ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ.टी. पद्मनाभन् यांचे हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन !  

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ.टी. पद्मनाभन्

पुणे, १८ सप्टेंबर – गुरुत्वाकर्षण, विश्वरचनाशास्त्र या क्षेत्रांतील योगदानासाठी जगभरात ओळख निर्माण केलेले ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ.टी. पद्मनाभन् (वय ६४) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने १७ सप्टेंबर या दिवशी पुण्यात निधन झाले. डॉ. पद्मनाभन् अंतरविद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्रात (आयुका) मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी ‘नोशन ऑफ कॉस्मिक इन्फॉर्मेशन’ ही नवी संकल्पना मांडली. त्यांच्या पश्चात पत्नी वासंती, कन्या हंसा असा परिवार आहे. डॉ. पद्मनाभन् यांच्यावर औंध येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्यासह त्यांनी दीर्घकाळ संशोधन केले. खगोलशास्त्रातील त्यांच्या संशोधन कार्याचा वर्ष २००७ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. त्याशिवाय त्यांना ‘शांतीस्वरूप भटनागर’ पुरस्कार, ‘इन्फोसिस सायन्स फाऊंडेशन’ पुरस्कार, असे विज्ञान क्षेत्रातील अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले होते.