सावंतवाडी – नारायण राणे यांना मंत्री करणे, ही भाजपची सर्वांत मोठी चूक होती. आतातरी भाजपने ही चूक सुधारावी आणि असे बेताल वागणार्या मंत्र्यांना त्यांच्या पदावरून दूर करावे, अशी प्रतिक्रिया माजी पालकमंत्री तथा माजी गृहराज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केली.
राजकारणाला एक विशिष्ट पातळी आहे. ती सोडून काही करू शकतो, असा राणे यांचा भ्रम होता. तो आता कायद्याने संपुष्टात आणला आहे. राणे यांच्यावर झालेली कारवाई अपेक्षित होती; कारण अशा पद्धतीने महाराष्ट्रात कुणी बोलत नाही. कोरोनाच्या संकटात महाराष्ट्रात चांगले काम होत असतांना राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी राणे यांनी सहस्रो लोकांचे जीव धोक्यात घालण्याचे काम केले आहे. महाराष्ट्र सरकार कोरोनावर करत असलेल्या उपाययोजनांविषयी गैरसमज पसरवले. ‘राणे यांनी मुख्यमंत्र्यांविषयी केलेल्या वक्तव्याशी सहमत नाही’, असे स्वतः माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आणि ठाकरे कुटुंबियांवर बोलल्यानंतर शिवसैनिक गप्प बसणार नाहीत, हे नारायण राणे यांना ठाऊक होते. असे असतांनाही त्यांनी जाणीवपूर्वक वक्तव्य केले आणि समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असे आमदार केसरकर यांनी सांगितले.