राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलिसांचे विविध ठिकाणी संचलन

प्रातिनिधिक छायाचित्र

मालवण – शिवसेना आणि भाजप यांच्यातील वादामुळे जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच आगामी काळातील सण, उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता कायम रहावी, भयमुक्त वातावरण रहावे, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात मालवण, कुडाळ आणि कणकवली येथे पोलिसांनी संचलन केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस निरीक्षक एस्.एस्. ओटवणेकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, दंगल नियंत्रण पथक आणि राज्य राखीव पोलीस दलाचे पथक यांचा या संचलनात सहभाग होता. मालवण शहरात देऊळवाडा ते बाजारपेठमार्गे पिंपळपार येथपर्यंत संचलन करण्यात आले.
कणकवली शहरातील मुख्य चौक, नरडवे नाका, रेल्वेस्थानक, पटकीदेवी आणि  बाजारपेठ या मार्गावर पोलिसांनी संचलन केले. शहरात ६ दंगल नियंत्रण पथके, राज्य राखीव पोलीस दलाच्या सैनिकांसह १३५ कर्मचारी आणि ६ अधिकारी यांचा समावेश आहे.