भाद्रपद शुक्ल पक्ष प्रतिपदा (७.९.२०२१) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात रहाणारे श्री. प्रदीप धाटकर यांचा ४४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सहसाधकाला लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
श्री. प्रदीप धाटकर यांना ४४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. शांत स्वभाव
‘प्रदीपदादा शांत आणि समंजस आहेत. ते प्रत्येक कृती (बोलणे, चालणे, वाहन चालवणे आणि नामजप करणे) शांत आणि स्थिर राहून करतात.
२. सेवा नीटनेटकेपणाने आणि मनापासून करणे
दादांमध्ये ‘नीटनेटकेपणा’ हा गुण उपजतच आहे. दादा ग्रंथालयाशी संबंधित सेवा करतात. त्या अंतर्गत ग्रंथांना सुवाच्य अंकांत क्रमांक देणे, समान लांबीचे आणि समान पृष्ठांचे ग्रंथ एका बाजूला व्यवस्थित ठेवून खोक्यात भरणे, खोक्यावर ‘लेबल’ लावणे, ‘स्टेशनरी’ साहित्याचा वापर झाल्यावर ते जागच्या जागी ठेवणे आदी सर्व कृतींमधून त्यांचा नीटनेटकेपणा आणि सेवा मनापासून करण्याचा भाव जाणवतो.
ग्रंथालयातील ग्रंथांचा साठा सुरक्षित रहाण्याच्या दृष्टीने ग्रंथ ठेवलेल्या ठिकाणी धुरी देण्याची सेवा असते. प्रदीपदादांच्या धुरी करण्याच्या आणि धुरी देण्याच्या पद्धतीमुळे तेथील वास्तूत धुरीचा वास २ – ३ दिवसांपर्यंत टिकून रहातो.
३. वेळेचे पालन करणे
एखाद्या सेवेची वेळ निश्चित केल्यावर ते त्या सेवेसाठी नियोजित वेळी उपस्थित रहातात.
४. कौटुंबिक दायित्व निभावणे
प्रदीपदादांना कौटुंबिक स्तरावरील अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. ते कुठलीही गोष्ट प्रलंबित न ठेवता ती पूर्ण करतात.
५. शिकण्याची वृत्ती
पूर्वी दादांना संगणकाचे ज्ञान नसल्याने त्यांना संगणक हाताळण्याची भीती वाटायची; मात्र त्यांनी संगणक शिकण्याची चिकाटी सोडली नाही. संगणकीय सेवेत स्वयंपूर्णता येण्यासाठी ते आवश्यक त्या सूत्रांची नोंद ठेवतात. परिणामी संगणकीय प्रणालीच्या अंतर्गत ग्रंथांच्या नोंदी करणे, ग्रंथाचा विषय लिहिणे आदी सेवा ते चांगल्या प्रकारे करू लागले आहेत.
६. नियोजनकौशल्य आणि नियोजनातील अचूकता
एकदा ग्रंथालयाशी संबंधित साहित्याचे स्थलांतर करायचे होते. त्या वेळी ‘ती सेवा किती वेळेत होऊ शकेल ?’, यासंबंधी त्यांनी अभ्यास करून सांगितले. प्रत्यक्षातही ती सेवा पूर्ण व्हायला तितकाच वेळ लागला. तेव्हा मला त्यांची नियोजनातील अचूकता लक्षात आली.
७. परिपूर्ण सेवा करण्याची तळमळ
ते कधीही कोणतीही सेवा अर्धवट सोडत नाहीत किंवा प्रलंबित ठेवत नाहीत. सेवा पूर्ण करण्याच्या दृष्टीनेच त्यांचे सतत प्रयत्न असतात. काही प्रसंगी त्यांनी अल्पाहार न घेता आधी सेवा पूर्ण करायला प्राधान्य दिले आहे.
८. ‘दिसेल ते कर्तव्य’ या भावाने आचरण करणे
त्यांना आश्रम परिसरात एखादी अयोग्य गोष्ट दिसल्यास ते ती लगेचच व्यवस्थित करतात. एकदा एका ठिकाणी सिमेंटच्या विटा असमान पद्धतीने ठेवल्या होत्या. दादांच्या ते लक्षात येताच त्यांनी विटा एकसारख्या रचल्या. नंतर तेथे बघितल्यावर चांगले वाटत होते.
९. अल्प अहं
एकदा एका सेवेचे नियोजन करतांना माझ्याकडून काही चुका झाल्या. त्यामुळे दादांना त्रास झाला. असे असतांनाही या प्रसंगात ‘मी दुसर्याला समजून घेण्यात न्यून पडलो’, अशी त्यांना खंत वाटली आणि त्यांनी माझीच क्षमा मागितली.’
– श्री. प्रथमेश अच्युत खांडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.८.२०२१)