माकपकडून पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी धर्मांधांपासून सतर्क रहाण्याचा आदेश

महाविद्यालयातील तरुणींना धर्मांध जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असल्याचे मान्य !

माकपला उशिरा सुचलेले शहाणपण ! ‘लव्ह जिहाद’ नाकारणारा माकप आता लव्ह जिहाद रोखण्यासाठी सरकारी स्तरावर काही प्रयत्न करेल, तरच त्याला या संकटाची खरी जाणीव झाली, असे म्हणता येईल ! – संपादक 

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळमधील सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने त्याच्या कार्यकर्त्यांसाठी पक्षाच्या अंतर्गत पत्रक काढले असून कार्यकर्त्यांना धर्मांधांपासून सतर्क रहाण्याचा आदेश दिला आहे. ‘अल्पसंख्यांकांची धर्मांधता’ या नावाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये महाविद्यालयातील तरुणींना धर्मांध हे जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहेत, असे माकपने यात म्हटले आहे. या माध्यमातून माकपने ‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात असल्याचे सूतोवाच केले आहे.

१. माकपने म्हटले आहे की, धर्मांधता आणि कट्टरतावादी विचारसरणीच्या लोकांकडून युवकांना जाळ्यात ओढण्याचे काम केले जात आहे. महाविद्यालयांमध्ये शिकणार्‍या तरुणींची विचारसरणी कट्टरतावादी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याकडे माकपच्या विद्यार्थी संघटनेने आणि युवक संघटनेने लक्ष दिले पाहिजे.

२. या पत्रकात ख्रिस्ती धर्मांधताही वाढत असल्याचे सांगण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, ख्रिस्ती लोक कधी धर्मांध विचारसरणीमध्ये सहभागी होत नाहीत; मात्र गेल्या काही काळात या समाजामध्येही कट्टरता वाढत आहे. त्यामुळे त्याकडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे. जाणीवपूर्वक षड्यंत्र रचून राज्यातील ख्रिस्त्यांना मुसलमानांच्या विरोधात उभे करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

३. माकपच्या या पत्रकावर विरोधी पक्ष काँग्रेसने आक्षेप घेत या संदर्भात पुरावे मागितले आहेत. काँग्रेसचे नेते व्ही.डी. सतीसन् यांनी म्हटले की, माकपने सांगितले पाहिजे की, ख्रिस्ती धर्मांधतेविषयी कोणता गुन्हा नोंदवण्यात आला आहे का ? किंवा त्यांच्याकडे या संदर्भात पुरावे किंवा माहिती आहे का ? माकप आणि त्याच्या सरकारने नैतिक दायित्वाच्या आधारे जनतेसमोर या गोष्टी ठेवल्या पाहिजेत.