतो; पण त्याच्या छुप्या कारवाया, धमक्या आणि षड्यंत्रे हे सर्व भारत जाणून आहे. चीन भारताच्या क्षेपणास्त्राला घाबरतो, ही आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. यातूनच भारताचे सैनिकी सामर्थ्य लक्षात येते. ज्या वेळी लडाखच्या खोर्‍यात ‘राफेल’ या लढाऊ विमानांचा सराव चालू होता, तेव्हाही चीन घाबरला होता. त्याने तेथील सीमेवर ३६ विमाने तैनात केली. आधी तेथे केवळ १२ विमानेच होती. चीनच्या विमानांची उड्डाणक्षमता भारताच्या विमानांपेक्षा तुलनेत बरीच अल्प आहे. त्यामुळे राफेल विमाने ही आपल्यासाठी जमेचीच बाजू ठरणार आहे. अर्थात् भारताने इतक्यावरच समाधान न मानता त्यात स्वयंपूर्ण आणि शक्तीशाली होणे अत्यावश्यक आहे. पाकिस्तान आणि चीन यांचे संगनमत असल्याचे वारंवार दिसून येत असल्याने भारताने युद्धसज्जच रहायला हवे. वर्ष १९४५ नंतर अणूबाँबचा वापर विश्वात झालेला नाही; पण अणूबाँब टाकण्यासाठी त्याला घेऊन जाणारे वाहनही उपलब्ध असावे लागते. भूदल आणि वायूदल अणूबाँबच्या आक्रमणासाठी सक्षम आहेत; पण नौदलामध्ये तशी सुविधा अद्याप नाही. ‘अग्नी-५’ची चाचणी यशस्वी झाल्यास आपण संपूर्ण सामर्थ्यानिशी चीनचा सामना करू शकतो. पाकिस्तानकडे साधारणतः १०० आणि चीनकडे २५० च्या आसपास अणूबाँब असण्याची शक्यता वर्तवली जाते; पण भारत या तुलनेत थोडा मागे आहे. चीन आणि पाक या शत्रूराष्ट्रांसमवेत युद्धभूमीवर उतरायचे असेल, तर आपले सैनिकी सामर्थ्य उत्तरोत्तर वाढवत नेणे भारताला क्रमप्राप्त आहे.

चीनची धोकादायक कृत्रिमता !

चीन शस्त्रस्पर्धा भडकण्याची भाषा करतो; पण मुळात ती निर्माण करावी लागते, ती अशा शत्रूराष्ट्रांच्या कुरघोड्यांमुळेच ! आतापर्यंत चीनने विश्वात विध्वंस घडवून आणण्यासाठी काय केले नाही ? ‘कोरोना’सारख्या विषाणूची निर्मिती करून पृथ्वीवर हाहाःकार माजवला. निसर्गाला आव्हान देत चीन आता कृत्रिम पावसाची योजना आखत आहे; पण याचा सर्वाधिक फटका भारतालाच बसणार आहे. चीनमधून भारतात येणार्‍या ब्रह्मपुत्रा नदीवर या कृत्रिम पावसाचा परिणाम होऊन पूरपरिस्थिती उद्भवू शकते. या कृत्रिम पावसामुळे चीन स्वतःच्या देशातील दुष्काळ दूर करील; पण भारतासाठी हा पाऊस म्हणजे मोठे संकटच ठरणार आहे. खर्‍या सूर्यापेक्षा १० पट अधिक शक्तीशाली असणार्‍या सूर्याचीही चीनने निर्मिती केली आहे. अर्थात् निसर्गाच्या विरुद्ध पावले टाकल्यास तो कशा पद्धतीने त्याची परतफेड करतो, हे वेगळे सांगायला नको ! चीनच्या अशा ‘कृत्रिम’ कारवाया पहाता भारताने सावध आणि सतर्क रहायला हवे. हे सर्व उपद्व्याप करूनही चीन भारतालाच शहाणपणा शिकवण्याचे धाडस करतो, हे भारताने लक्षात घ्यावे.

अभिमानास्पद क्षणाची प्रतीक्षा !

भारताचे सैनिकी सामर्थ्य वाढत आहे, हे चांगले आहे; पण ज्याप्रमाणे इस्रायल त्याचा वापर करून शत्रूराष्ट्रांवर वचक बसवतो, तसा वचक आपण निर्माण करायला हवा. त्यामुळे भारताने ‘अग्नी-५’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी लवकरात लवकर करून चीनला सडेतोड उत्तर द्यायला हवे. तसे झाल्यासच प्रत्येक वेळी तिरकस चाल रचणार्‍या विस्तारवादी ‘ड्रॅगन’रूपी चीनला धडा शिकवता येईल आणि भारतात काही प्रमाणात स्थैर्य अन् शांतता लाभेल. क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी होणे, हा क्षण संपूर्ण भारतासाठी खरोखर अभिमानाचा ठरेल, हे निश्चित ! भारताचे संरक्षण क्षेत्र सैन्यातील एकेक शिखर पादाक्रांत करत आहेच. अशाच प्रकारे भारत जेव्हा सर्वसामर्थ्यशाली होईल, तो दिवस देशासाठी खर्‍या अर्थाने विश्वविजयाचा असेल !