कष्टाळू, नम्र, समाधानी आणि नेहमी इतरांचा विचार करणारे जुन्नर (पुणे) येथील कै. दादाभाऊ नानाजी पाटील-नलावडे (वय ८७ वर्षे) !

कै. दादाभाऊ नानाजी पाटील-नलावडे

५.५.२०२० या दिवशी दादाभाऊ नानाजी पाटील-नलावडे यांचे निधन झाले. त्यानिमित्त त्यांची मुले आणि सुना यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, वडिलांची मृत्यूपूर्वीची स्थिती अन् त्यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

१. गुणवैशिष्ट्ये

श्री. रवींद्र नलावडे

१ अ. कष्टाळू

१. ‘माझ्या वडिलांच्या आई-वडिलांचे त्यांच्या लहानपणीच निधन झाल्याने माझ्या वडिलांचा त्यांच्या चुलत्याने (काकांनी) सांभाळ केला. त्यांचे संपूर्ण आयुष्य अत्यंत कष्टात गेले. त्यांचे शिक्षण केवळ चवथी इयत्तेपर्यंत झाले. अवघ्या १ एकर शेतात पिके घेऊन त्यांनी आम्हा बहीण-भावंडांचे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. चुलत्यांपासून विभक्त झाल्यावर त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले.’ – श्री. संदीप नलावडे (धाकटा मुलगा), सनातन संकुल, पनवेल.

२. ‘उतारवयातही (निधनापूर्वी काही दिवस आधी) ते घरात काही ना काहीतरी काम करायचे. भाजी निवडून देणे, नळाला पाणी आल्यावर ते पाईपने मोठ्या पिंपात भरणे इत्यादी कामे ते करायचे.

३. एवढ्या वयातही त्यांनी पाणी तापवण्यासाठी सरपण फोडून त्याचे बारीक तुकडे केले होते.’

– सौ. रोहिणी रवींद्र नलावडे (मोठी सून), घाटकोपर

१ आ. स्वावलंबी : ‘ते या वयातही (निधनापूर्वी) स्वतःची कामे स्वतःच करायचे.’ – श्री. रवींद्र नलावडे (मोठा मुलगा), घाटकोपर

१ इ. उत्तम प्रकृती : ‘त्यांनी लहान असल्यापासून एकदाही मांसाहार केला नाही. त्यांची प्रकृती उत्तम होती. त्यांना कधी कोणताही आजार झाला नाही.

सौ. रोहिणी रवींद्र नलावडे

१ ई. नम्रता : ते लहान-थोर सर्वांशी नेहमी आदराने वागायचे. ते कधीही कुणाला नावाने हाक न मारता त्यांना ‘ताई’ किंवा ‘दादा’ असे संबोधायचे.

१ उ. घरातील मुक्या प्राण्यांवर प्रेम करणे : आमच्याकडे असलेली शेळी त्यांनी ‘बस’ म्हटल्यावर बसायची. ती शेळी त्यांच्याविना रहात नसे. वडील जवळच असलेल्या श्रीराम मंदिरात पोथी वाचनासाठी गेल्यावर ती ओरडत रहायची; म्हणून वडील तिलाही मंदिरात घेऊन जायचे आणि मंदिर परिसरातील खिडकीला बांधून ठेवायचे. तिथे ती वडिलांना पाहून शांत बसायची. इतरांना याचे पुष्कळ आश्चर्य वाटायचे.

१ ऊ. शहरी जीवनाची आवड नसणे : त्यांना पूर्वीपासून गावाला रहायला आवडायचे. मुंबईत ते अधिकाधिक ८ ते १० दिवस रहायचे. दळणवळण बंदीच्या काळात त्यांना एक ते दीड मास मुंबईत रहाण्यासाठी आणले होते. तेव्हा ते म्हणायचे, ‘‘माझे काही बरे-वाईट झाले तरी चालेल; परंतु मला गावी घेऊन चला.’’

