‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या इयत्ता ७ वीच्या पाठ्यपुस्तकात वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रकारांचा उल्लेख !

लिखाण आक्षेपार्ह असल्याचे सांगून राष्ट्रीय तंबाखू निर्मूलन संघटना आणि भारतीय वैद्यकीय संघटनेचे गोवा विभाग यांचा विरोध

‘एन्.सी.ई.आर्.टी.’ने पाठ्यपुस्तकांतून इतिहासाचीही मोडतोड केली आहे. आधुनिक वैद्यांमध्ये किंवा त्यांच्या संघटनांमध्ये स्वतःच्या व्यवसायाविषयी जशी जागृती आहे, तशी राष्ट्र आणि धर्म यांविषयीही हवी ! – संपादक 

एन्.सी.ई.आर्.टी. चे पुस्तक ‘सोशल आणि पॉलिटीकल लाईफ-२’

पणजी, २५ ऑगस्ट (वार्ता.) – ‘राष्ट्रीय शैक्षणिक, संशोधन आणि प्रशिक्षण मंडळ’ (‘एन्.सी.ई.आर्.टी.’)च्या ७ वी इयत्तेतील ‘सोशल आणि पॉलिटीकल लाईफ-२’ या नवीन पाठ्यपुस्तकात आधुनिक वैद्यांना अपकीर्त करणार्‍या लिखाणाचा समावेश करण्यात आल्याने याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटत आहेत. या लिखाणाला तंबाखू निर्मूलन संघटना  आणि भारतीय वैद्यकीय संघटनेचा गोवा विभाग यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. याविषयी तंबाखू निर्मूलन संघटनेचे अध्यक्ष तथा भारतीय वैद्यकीय संघटनेच्या गोवा विभागाचे माजी प्रमुख डॉ. शेखर साळकर म्हणाले, ‘‘संबंधित आक्षेपार्ह लिखाण असलेला धडा पाठ्यपुस्तकातून वगळावा, अशी मागणी शिक्षण संचालकांकडे करण्यात येणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात अशा आक्षेपार्ह लिखाणाचा समावेश करण्यास माझा तीव्र आक्षेप आहे. या लिखाणाविषयी आम्ही शासन आणि शिक्षण खाते यांच्याकडे आक्षेप नोंदवला आहे. किमान गोव्यातील पाठ्यपुस्तकातून हे आक्षेपार्ह लिखाण वगळले गेले पाहिजे.’’
याविषयी अन्य आधुनिक डॉक्टरांनी प्रसारमाध्यमांकडे पुढील प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
१. पाठ्यपुस्तकात खासगी आधुनिक वैद्यांना (डॉक्टरांना) लक्ष्य करायला नको होते.
२. प्रत्येक क्षेत्रात चांगले-वाईट असते, मग केवळ आधुनिक वैद्यांना लक्ष्य का केले जाते ?
३. पाठ्यपुस्तकात पुराव्यानिशी माहिती छापणे आवश्यक असते.
४. हे लिखाण कुणी लिहिले ? त्याला अनुमती कुणी दिली ? आणि ते पाठ्यपुस्तकात प्रसिद्ध कसे झाले ? याविषयी सखोल अन्वेषण होणे आवश्यक आहे. लहान मुलांना असे शिकवणे चुकीचे आहे. आधुनिक वैद्यांना अपकीर्त करण्याचा हा प्रकार आहे. यामुळे मुलांमध्ये आधुनिक वैद्यांविषयी चुकीची भावना निर्माण होणार.’’

पाठ्यपुस्तकातील आक्षेपार्ह लिखाण

अधिक पैसे कमावण्यासाठी काही खासगी सेवा देणारे आधुनिक वैद्य अयोग्य कृती करतात. या वेळी अल्प खर्चाचा पर्याय उपलब्ध असतांनाही त्याचा वापर केला जात नाही. उदाहरणार्थ गोळ्या किंवा स्वस्तात औषध उपलब्ध असतांना आधुनिक वैद्य अनावश्यक औषधे, इंजेक्शन किंवा ‘सलाईन बॉटल’ यांचा वापर करण्यासाठी सांगत असल्याचे आपण सर्रासपणे पहातो.

पाठ्यपुस्तकातील आक्षेपार्ह भाग विद्यालयांनी शिकवू नये ! – मनोज सावईकर, शिक्षण संचालक

सातवी इयत्तेतील समाजशास्त्र पुस्तकातील खासगी वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रकाराविषयीचा वादग्रस्त भाग विद्यालयांनी शिकवू नये, अशा आशयाचा आदेश लवकरच प्रसिद्ध केला जाणार आहे, असे आश्वासन शिक्षण संचालक मनोज सावईकर यांनी ‘भारतीय वैद्यकीय संघटने’च्या (‘आय.एम्.ए.’च्या) गोवा विभागाला दिले. ‘आय.एम्.ए.’च्या गोवा शाखेचे अध्यक्ष डॉ. विनायक बुवाजी आणि डॉ. शेखर साळकर यांनी ७ वी इयत्तेतील आक्षेपार्ह लिखाणाविषयी नुकतीच शिक्षण संचालक मनोज सावईकर यांची भेट घेतली. या वेळी मनोज सावईकर यांनी हे आश्वासन दिले. ते पुढे म्हणाले, ‘‘सातवी इयत्तेतील समाजशास्त्र पुस्तक छापून सिद्ध झालेले असल्याने आता आक्षेपार्ह लिखाण गाळणे शक्य नाही. पुढील शैक्षणिक वर्षी पाठ्यपुस्तकात आवश्यक पालट केले जातील. यावर्षी हे आक्षेपार्ह लिखाण शिक्षकांनी शिकवू नये, तसेच यावर चर्चाही करू नये, असे परिपत्रक शिक्षण खाते प्रसिद्ध करणार आहे. शिक्षण खात्याच्या वतीने पुस्तकातील आक्षेपार्ह लिखाणाविषयी लेखी माहिती ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ला देण्यात येणार आहे.’’