हिंदु जनजागृती समितीची पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
मुंबई, ५ सप्टेंबर (वार्ता.) – कागदी लगद्यांपासून होणारा जलप्रदूषणाचा गंभीर धोका ओळखून सरकारने कागदी लगद्याच्या मूर्तींवर बंदी घालावी आणि शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तींना प्रोत्साहन द्यावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन ३ सप्टेंबर या दिवशी मंत्रालयामध्ये पर्यावरणमंत्र्यांच्या कार्यालयात देण्यात आले.
या निवेदनामध्ये कागदी लगद्यापासून होणार्या प्रदूषणाविषयी म्हटले आहे की, रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या संशोधनातील निष्कर्षानुसार कागदी मूर्ती विसर्जित केलेल्या पाण्यात झिंक, क्रोमियम, कॅडमियम, टायटॅनिअम ऑक्साईड असे अनेक विषारी धातू आढळून आले. या संस्थेच्या निष्कर्षानुसार १० किलो कागदी लगद्याच्या मूर्तींमुळे १ सहस्र लिटर पाणी प्रदूषित होऊ शकते. वर्ष २०१६ मध्ये राष्ट्रीय हरित लवादानेही कागदी मूर्ती पर्यावरणपूरक असल्याचे सूत्र मार्गदर्शक सूचनांमधून वगळले आहे. कागदाच्या लगद्यापासून सिद्ध केलेल्या मूर्तींपासून जलप्रदूषण होत नसल्याचा कोणताही शास्त्रशुद्ध अभ्यास न करता महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने वर्ष २०१६ मध्ये कागदी लगद्याच्या मूर्ती पर्यावरणपूरक असल्याचे घोषित केले. हा शासन निर्णय घेतांना कोणताही अभ्यास करण्यात आलेला नसल्याचे पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या दोघांनीही मान्य केले आहे. वर्ष २०१० मध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या संशोधनानुसार मूर्तीसमवेत काही कागद असतील, तर ते पाण्यात विसर्जित करू नयेत, असे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. असे असतांना महाराष्ट्र सरकारच्या आदेशामुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे शासनाने कागदी लगद्याच्या मूर्तींना प्रोत्साहन देण्याचा शासन निर्णय रहित करावा.