नावडे (जिल्हा रायगड) येथील पू. शांताराम महाराज खानावकर (वय ७५ वर्षे) यांचा देहत्याग !

पू. शांताराम महाराज खानावकर

पनवेल (जिल्हा रायगड), ३१ ऑगस्ट (वार्ता.) – पनवेल तालुक्यात असलेल्या नावडे येथील श्री दत्त संप्रदायानुसार साधना करणारे पू. शांताराम महाराज खानावकर (वय ७५ वर्षे) यांनी श्रीकृष्ण जयंतीच्या म्हणजेच ३० ऑगस्टच्या उत्तररात्री १.३० वाजता देहत्याग केला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते; मात्र त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ३१ ऑगस्ट या दिवशी नावडे येथील स्मशानभूमीत पूज्य शांताराम खानावकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला. या वेळी सनातन संस्थेच्या वतीने श्री. उमेश किचंबरे हे उपस्थित होते.

पू. शांताराम महाराज खानावकर यांनी वर्ष १९८२ मध्ये नावडे येथे दत्त दरबार मठाची स्थापना केली. तीर्थक्षेत्र गाणगापूर येथे भक्तांना निवासासाठी असुविधा होत असल्यामुळे वर्ष १९८२ मध्ये त्यांनी तेथेही मठाची स्थापन केली होती. नावडे परिसर, तसेच पनवेल येथे पू. महाराज भजनाचे कार्यक्रम करत असत. येथील विविध धार्मिक कार्यक्रमांतही ते सहभागी होत असत.

ख्रिस्त्यांच्या धर्मांतराचा कार्यक्रम रोखणारे पू. शांताराम महाराज !

नावडे येथील एका शाळेत ख्रिस्त्यांचा धर्मांतराचा कार्यक्रम होणार होता. याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी पू. शांताराम महाराज खानावकर यांना कळवल्यावर त्यांनी स्थानिक आमदार आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्याशी संपर्क करून हिंदु जनजागृती समितीच्या साहाय्याने पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. त्यामुळे हा कार्यक्रम रहित झाला.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यात पू. शांताराम महाराज यांचा सहभाग !

पू. शांताराम महाराज खानावकर यांनी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला अनेक वेळा भेट दिली होती. दैनिक ‘सनातन प्रभात’चा वर्धापनदिन सोहळा, तसेच राष्ट्रीय हिंदू आंदोलन आदी विविध कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती लाभत असत. खेडूकपाडा, पनवेल, कळंबोली येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभांनाही ते आवर्जून उपस्थित राहिले होते. सनातनचे साधक त्यांच्या दर्शनासाठी गेल्यावर ते साधकांची आपुलकीने विचारपूस करत. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रकृतीविषयी ते आदरपूर्वक विचारपूस करत. सनातनच्या कार्याला, तसेच सर्व साधकांना त्यांचे आशीर्वाद नेहमीच लाभले.