मालवण – जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या मनाई आदेशाचा भंग करून ‘दैनिक सामना’ या वृत्तपत्राच्या प्रती जाळल्याच्या प्रकरणी पोलिसांनी भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सुदेश आचरेकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मिळून एकूण १० ते १२ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’मध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात वारंवार लिखाण केले जाते, असा आरोप करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी २५ ऑगस्ट या दिवशी शहरातील भाजपच्या कार्यालयाच्या बाहेर घोषणा देत ‘दैनिक सामना’च्या प्रती जाळल्या होत्या.
शिवसेना आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांना नोटीस
कणकवली – सध्याची जिल्ह्यातील राजकीय स्थिती आणि जिल्ह्यात लागू असलेला जमावबंदी आदेश यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शिवसेना आणि भाजप या पक्षांच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावली आहे. कणकवली येथे भाजपच्या कार्यालयात येऊन कार्यकर्त्यांना नोटीस दिली. या सर्व घटनांचा विचार करता भाजपची ‘जन आशीर्वाद’ यात्रा होणार कि नाही ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जमावबंदीच्या काळात कार्यकर्त्यांकडून कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य झाल्यास त्यासाठी सर्वस्वी उत्तरदायी ठरवून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे या नोटिसीमध्ये म्हटले आहे.