१ ए. समाधानी : ते नेहमी समाधानी आणि आनंदी असायचे. त्यांना कसलीही आवड-नावड नव्हती. ते म्हणायचे, ‘‘आता माझी काही इच्छा राहिलेली नाही. ईश्वराने मला भरभरून दिले आहे. माझ्यापेक्षा लहान वयाचे माझे मित्र आणि नातेवाईक माझ्या आधी गेले आहेत. आता काही त्रास न होता गेलेले बरे.’’ ते ‘शेवट गोड होऊ दे’, अशी इच्छा व्यक्त करायचे.’

– श्री. संदीप नलावडे

१ ऐ. सात्त्विक ग्रंथांचे वाचन करणे : ‘देवद आश्रमाच्या संकुलातील आमच्या घरी ते एक मास वास्तव्याला होते. दळणवळण बंदीच्या काळात त्यांनी ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ पूर्ण पाहिला आणि ‘संत भक्तराज महाराज यांचे चरित्र’ हा ग्रंथ वाचला. त्यातून त्यांना पुष्कळ आनंद मिळाला.

श्री. संदीप नलावडे

१ ओ. शिक्षण अल्प असूनही दैनिक ‘सनातन प्रभात’ पूर्ण वाचणे : त्यांचे शिक्षण केवळ चवथीपर्यंत झाले असूनही ते दैनिक ‘सनातन प्रभात’ पूर्ण वाचायचे. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये कु. सोहम्चा (त्यांचा नातू कु. सोहम् संदीप नलावडे याचा) आलेला लेख दाखवल्यावर आणि त्याची आध्यात्मिक पातळी ५७ टक्के असल्याचे समजल्यावर त्यांना आनंद झाला. तेव्हा ते म्हणाले, ‘‘प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरुमाऊली यांची आपल्या कुटुंबावर मोठी कृपा आहे.’’ (ते प्रतिदिन सकाळी अंघोळ करतांना प.पू. भक्तराज महाराज यांचा जयघोष करायचे.)

– सौ. सुप्रिया संदीप नलावडे (धाकटी सून), सनातन संकुल, पनवेल.

१ औ. इतरांचा विचार करणे : ‘माझ्यामुळे कुणालाही त्रास नको’, असे ते म्हणायचे. त्यांना गावी नेल्यावर ते रुग्णाईत असतांना त्यांचे सर्व जागेवरच करावे लागायचे. त्यामुळे शेवटी त्यांनी अन्न-पाणी वर्ज्य केले. ‘आपल्यामुळे कुटुंबियांना त्रास नको’, असे त्यांना वाटायचे.’ – श्री. रवींद्र नलावडे

१ अं. श्रद्धा : ‘त्यांची देवावर ठाम श्रद्धा होती. ते सर्व काही ईश्वराच्या इच्छेवर सोपवायचे. त्यांची भगवान शिवावर अधिक श्रद्धा होती. त्यांना संकुलातील शिव मंदिरात नेल्यावर पुष्कळ प्रसन्न वाटले. ‘पूर्वीपेक्षा आता येथे पुष्कळ चैतन्य जाणवते’, असे ते म्हणाले.’ – सौ. सुप्रिया नलावडे

२. वडिलांची मृत्यूपूर्वीची स्थिती

सौ. सुप्रिया संदीप नलावडे

अ. ‘त्यांना गावी नेल्यावर त्यांची प्रकृती खालावली. मी सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांना वडिलांसाठी नामजपादी आध्यात्मिक उपाय विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘तुमच्या वडिलांना कुठलाही आध्यात्मिक त्रास नाही.’’ सद्गुरु अनुराधाताईंनी भ्रमणभाषवर त्यांच्यासाठी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ आणि ‘ॐ गं गणपतये नमः ।’ हे नामजप लावून ठेवायला सांगितले. हे नामजप भ्रमणभाषवर लावून ठेवल्यामुळे वडील सतत आनंदी असायचे आणि घरातील वातावरणातही पालट जाणवायचा.’ – श्री. रवींद्र नलावडे

आ. ‘४.५.२०२० या दिवशी रात्रभर त्यांना मोठ्या प्रमाणात शारीरिक त्रास होत होता. त्यांचे शरीर पुष्कळ थंड लागत होते. तेव्हा ‘ते अधिक काळ जगणार नाहीत’, असे मला वाटले. तेव्हा तेही म्हणाले, ‘‘देव यातून माझी कधी सुटका करणार ?’’

