तळमळीने सेवा आणि सतत गुरुस्मरण करणारे बीड येथील श्री. शेषेराव सुस्कर (वय ६१ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

‘ऑनलाईन’ सत्संगात दिली आनंदवार्ता !

बीड, २६ ऑगस्ट (वार्ता.) – वय असूनही व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न तळमळीने करणारे अन् सतत गुरुस्मरणात रहाणारे येथील सनातनचे साधक श्री. शेषेराव सुस्कर (वय ६१ वर्षे) हे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले आहेत, अशी आनंदवार्ता सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी २४.८.२०२१ या दिवशी एका ‘ऑनलाईन’ सत्संगात दिली. या सत्संगात ६९ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. दीपाली मतकर यांच्यासह बीड जिल्ह्यातील अन्य साधकही ‘ऑनलाईन’ सहभागी झाले होते. या आनंदवार्तेने सर्वांचाच आनंद द्विगुणित झाला. या वेळी श्री. शेषेराव सुस्कर यांचा सत्कार सनातनच्या साधिका सौ. साधना हुंबे (देशमुख) यांनी त्यांच्या निवासस्थानी भेटवस्तू देऊन केला. या ‘ऑनलाईन’ सत्संगामध्ये सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, कु. दीपाली मतकर आणि अन्य साधक यांनी श्री. शेषेराव सुस्कर यांची गुणवैशिष्ट्ये सांगितली.

साधनेसाठी आवश्यक गुण आत्मसात् करण्यासह ध्येय घेऊन प्रयत्न करा ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

श्री. शेषेराव सुस्कर यांनी तीव्र तळमळीने आणि चिकाटीने सेवा केली आहे. त्यांची ‘सनातन प्रभात’च्या अनेक वाचकांशी चांगली जवळीक आहे. गेल्या १० वर्षांपासून त्यांनी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा नियमितपणे मनापासून केली आहे. गेल्या काही मासांपासून त्यांनी ध्येय घेऊन व्यष्टी साधनेची घडी बसवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. व्यष्टी साधना चांगली झाली की, आनंद घेता येतो. चिकाटीने साधनेचे प्रयत्न केल्याने त्यांची प्रगती झाली आहे. त्यामुळे साधकांनी साधनेसाठी आवश्यक गुण आत्मसात् करण्यासह ध्येय घेऊन प्रयत्न करायला हवेत.

श्री. शेषेराव सुस्कर यांचा सत्कार करतांना सौ. साधना हुंबे (देशमुख)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच माझ्याकडून प्रयत्न करवून घेतले ! – शेषेराव सुस्कर

गुरुकृपेनेच मला साधना समजली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेनेच मला हा आनंद मिळाला. त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता ! परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच माझ्याकडून प्रयत्न करवून घेतले आहेत.

शेषेराव सुस्कर यांची व्यष्टी साधना आणि समष्टी सेवा करण्याची तळमळ पुष्कळ ! – कु. दीपाली मतकर

कु. दीपाली मतकर

श्री. शेषेराव सुस्कर यांची व्यष्टी साधना आणि समष्टी सेवा करण्याची तळमळ पुष्कळ आहे. त्यांच्या सेवेत कधीच खंड नसतो. मागील काही मासांपासून त्यांनी भावाच्या स्तरावर साधना करण्यासाठी प्रयत्न वाढवले आहेत. कोणताही कठीण प्रसंग आल्यास तो ते स्थिर राहून स्वीकारतात.