(म्हणे) ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विहिंप आणि बजरंग दल यांचे समर्थन करणारे तालिबानी प्रवृत्तीचे !’

तालिबान्यांच्या आतंकवादी कारवायांची तुलना हिंदुत्वाशी करून हिंदूंना आतंकवादी ठरवणारे जावेद अख्तर यांचे फुत्कार !

जावेद अख्तर

मुंबई – ज्या पद्धतीने तालिबानी ‘मुस्लिम राष्ट्र’ निर्माण करण्यासाठी हिंसक प्रयत्न करत आहेत, त्याच पद्धतीने आपल्याकडे काही जण ‘हिंदु राष्ट्रा’ची संकल्पना मांडत आहेत. हे लोकही त्याच मानसिकतेचे आहेत. तालिबानी हिंसक आणि रानटी आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विहिंप आणि बजरंग दल यांचे समर्थन करणारे लोकही तालिबानी प्रवृत्तीचे आहेत, असे विधान गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी करून हिंदुद्वेषी फुत्कार काढले. ३ सप्टेंबर या दिवशी ‘एन्.डी.टी.व्ही.’ या वृत्तवाहिनीवर दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. (हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंनी हिंसक मार्ग अवलंबला असता, तर अख्तर यांचे असे बोलण्याचे धारिष्ट्य झाले असते का ? आतंकवादी आणि धर्मांध यांच्याकडून भारताचे इस्लामीकरण करण्याच्या प्रयत्नांविषयी अख्तर अवाक्षर काढत नाहीत, हे लक्षात घ्या ! तालिबान्यांच्या कृत्याला चुकीचे ठरवतांना हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या समर्थकांना तालिबानी ठरवणे, हा निवळ हिंदुद्वेष नव्हे का ? – संपादक)

जावेद अख्तर पुढे म्हणाले, ‘‘तालिबानी प्रवृत्ती रानटी आहे. भारताचे तालिबान कधी होऊ शकत नाही. भारतातील काही मुसलमानांनी अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्याचे स्वागत केले, हे माझ्यासाठी अतिशय धक्कादायक होते. भारतातील मुसलमान तरुण हे चांगले जीवन जगणे, रोजगार, चांगले शिक्षण या गोष्टींच्या मागे लागले आहेत; पण मुसलमानांचा एक गट असा आहे की, जो ‘स्त्री-पुरुष’ असा भेदभाव करून समाजाला मागे खेचण्याचा प्रयत्न करत आहे. भारतातील बहुतांश लोकसंख्या धर्मनिरपेक्ष विचारांची आहे. ते सभ्य असून एकमेकांचा आदर करतात. त्यामुळे त्यांना तालिबानी विचार आकर्षित करू शकत नाहीत. त्यामुळे भारत आताही आणि भविष्यातही कधीच तालिबानी बनू शकणार नाही.’’ (तालिबानचे समर्थन कोण करत आहे आणि तालिबानच्या समर्थनार्थ केरळमधून कोण गेले होते, हे अख्तर का सांगत नाहीत ? – संपादक)

… तर अफगाणिस्तानात जावून तालिबानवर टीका करावी ! – जावेद अख्तर यांना भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांचे प्रत्युत्तर

आमदार अतुल भातखळकर

मुंबई – हिंदु समाज बहुसंख्य असलेल्या देशात राहून जावेद अख्तर तालिबानवर टीका करत आहेत. धारिष्ट्य असेल, तर अफगाणिस्तानमध्ये जाऊन त्यांनी तालिबानवर टीका करा, असे आवाहन भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी गीतकार जावेद अख्तर यांना दिले आहे. जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद यांना समर्थन करणारे तालिबानी मानसिकतेचे आहेत, असे हिंदूंना अतिरेकी ठरवणारे विधान केले आहे. त्याविषयी आमदार अतुल भातखळकर यांनी सामाजिक माध्यमांद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली.
यामध्ये अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे की, जावेद अख्तर यांचे हे विधान म्हणजे केवळ बेशरमपणाचा कळस नसून समस्त हिंदु समाजाचा अपमान आहे. जावेद अख्तर यांनी त्यांचे विधान मागे घेऊन हिंदु समाजाची क्षमा मागावी, अन्यथा त्यांच्या विरोधात अपकीर्तीचा खटला केला जाईल.