श्री साईबाबा संस्थानच्या प्रशासकीय अधिकार्‍यांसह ६ जणांना अटक !

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानची सामाजिक माध्यमांतून अपर्कीती केल्याचे प्रकरण

मंदिरांच्या विश्वस्त मंडळावर केवळ भक्तांचीच नियुक्ती करणे आवश्यक ! – संपादक 

श्री साईबाबा संस्थान, शिर्डी

नगर – शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिरातील जिल्हा न्यायाधीश तथा साई संस्थान समितीचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्या मंदिर भेटीचे ‘सीसीटीव्ही’चे चित्रीकरण सामाजिक माध्यमांसह वृत्तवाहिन्यांना देऊन श्री साईबाबा संस्थानची अपर्कीती केल्याच्या कारणावरून संस्थानच्या प्रशासकीय अधिकार्‍यांसह ६ जणांच्या विरोधात शिर्डी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी श्री साईबाबा मंदिराचे संरक्षण अधिकारी आणि पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार श्री साई संस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप, ‘सीसीटीव्ही’ विभागाचे प्रमुख विनोद कोते, कर्मचारी चेतक सावळे, सचिन गव्हाणे, सोसायटीचे कर्मचारी अजित जगताप आणि राहुल फुंदे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या सर्वांनी ‘पदाधिकार्‍यांच्या मंदिर पहाणीचे संस्थानच्या कह्यातील चित्रीकरण बाहेर खासगी व्यक्तींना पाठवून त्यासमवेत चुकीची आणि अपर्कीतीकारक माहिती प्रसारित केली आहे’, असा त्यांच्यावर आरोप आहे.

१. संस्थानचा कारभार पहाणारे समितीचे अध्यक्ष, मुख्य जिल्हा न्यायाधीश आणि सदस्य अन् साहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी ३१ जुलै २०२१ या दिवशी मंदिर परिसराला भेट दिली होती.

२. बैठक संपल्यानंतर त्यांनी मंदिर परिसरात उपाययोजनांची पहाणी केली; मात्र त्यांच्या या पहाणीचे ‘सीसीटीव्ही’चे चित्रण प्रसारित झाले होते.

३. ‘कोरोनाच्या नियमांचा भंग करून या पदाधिकार्‍यांनी मंदिराला भेट देऊन श्री साईंचे दर्शन घेतले’, असे सांगत हे व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाले होते, तसेच वृत्तवाहिन्यांतून त्या संबंधीच्या बातम्याही प्रसारित झाल्या होत्या.

४. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले होते; मात्र चौकशीमध्ये बराच काळ चालढकल होत होती. शेवटी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी लक्ष घालून यासंबंधी न्यायालयात पाठपुरावा केला. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी चालू झाली. (यावरून कोणतीही चौकशी सरकारी नियमानुसार न होता न्यायालयाच्या आदेशानुसार चालू होते, हे यातून दिसून येते. या गोष्टी न्यायालयाला पहाव्या लागत असेल, तर प्रशासन नावाचा ‘पांढरा हत्ती’ जनतेच्या पैशांतून पोसायचा कशाला ? – संपादक) त्यामध्ये प्रशासकीय अधिकार्‍यांसह ६ जण दोषी आढळून आले आहेत.

शिर्डी येथे श्री साईबाबा मंदिर असले, तरी इतर घडामोडींमुळे मात्र शिर्डी कायम चर्चेत आहे. नियम डावलून कर्मचार्‍यांची नियुक्ती केल्याचा आरोप झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचे स्थानांतर करावे लागले होते. प्रतीक्षेनंतर नवीन विश्वस्त मंडळाची नियुक्ती झाली, तर न्यायालयाने त्यांचेही अधिकार गोठवले आहेत. आता त्यांना न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. त्यातच एका जुन्या प्रलंबित तक्रारीच्या चौकशीत आता संस्थानच्या प्रशाकीय अधिकार्‍यांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली आहे.