लैंगिक अत्याचारापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी महिलांनी ‘मार्शल आर्ट्स’ शिकावे ! – सौ. सुलक्षणा सावंत

सौ. सुलक्षणा सावंत

पणजी, ३१ ऑगस्ट (वार्ता.) – महिलांनी लैंगिक अत्याचारापासून आणि इतर आक्रमणांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी ‘मार्शल आर्ट्स’चा अभ्यास करावा, असे आवाहन भाजप राज्य महिला मोर्चाच्या माजी अध्यक्ष सौ. सुलक्षणा सावंत यांनी केले. २९ ऑगस्ट २०२१ या दिवशी रेईस मागूस येथे साळगाव भाजप महिला मोर्चाकडून आयोजित करण्यात आलेल्या ‘श्रावण मास महोत्सव’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपिठावर भाजप महिला मोर्चाच्या विद्यमान अध्यक्ष शितल नाईक, साळगांव भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष शितल वझरेकर, माजी पर्यटनमंत्री दिलीप परूळेकर, जिल्हा परिषद सदस्य रूपेश नाईक, अमिता सलत्री आणि रेईस मागूस ग्रामपंचायतीचे सरपंच केदार नाईक उपस्थित होते.

सौ सावंत पुढे म्हणाल्या, ‘‘महिलांनी स्वतःला सुरक्षित आणि निरोगी ठेवण्यासाठी स्वरक्षणाचे प्रशिक्षण घ्यावे. स्वरक्षण प्रशिक्षण घेतल्यास महिला त्यांच्यावर आक्रमण होत असतांना किंवा त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न होत असतांना विरोध करू शकतात. महिला स्वतःच्या कुटुंबात पत्नी, आई, प्रशासक, शिक्षक, परिचारिका आदी भूमिका निभावत असतात, तसेच समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात त्यांची भूमिका महत्त्वाची असते. महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असावे. त्यांनी स्वत:च्या कौशल्यांचा उपयोग करून स्वतःच्या पायावर उभे रहाण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ करून घ्यावा. बर्‍याच महिलांना कायद्यानुसार त्यांचे अधिकार ठाऊक नाहीत. महिलांच्या अधिकारांविषयी माहिती देण्यासाठी भाजपच्या महिला मोर्चाने महिलांसाठी वेगळा कार्यक्रम ठेवावा, तसेच महिलांसाठी आरोग्य शिबिरे घ्यावीत.’’ या वेळी शितल नाईक, केदार नाईक आणि अमिता सलत्री यांचीही भाषणे झाली.