पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोमंतकियांशी ‘ऑनलाईन’ संवाद साधतांना गोव्यात पर्यटन चालू करण्याच्या दृष्टीने केले सुतोवाच !
पणजी, १८ सप्टेंबर (वार्ता.) – कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी गोवा राज्य अग्रेसर आहे. गोवा हे पर्यटन राज्य असल्याने येथे पात्र असलेल्या सर्वांनी कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा (डोस) घेणे (१०० टक्के लसीकरण), ही एक विशेष गोष्ट आहे. यामुळे जेव्हा गोव्यात पर्यटक येणार आहेत, तेव्हा त्यांना येथे सुरक्षित वाटणार आहे, तसेच त्यांना पर्यटन उपक्रमाचा लाभ घेता येणार आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. गोव्यातील आरोग्य कर्मचारी आणि कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्यांशी ‘व्हर्च्युअल’ (ऑनलाईन) पद्धतीने संवाद साधतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा विश्वास व्यक्त केला. या वेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मुख्य सचिव परिमल राय आदींची उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, ‘‘पाऊस आणि चक्रीवादळ यांचा सामना करतांना गोवा राज्याने लसीकरणात कोणताही खंड पडू दिला नाही. लसीकरणाची गती कायम ठेवली. सर्व आरोग्य कर्मचार्यांनी ‘मानवता हीच सेवा’ हे धोरण राबवले. गोव्यातील हॉटेलचे कर्मचारी, टॅक्सीवाले, फेरीवाले, दुकानदार आदींचे लसीकरण पूर्ण झाल्याने येथे येणार्या पर्यटकांना सुरक्षित वाटणार आहे. गोव्यात पर्यटन क्षेत्रासमवेत पायाभूत सुविधांवर भर दिला जात आहे. उत्तर आणि दक्षिण गोवा यांना जोडण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचे अभूतपूर्व काम केले जात आहे.’’
आगामी निवडणुकीत डॉ. प्रमोद सावंत हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे भरभरून कौतुक करून त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत डॉ. प्रमोद सावंत हेच भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार आहेत, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, ‘‘कर्मयोगी स्व. मनोहर पर्रीकर यांच्यानंतर गोव्याचा चौफेर विकास करण्याचे काम माझे मित्र तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे करत आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील शासनाने गोव्यात कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवले आहे. ‘आत्मनिर्भर भारत’च्या धर्तीवर ‘स्वयंपूर्ण गोवा’ अभियान राबवून गावांच्या विकासाला चालना दिली जात आहे. यामुळे गोवा केवळ लसीकरणातच नव्हे, तर सर्वच क्षेत्रांत अग्रेसर आहे. गोव्यातील मोपा विमानतळ आणि नवीन झुवारी पूल लवकरच पूर्ण केला जाणार आहे.’’
३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण लसीकरणाचे ध्येय ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
गोव्यात कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा पात्र असलेल्या सर्व नागरिकांनी घेतली आहे. ११ लक्ष ६६ सहस्र लोकांनी ही पहिली मात्रा घेतली आहे, तर लसीची दुसरी मात्रा ४७ टक्के लोकांनी (५ लक्ष नागरिकांनी) घेतली आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण लसीकरणाचे (कोरोना प्रतिबंधक लसीची दुसरी मात्रा घेणे) ध्येय गोवा शासनाने ठेवले आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या वेळी सांगितले.
क्षणचित्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘गोंयच्या मोगाळ भावा आणि बहिणींचे सादर अभिनंदन !’ (गोव्यातील प्रेमळ भाऊ आणि बहिणी यांचे सादर अभिनंदन !), या कोकणी भाषेतील वाक्याने त्यांच्या भाषणाला प्रारंभ केला.