७०० वर्षे प्राचीन शीतलनाथ मंदिर आतंकवाद्यांनी उद्ध्वस्त केले होते !
जम्मू – जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम रहित केल्यानंतर तेथील परिस्थिती हळूहळू सामान्य होत आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून बंद पडलेली हिंदूंची मंदिरे उघडण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांच्या प्रयत्नांनी ७०० वर्षे प्राचीन असलेले आणि २६ वर्षे बंद असलेले श्रीनगरमधील ऐतिहासिक शीतलनाथ हे मंदिर नुकतेच भाविकांसाठी खुले करण्यात आले.
केंद्रीय राज्यमंत्री पटेल जम्मू-काश्मीरच्या २ दिवसांच्या दौर्यावर गेले होते. त्यांनी तेथे ७०० वर्षे पुरातन शीतलनाथ मंदिराची चौकशी केली. ‘वर्ष १९९५ मध्ये चरारे शरीफच्या दर्ग्यामध्ये आग लागली होती. त्यानंतर काश्मिरी फुटीरतावादी आणि आतंकवादी यांनी काश्मीरमधील शेकडो मंदिरे उद्ध्वस्त केली, तसेच अनेक मंदिरे पेटवण्यात आली. त्यात शीतलनाथ मंदिराची हानी झाल्यामुळे तेही बंद होते’, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर पटेल यांच्या आग्रहाने हे मंदिर परत उघडण्यात आले आणि तेथे भगवान शंकराला अभिषेक करण्यात आला. तत्पूर्वी प्रशासनाने मंदिराची स्वच्छता केली. त्यानंतर पटेल यांनी मंदिरात जाऊन भगवान शंकराचे दर्शन करून जलाभिषेक केला.