मुंबई – भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त राज्यात अपारंपरिक ऊर्जेच्या प्रसारावर भर देण्याचे राज्यशासनाने ठरवले आहे. त्या अनुषंगाने वर्ष २०२५ पर्यंत राज्यात १७ सहस्र ३८५ मेगावॅट क्षमतेचे अपारंपरिक वीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहेत, अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी प्रसिद्धीमाध्यमांना दिली.
याविषयी अधिक माहिती देतांना डॉ. नितीन राऊत म्हणाले, ‘‘या धोरणानुसार कार्यवाही व्हावी आणि या क्षेत्रात गुंतवणूक करू इच्छिणार्या आस्थापनांना भूमी आणि अन्य आवश्यक मान्यता लवकरात लवकर मिळाव्यात, यासाठी कार्यपद्धती सिद्ध करण्यात आली आहे. राज्यात अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प राबवू इच्छिणार्या आस्थापनांना ‘ऑनलाईन वेब पोर्टल’च्या माध्यमातून अर्ज करण्यासाठी आणि त्या अर्जावर कालबद्ध प्रक्रिया करण्यासाठी तात्काळ यंत्रणा उभारण्यात येणार आहे. प्रतिवर्षी किती प्रकल्प उभारणार ? किती लक्ष साध्य करणार ? याविषयी नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अपारंपरिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पांतून स्वस्त विजेची निर्मिती होत असल्याने येणार्या काळात राज्यात विजेचे दर अल्प होणार आहेत. यामुळे उद्योगवाढीस चालना मिळणार आहे.’’