मुंबईतील प्रत्‍येक पोलीस ठाण्‍यात निर्भया पथक स्‍थापन करण्‍याचे आदेश

प्रतीकात्मक छायाचित्र

मुंबई – येथील सर्व पोलीस ठाण्‍यांमध्‍ये ‘महिला सुरक्षा कक्ष’ स्‍थापन करण्‍यात येणार असून याला ‘निर्भया पथक’ असे नाव देण्‍यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्‍त हेमंत नगराळे यांनी दिली आहे. साकीनाका येथे घडलेल्‍या बलात्‍कार आणि हत्‍या प्रकरणानंतर हा निर्णय घेण्‍यात आला आहे.

एका निर्भया पथकामध्‍ये पोलीस उपनिरीक्षक दर्जाची महिला अधिकारी, पुरुष हवालदार आणि चालक यांचा समावेश असणार आहे. त्‍यांना गस्‍तीसाठी एक गाडी असणार आहे. या पथकासाठी प्रत्‍येक पोलीस ठाण्‍यामध्‍ये एक विशेष नोंदवही (डायरी) असणार आहे.

निर्भया पथकात नियुक्‍त होणार्‍या महिला अधिकारी आणि कर्मचारी यांना बालगृह किंवा अनाथालय येथे गस्‍त घालून गोपनीय माहिती गोळा करण्‍याचे प्रशिक्षण देण्‍यात येणार आहे. ज्‍या भागात महिलांशी संबंधित गुन्‍ह्यांच्‍या घटना घडल्‍या आहेत, तेथे गस्‍त वाढवण्‍यात येणार आहे. झोपडपट्टी, मनोरंजन पार्क, शाळा, महाविद्यालय, चित्रपटगृह, मॉल्‍स, बाजारपेठा, बस आणि रेल्‍वे स्‍थानकांकडे जाणारे भूमिगत पादचारी मार्ग, याशिवाय ज्‍या ठिकाणी लोकांची वर्दळ अल्‍प असणार्‍या ठिकाणांचा गस्‍तीच्‍या महत्त्वाच्‍या ठिकाणांमध्‍ये (‘हॉटस्‍पॉट’) समाविष्‍ट करण्‍यात येणार आहे.

जर एखादी मुलगी रात्री प्रवास करत असेल आणि तिने साहाय्‍य मागितले, तर तिला सुरक्षित ठिकाणी नेण्‍यासाठी साहाय्‍य करणे, एखादी ज्‍येष्‍ठ महिला एकटी रहात असेल, तर गस्‍त घालतांना तिला भेटून तिची अडचण समजून घेणे, ज्‍यांनी मागील ५ वर्षांत महिला आणि मुले यांच्‍यावर अत्‍याचार केले, त्‍यांची सूची सिद्ध करून त्‍यांच्‍यावर लक्ष ठेवणे, महिला सुरक्षेच्‍या हेल्‍पलाईनसाठी १०३ क्रमांक शक्‍य तितक्‍या सामान्‍य लोकांपर्यंत पोचवणे, सल्ला शिबिर घेणे, असे आदेश देण्‍यात आले आहेत. पीडित महिला आणि मुले यांचे समुपदेशन मानसोपचार तज्ञांकडून करण्‍यात येणार आहे.