आतंकवादी जान महंमद शेख याचे २० वर्षांपासून दाऊदशी संबंध होते, तसेच आमचे त्याच्यावर लक्ष होते ! – विनीत अग्रवाल, अतिरिक्त महासंचालक, आतंकवादविरोधी पथक

पोलीस अधिकार्‍यांनी नुसती अशी माहिती देऊन काय उपयोग ? एवढी वर्षे एक आतंकवादी दाऊदशी संबंध ठेऊन मुंबईत रहात आहे, तर तेव्हाच कारवाई का केली नाही ? ‘आमचे त्याच्यावर लक्ष होते’ या म्हणण्याला काय अर्थ आहे ? आतंकवाद्याने घातपात करण्याची आतंकवादविरोधी पथक वाट पहात होते का ? – संपादक 

आतंकवादी जान महंमद शेख

मुंबई – ‘देहली पोलिसांच्या विशेष पथकाने नुकतीच ६ आतंकवाद्यांना अटक केली आहे. यामधील एक आतंकवादी हा मुंबई येथील धारावीमधील रहिवासी आहे. जान महंमद अली महंमद शेख असे त्याचे नाव असून तो पाकिस्तानातील ‘डी कंपनीशी’ (आतंकवादी दाऊदची टोळी) त्याचे संबंध आहेत, असे अनेक पुरावे आहेत. असे जवळपास २० वर्षांपूर्वीचे पुरावे आहेत. आमचे त्याच्यावर लक्ष होते; मात्र आमच्याकडे आतंकवाद्यांच्या कारस्थानाची माहिती नव्हती. ती केंद्रीय यंत्रणांकडे होती. त्यांच्याकडून ती माहिती देहली पोलिसांना देण्यात आली होती’, अशी माहिती राज्याच्या आतंकवादविरोधी पथकाचे (‘ए.टी.एस्.’चे) अतिरिक्त महासंचालक विनीत अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. देहली पोलिसांनी ६ आतंकवाद्यांना अटक केल्यानंतर विरोधकांकडून ‘आतंकवादी मुंबईत असतांना ‘ए.टी.एस्.’ झोपली होती का ?’ असा उपस्थित केला होता. त्यानंतर ‘ए.टी.एस्.’ने पत्रकार परिषद घेत वरील माहिती दिली. मुंबईमध्ये ‘रेकी’ झालेली नाही, असे अग्रवाल यांनी सांगितले.