संतप्त चीनची अमेरिकेवर टीका
चोराच्या उलट्या बोंबा ! – संपादक
बीजिंग (चीन) – अमेरिकेच्या गुप्तहेर विभागाने कोरोना विषाणूचा उगम कुठून झाला, याच्या केलेल्या पडताळणीचा अहवाल राष्ट्राध्यक्षांना सादर केला आहे. हा अहवाल पूर्ण नसून चीनच्या असहकार्यामुळे त्याचा उगम यात स्पष्ट करण्यात आलेला नाही. हा अहवाल सध्या गोपनीय आहे; मात्र भविष्यात तो उघड केला जाण्याची शक्यता आहे.
कोरोना वायरस की उत्पत्ति को लेकर अमेरिका की खुफिया रिपोर्ट जारी होने से पहले चीन ने बुधवार को आक्रामक रुख अपना लिया. https://t.co/INDUegiE34
— @HindiNews18 (@HindiNews18) August 25, 2021
कोरोनाचा उगम हा प्राण्यांद्वारे झाला कि प्रयोगशाळेतून या दोन शक्यतांवर ही चौकशी करण्यात आली होती. अमेरिकेला ९० दिवसांच्या चौकशीत यावर ठोस निष्कर्ष काढता आलेला नाही; मात्र या अहवालावरून चीनने टीका केली आहे. ‘चीनवर दोष ढकलण्यासाठी कोरोनाच्या सूत्राचे राजकारण केले जात आहे. अमेरिकेने आरोप चालूच ठेवले तर चीनच्या प्रत्युत्तराचीही सिद्धता अमेरिकेने ठेवावी’, अशी चेतावणी चीनने अमेरिकाला दिली आहे.
अमेरिकेच्या प्रयोगशाळेचीही चौकशी करावी ! – चीन
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे महासंचालक फू कुंग म्हणाले की, चीनचा बळी देऊन अमेरिकेला मोकळे होता येणार नाही. ‘विषाणूचा उगम प्रयोगशाळेतून झाला’ असे अन्य देशांचे म्हणणे असेल, तर जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने अमेरिकेच्या मेरीलँड येथील फोर्ट डेट्रिक प्रयोगशाळेलाही भेट द्यावी. या प्रयोगशाळेतही कोरोना विषाणूंवर अभ्यास चालू आहे.
कोरोनाचा उगम चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेत झाला आणि तेथूनच विषाणू पसरल्याचा आरोप अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता, तर चीनने हे आरोप फेटाळून लावले होते. बायडेन राष्ट्राध्यक्ष झाल्यावर त्यांनी ‘कोरोना विषाणूचा उगम कसा झाला ?’ ‘प्रयोगशाळेत हा विषाणू सिद्ध करण्यात आला का ?’ आदींविषयी चौकशी करण्याचा आदेश दिला होता.