इ. प.पू. भक्तराज महाराज, परात्पर गुरुमाऊली आणि श्री कानिफनाथ महाराज (आमच्या घराच्या बाजूलाच श्री नाथ संप्रदायातील श्री कानिफनाथांचे मंदिर आहे.) या सर्वांना ‘आपणच वडिलांची यातून सुटका करू शकता’, अशी आमच्याकडून प्रार्थना झाली. त्यानंतर ५.५.२०२० च्या सकाळी १०.३० वाजता कुठल्याही प्रकारचा त्रास न होता वडिलांचा मृत्यू झाला.

३. वडिलांच्या मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे

अ. मृत्यूच्या वेळी ते उजव्या कुशीवर श्री कानिफनाथ मंदिराच्या दिशेला तोंड करून झोपले होते.

आ. एरव्ही आमच्या गावी मृत व्यक्तीला स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी भजनी मंडळ असते; परंतु कोरोनाच्या संसर्गामुळे त्यावर बंदी होती. आम्ही आरंभापासून अंत्यविधी पूर्ण होईपर्यंत भ्रमणभाषवर ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप सातत्याने लावून ठेवला होता. दत्ताच्या नामजपामुळे वातावरणात पालट जाणवून मला स्थिर रहाता आले.

कु. सोहम् संदीप नलावडे

इ. आमच्याकडील प्रथा-परंपरेनुसार व्यक्ती मृत झाल्यावर घरात पीठ पसरून ठेवले जाते; परंतु त्या पिठावर काहीही उमटले नाही.’

(‘अंत्यसंस्कार झाल्यानंतर कोपर्‍यात पीठ पसरून ते झाकून ठेवतात. ‘मृताचा आत्मा त्या पिठावर ठसे उमटवून जातो’, असे मानतात. पिठावर जे ठसे उमटतात, त्यावरून ‘त्याला पुढचा जन्म कोणता मिळणार ?’, ते समजते.’ – संकलक)

– श्री. संदीप नलावडे

ई. ‘वडिलांच्या दहाव्या दिवसाच्या आधी सर्व कुटुंबीय आणि नातेवाईक यांना परात्पर गुरुमाऊलीच्या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पहायला मिळाले. त्या माध्यमातून आम्हा सर्वांना भरभरून चैतन्य मिळाले. गुरुमाऊलींनी आम्हाला वर्तमानात रहाण्याची संधी दिली. त्यासाठी गुरुमाऊलीच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’ – श्री. रवींद्र नलावडे

४. कृतज्ञता

‘दळणवळण बंदीच्या काळातही परात्पर गुरुमाऊलींनी आम्हा कुटुंबियांकडून १० ते १२ दिवस वडिलांची सेवा करवून घेतली आणि आम्हाला सतत कृतज्ञतेच्या भावात ठेवले. त्यामुळे सर्वांना आनंद मिळाला. वडिलांनी पुष्कळ शारीरिक कष्ट घेऊन आम्हा सर्वांवर निरपेक्ष प्रेम केले. त्यांनी आमच्यावर चांगले संस्कार केले. त्यामुळे आणि परात्पर गुरुमाऊलीच्या कृपेमुळे आम्ही सर्व कुटुंबीय सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहोत. आमची ‘आमच्या वडिलांना सद्गती मिळो’, अशी परात्पर गुरुमाऊलीच्या चरणी प्रार्थना आहे. हे सर्व कृतज्ञतेचे लिखाण लिहिण्यासाठी परात्पर गुरुमाऊलीनेच बळ दिले, त्यासाठीही त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. रवींद्र नलावडे आणि श्री. संदीप नलावडे

(या लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक ३०.५.२०२०)