राज ठाकरे यांच्याकडून अद्याप कारवाई नाही !
नवी मुंबई, २४ ऑगस्ट – नवी मुंबईचे मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या पत्नी संजीवनी काळे यांनी त्यांच्या विरुद्ध मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्याकडे तक्रार करून ‘न्याय मिळावा’, अशी मागणी केली आहे. हे प्रकरण मागील १० दिवसांपासून प्रसारमाध्यमांत गाजत आहे. यामुळे नवी मुंबईमध्ये मनसेची प्रतिमा अत्यंत मलीन होऊनही मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अद्याप गजानन काळे यांची पक्षातून हकालपट्टी केली नाही. संजीवनी काळे यांच्या तक्रारीवरून गजानन काळे हे जातीवाचक शिवीगाळ आणि मानसिक छळ करत असल्याचा गुन्हा पोलिसांनी नोंदवला आहे. गुन्हा नोंदवून आणि शर्मिला ठाकरे यांच्याकडे तक्रार करूनही अद्याप फरार काळे यांना अटक करण्यात आलेली नाही. काळे यांनी मनसेच्या नावाखाली ४ कार्यकर्त्यांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात भ्रष्ट मार्गाने संपत्ती गोळा केल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा पत्रकार परिषदेत केला होता. यामध्ये नवी मुंबई महापालिकेच्या काही विभागांचा उल्लेख केला होता; मात्र या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग किंवा अन्य कोणतीही अन्वेषण यंत्रणा यांनी सुमोटो तक्रार प्रविष्ट करून पडताळणी चालू केली नाही किंवा महापालिकेच्या आयुक्तांनीही अद्याप संबंधित विभागाच्या अधिकार्यांना पडताळणीचे आदेश दिले नाहीत.