‘इग्नू’मधील ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासक्रमाला होणार्‍या विरोधाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट !

‘ज्योतिषशास्त्र’ विज्ञानाधिष्ठित असल्याचे सांगत राज्यपालांकडून अभ्यासक्रमाला पाठिंबा !

डावीकडून श्री. प्रभाकर भोसले, श्री. प्रवीण कानविंदे, श्री. रमेश शिंदे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, डॉ. उदय धुरी आणि श्री. बळवंत पाठक

मुंबई – इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापिठात (‘इग्नू’त) ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासक्रमाचा समावेश करण्यास काही तथाकथित पुरोगाम्यांकडून होणार्‍या विरोधाच्या पार्श्वभूमीवर ४ सप्टेंबर २०२१ या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. या वेळी राज्यपालांनी समितीच्या शिष्टमंडळाचे सविस्तर म्हणणे ऐकून घेऊन ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासक्रमाला पाठिंबा दर्शवला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, मुंबई प्रवक्ते डॉ. उदय धुरी, मुंबई समन्वयक श्री. बळवंत पाठक, ‘गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्ट’चे अध्यक्ष श्री. प्रवीण कानविंदे आणि ‘श्री शिवकार्य प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर भोसले हे उपस्थित होते.

या वेळी समितीच्या वतीने राज्यपालांना निवेदन देण्यात आले. यामध्ये सर्वाेच्च न्यायालयाने ज्योतिषशास्त्राच्या विरोधातील दावा फेटाळतांना ‘काही थोड्या लोकांनी ज्योतिषाला विरोध केला, म्हणजे विज्ञानयुगात ज्योतिष थोतांड ठरत नाही’, या केलेल्या टिपणीचाही संदर्भ देण्यात आला आहे. याविषयीची सविस्तर माहिती श्री. रमेश शिंदे यांनी राज्यपालांना दिली. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापिठात ज्योतिषशास्त्र शिकवण्याचा निर्णय कायम ठेवण्याची विनंती समितीच्या वतीने राज्यपालांकडे करण्यात आली. त्याला राज्यपालांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

या प्रसंगी ‘श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी हिंदु धर्मशास्त्राशी विसंगत असलेल्या कृत्रिम हौदांना प्रोत्साहन देणे बंद करून शासनाने शाडूच्या मातीच्या श्री गणेशमूर्तींना प्रोत्साहन द्यावे’, याविषयीचे निवेदनही राज्यपालांना देण्यात आले. हिंदु धर्माची अपकीर्ती करण्यासाठी जागतिक पातळीवर आयोजित करण्यात आलेल्या ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या आंतरराष्ट्रीय ‘कॉन्फरन्स’चे आयोजन करणारे, यामध्ये सहभागी होणारे आणि त्यांना साहाय्य करणारे यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही निवेदनाद्वारे राज्यपालांकडे करण्यात आली.

कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तींवर बंदी घालून शाडूच्या मूर्तीला प्रोत्साहन द्यावे !

तत्कालीन सरकारने पर्यावरणाचा गाजावाजा करून कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तींना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला होता; मात्र कागदी लगद्याच्या मूर्ती प्रदूषणकारी असल्याने त्यावर राष्ट्रीय हरित लवादाने वर्ष २०१६ मध्ये बंदी घातली होती. ३ मे २०११ या दिवशीच्या शासननिर्णयावर स्थगिती आणली होती, तरीही बाजारात कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्ती मोठ्या प्रमाणावर येत आहेत. त्यावर बंदी घातली पाहिजे आणि नैसर्गिक रंगाने रंगवलेल्या शाडूच्या मातीच्या मूर्तींना प्रोत्साहन द्यायला हवे, अशी मागणीही शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली. यावर राज्यपालांनी या विषयात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.

या वेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सनातनचा मराठी भाषेतील ग्रंथ ‘आदर्श दिनचर्या’ (खंड २), तसेच मराठी भाषेतील ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देण्यात आले.

ज्योतिषशास्त्र हे केवळ शास्त्र नसून विज्ञान आहे ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

ज्योतिषशास्त्र जगभरात शिकवले जाते. न्यायालयाने ज्योतिषशास्त्राची सत्यता अधोरेखित केली असतांना त्याला कोण विरोध करू शकतो ? तुम्ही तुमचे कार्य चालू ठेवा.