‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ परिषदेचे आयोजन, हे जागतिक स्तरावर हिंदुद्वेष पसरवण्याचे षड्यंत्र ! – भारत गुप्त, माजी प्राध्यापक, देहली विद्यापीठ

‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या चालू असलेल्या हिंदुद्वेष्ट्या परिषदेच्या विरोधात जागृती करणारी हिंदु जनजागृती समितीची ‘ऑनलाईन’ चर्चासत्रे

‘हिंदुत्व, ‘हिंदुइजम्’ आणि हिंदु धर्म यांत काही भेद आहे का ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष चर्चासत्र !

श्री. भारत गुप्त

पुणे – ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे जागतिक स्तरावर उच्चाटन) या आंतरराष्ट्रीय ‘ऑनलाईन’ परिषदेचे आयोजन द्वेषपूर्ण आणि हीनत्वाच्या भावनेतून करण्यात आले. हे आयोजन पूर्णत: राजकीय हेतूने प्रेरित आहे. दुर्दैवाने आज जागतिक पातळीवर हिंदु धर्म चुकीच्या पद्धतीने मांडला जात आहे. हिंदूंना अपकीर्त करण्याचे हे कुटील कार्य असून जागतिक स्तरावर हिंदुद्वेष पसरवण्याचे मोठे षड्यंत्र आहे. ही विचारसरणी (हिंदु) संस्कृतीला अपमानित करण्याची, तसेच धर्मपरिवर्तनाची मानसिकता निर्माण करणारी आहे. या परिषदेचा अजेंडा (कार्यसूची) भारत आणि हिंदु द्रोही असल्याने यामध्ये कुणीही सहभागी होऊ नये. अशा (धर्मद्रोही) विचारांचे खंडण करायला हवे, अन्यथा ते वाढत जातील, असे परखड मत देहली विद्यापिठाचे माजी प्राध्यापक, तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, नवी देहलीचे कार्यकारी सदस्य आणि विश्वस्त श्री. भारत गुप्त यांनी व्यक्त केले. ते ५ सप्टेंबर या दिवशी झालेल्या हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हिंदुत्व, ‘हिंदुइजम्’ आणि हिंदु धर्म यांत काही भेद आहे का ?’, या ‘ऑनलाईन’ विशेष कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांनी केले. हा कार्यक्रम १ सहस्र ३९२ जणांनी पाहिला.

श्री. भारत गुप्त यांनी मांडलेली अन्य सूत्रे

साम्यवादाचे अस्तित्व दाखवण्यासाठी आटापिटा !

या परिषदेचा पाया साम्यवाद्यांनी रचला आहे. वेदांमधील मूल्यांना ‘ब्राह्मणवाद’ या नावाने हिणवून, तसेच ‘ही मूल्ये भारताची नाहीत’, ‘हिंदु धर्माचे नामकरण इंग्रजांनी केले’, अशा भ्रामक संकल्पना पसरवून साम्यवादी हिंदु धर्माचा अवमान करतात. भारतातून साम्यवाद संपत चालला आहे. साम्यवादी सत्तेत नाहीत; म्हणून स्वत:चे अस्तित्व दाखवण्याचा आटापिटा करत आहेत.

हिंदुत्वाच्या विरोधातील चर्चासत्र अमेरिकेच्या दृष्टीने अहितकारक !

अमेरिकेचे अर्थकारण, संस्कृती आणि विज्ञान यांमध्ये भारतियांचे अमूल्य योगदान पहाता हे चर्चासत्र अमेरिकेच्या दृष्टीने हितकारक नाही. ही परिषद १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत होत आहे. ११ सप्टेंबरला स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील धर्मपरिषदेत भाषण करतांना ‘माझ्या बंधू, भगिनींनो’ अशा शब्दांनी प्रारंभ केला होता. आजही सन्मानपूर्वक हे शब्द उच्चारले जातात.

११ सप्टेंबर २००१ या दिवशी अमेरिकेच्या ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’वर ज्या विचारसरणीच्या लोकांनी आक्रमण केले, त्या विचारसरणीवर कुणीही चर्चा करत नाही. केवळ ब्राह्मणवाद, हिंदुत्ववाद यांवर चर्चा केली जाते. अमेरिकेतील हिंदू ८० ते १०० वर्षांपासून तिचे अर्थकारण आणि संस्कृती यांच्याशी एकरूप होऊन रहात आहेत, हे सर्वश्रूत आहे. अमेरिकेतील ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेमध्ये ३० ते ४० टक्के हिंदू आहेत. त्यांनी अमेरिकेला नावारूपास आणण्यास आणि विज्ञानाला पुढे नेण्यास साहाय्य केले आहे. हिंदूंच्या विचारसरणीतून चांगल्या समाजाची निर्मिती होते, हे अमेरिकेने पाहिले आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या विरोधातील हे चर्चासत्र अमेरिकेच्या दृष्टीने हितकारक नाही. अमेरिकेने हे लक्षात घेऊन यासंदर्भात यथायोग्य उत्तर (मत) दिले पाहिजे.

हिंदू हे अल्पसंख्यांकांवर अत्याचार आणि आतंकवादी कारवाया करतात, हेच मोठे षड्यंत्र !

वर्ष १९७० पासून साम्यवाद्यांनी इंग्रजांच्या शिक्षणाचा प्रचार केला. ‘हिंदूंचा द्वेष करणे’, हाच त्यामागील उद्देश होता. अशी उपनिवेशवेदी (इंग्रजाळलेली) आणि हिंदुद्वेष्ट्या साम्यवाद्यांचा प्रभाव असलेली शिक्षणपद्धती आजही भारतात अन् अमेरिकेच्या विश्वविद्यालयांत शिकवली जाते. भारतात हिंदूंसाठी एक आणि इतरांसाठी वेगळा कायदा आहे. अल्पसंख्यांक त्यांच्या धर्माचे शिक्षण देतात; मात्र हिंदू स्वत:च्या धर्माचे शिक्षण देऊ शकत नाहीत. अल्पसंख्यांकांकडून शिक्षण दिल्या जाणार्‍या शिक्षण संस्थांतून देशाचे तुकडे करण्याची भाषा शिकवली जाते. ती राष्ट्राच्या दृष्टीने हानीकारक आहे. शिक्षणव्यवस्था पहिलीपासून उच्च शिक्षणापर्यंत ख्रिस्त्यांच्या हातात आहे. असे असतांना अल्पसंख्यांक म्हणतात, ‘हिंदू आमच्यावर अत्याचार करतात. आमचे धर्मांतर करतात, तसेच आतंकवादी कारवाया करतात’. मुळात हिंदूंच्या विरोधात केला जाणारा हा दुष्प्रचार आहे.

धर्मांध आणि ख्रिस्ती यांचा कुटील डावपेच !

या परिषदेच्या माध्यमातून धर्मांध आणि ख्रिस्ती कुटील डावपेच करत आहेत. ‘हिंदूंच्या जाती, कला, संस्कृती आणि पूर्वज यांना तुच्छ लेखण्याचे कार्य करायचे, जेणेकरून हिंदूंच्या मनात हीन भाव निर्माण होऊन ते हिंदु धर्माचा त्याग करतील. यानंतर त्यांना स्वत:च्या धर्मात घ्यायचे’, हा या लोकांचा हेतू आहे. या दोन्ही पंथांना संपूर्ण जग इस्लामय, ख्रिस्तीमय करायचे आहे.