२ ऑक्टोबरपासून ७-१२ उतारा थेट घरपोच देणार ! – बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री

मुंबई – २ ऑक्टोबर अर्थात गांधी जयंतीपासून ७-१२ चा उतारा संगणकीकृत नव्या स्वरूपात घरपोच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सुधारित उतार्‍याची पहिली प्रत थेट खातेदारांना देण्याचा क्रांतीकारी निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

ते म्हणाले, ‘‘नागरिकांना सहज आणि जलदगतीने सेवा उपलब्ध करून देण्याचा महसूल विभागाचा प्रयत्न आहे. पुढील काळात फेरफार दाखलाही ‘ऑनलाईन’ उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खातेदारांना थेट विनामूल्य आणि घरपोच उतारा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे. राज्याच्या महसूल विभागाकडून ई-पीक पहाणी, संगणकीकृत ७-१२, ‘ऑनलाईन फेरफार’, जलदगतीने जमिनीची मोजणी, सामूहिक गावठाण मोजणी असे अनेक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.’’