वांद्रे-कुर्ला संकुल पूल दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार ! – एकनाथ शिंदे

गर्डर कोसळल्याने १४ कामगार घायाळ

मुंबई – वांद्रे-कुर्ला संकुल ते जे.व्ही.एल्.आर्.ला जोडणार्‍या पुलाच्या दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, ही दुर्घटना ‘गर्डर’चे बेअरिंग आणि ‘नट बोल्ट’ यांच्यात त्रुटी राहिल्याने झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. या दुर्घटनेची चौकशी त्रयस्थ मूल्यमापन संस्था आणि एम्.एम्.आर्.डी.ए. (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) यांचे अधिकारी मिळून करणार आहेत. या दुर्घटनेत किरकोळ घायाळ झालेल्या १३ कामगारांना उपचार करून रुग्णालयातून सोडण्यात आले असून एका कामगारावर उपचार चालू आहेत. घायाळ कामगारांच्या उपचारांचा व्यय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण करणार आहे.