साधकांतील अहंच्या पैलूंचे अचूक निरीक्षण करून त्यांना अहं निर्मूलन प्रक्रिया सोपी करून सांगणार्‍या पू. (सौ.) अश्विनी पवार !

‘देवद आश्रमातील सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार यांना गुरुदेवांना अपेक्षित अशी साधकांची व्यष्टी साधना व्हावी’, याची पुष्कळ तळमळ आहे. ‘साधकाला त्याचे स्वभावदोष आणि अहं यांचे सर्व पैलू समजावेत’, याकडे त्यांचे कटाक्षाने लक्ष असते. सत्संगात साधकांनी केवळ स्वभावदोष किंवा अहं यांचे पैलू सांगितले आणि झाले, असे त्या कधीच करत नाहीत. याचे कारण केवळ स्वभावदोष किंवा अहंचा पैलू समजून तो घालवण्यासाठी प्रयत्न करता येत नाहीत, तर ‘त्यामागील अन्य अयोग्य विचार कोणते आहेत ?’, ते समजल्यावरच त्यांची खोली समजते. ‘त्यानुसार कसे आणि किती प्रयत्न करायला हवेत ?’, हे लक्षात येते. या दृष्टीने त्या साधकाचे अंतर्बाह्य निरीक्षण करून त्याला सर्वांगाने साहाय्य करतात. पू. अश्विनीताईंनी सत्संग घेतल्यानंतर प्रयत्नांची दिशा सुस्पष्ट होते. पू. अश्विनीताई साधकांना त्यांच्या लक्षात न आलेले अहंचे पैलू सांगून कसे साहाय्य करतात ? हे पुढील काही उदाहरणांतून लक्षात येईल.

पू. (सौ.) अश्‍विनी पवार

१. प्रतिमा जपणे

१ अ. साधकाने ‘प्रतिमा जपणे’ या अहंच्या पैलूवर अनेक दिवसांपासून प्रयत्न करूनही अपेक्षित पालट न होणे : एका साधकामध्ये ‘प्रतिमा जपणे’ हा अहंचा पैलू तीव्र होता. त्या पैलूवर तो साधक अनेक दिवसांपासून प्रयत्नही करत होता; परंतु त्याच्यात अपेक्षित पालट होत नव्हता. ‘प्रतिमा जपणे’ यामध्ये प्रसंगानुरूप चुका न स्वीकारणे, चुका प्रांजळपणे न सांगणे, ही लक्षणे त्याच्या लक्षात येत होती; परंतु अन्य लक्षणे लक्षात येत नव्हती. त्यामुळे काही प्रमाणात प्रयत्न झाले, तरी त्याच्याकडून अपेक्षित प्रयत्न होत नव्हते.

१ अ १. पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी लक्षात आणून दिलेले साधकातील अहंचे अन्य पैलू

अ. साधकाचे वय २४ वर्षे आहे; परंतु तो २४ वर्षांच्या मुलाप्रमाणे न वागता ४० वर्षांच्या प्रौढ व्यक्तीप्रमाणे वागत आहे. त्याने त्याच्या मनात स्वतःची एक वेगळी प्रतिमा निर्माण करून ठेवली आहे. त्यामुळे त्याचे वागणे मोठ्या माणसांप्रमाणे होते. त्याचे चालणे, बसणे आणि बोलणे यांची पद्धत एका साच्यात बसवल्याप्रमाणे मोठ्या माणसासारखी होती.

आ. एखादा प्रश्न विचारल्यानंतर त्याचे १ – २ वाक्यात नेमकेपणाने उत्तर न देता त्याच्याकडून अनेक शब्दांचा वापर करून तेच पुनःपुन्हा सांगितले जात होते. साधक त्याच्या चुकीविषयी बोलत असतांना ‘तो स्पष्टीकरण देत आहे’, एवढेच लक्षात येत होते; परंतु त्यामागेही ‘मी इतरांपेक्षा वेगळा आहे’, हे दाखवण्याचा भाग होता. ‘साधक मोठ्या व्यक्तींप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करत आहे’, हे लक्षात येत नव्हते. पू. अश्विनीताईंनी त्याविषयी स्पष्ट करून सांगितले.

इ. तो साधक स्वतःला इतरांपेक्षा वेगळा समजत होता. ‘त्याचे अस्तित्व वेगळे होत आहे’, याची त्याला जाणीवही नव्हती. पू. अश्विनीताईंनी सांगितलेल्या निरीक्षणातून प्रसंगानुरूप केवळ ‘प्रतिमा जपणे’ असा अहंचा पैलू लक्षात घेऊन न थांबता ‘मनात अन्य कोणते विचार आहेत ? अहंचे प्रकटीकरण कोणकोणत्या लक्षणांमधून होते ?’, याचे निरीक्षण करून ‘त्या पैलूची खोली समजून घेणे किती आवश्यक आहे’, हे सर्वांच्याच लक्षात आले.

१ आ. एका साधिकेतील ‘प्रतिमा जपणे’ या अहंच्या पैलूची तीव्रता : अन्य एका साधिकेमध्येही ‘प्रतिमा जपणे’ या अहंच्या पैलूची तीव्रता अधिक होती. नेहमीच्या पैलूंप्रमाणे चूक न स्वीकारणे, स्वतः इतरांपेक्षा वेगळी आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करणे, यांसह तिच्यामध्ये पुढील लक्षणेही होती.

१ आ १. पू. अश्विनीताईंनी लक्षात आणून दिलेले साधिकेतील अहंचे अन्य पैलू

अ. प्रश्न विचारल्यानंतर लगेचच उत्तर न देता मोठ्या व्यक्तींप्रमाणे किंवा एखादा गंभीर प्रश्न विचारल्यावर जसे विचार करून उत्तर देतो, तसे हावभाव तिच्या तोंडवळ्यावर उमटत होते. एखादी व्यक्ती विचार करत असतांना जशी शून्यात पहाते, त्याप्रमाणे तिची दृष्टी असायची. ओठांच्या अनावश्यक हालचाली केल्या जात होत्या. (ती अविवाहित मुलगी असूनही तिचे वागणेही प्रौढ महिलेप्रमाणे होते.)

आ. तिच्यात चालतांना सहजता नव्हती. तिचे चालणे मोठ्या महिलांप्रमाणे जपून आणि साचेबद्ध होते.

इ. सेवेसाठी आल्यानंतरही ती सर्वांशी सहज बोलून प्रतिसाद न देता ‘आपल्याच विचारांत आहोत आणि स्वतःमध्ये पुष्कळ गांभीर्य आहे’, अशा पद्धतीने वागणे असायचे. प्रत्यक्षात त्या साधिकेत ‘गांभीर्य असणे’ हा गुण नव्हता; कारण तिच्याकडून सेवेत पुष्कळ चुका होत होत्या; परंतु तिचा ‘मी ‘सिन्सीअर’ आहे’ (मी साधना प्रामाणिकपणे करते), हा अहंयुक्त विचार असल्यामुळे बाह्य वागणे तसे होत होते.

ई. तिचा तोंडवळा सतत गंभीर असायचा. ‘अहंचे प्रकटीकरण अशा पद्धतीने होते’, हे त्या साधिकेच्या लक्षात आले नव्हते, तसेच ‘असे वागणे वयानुसार अनैसर्गिक असून साधनेच्या दृष्टीने अयोग्य आहे’, हेही तिला समजत नव्हते. केवळ पू. अश्विनीताईंमुळे ‘अहंयुक्त विचारांचा आपल्या वागण्या-बोलण्यावर कसा परिणाम होतो ?’, हे लक्षात आले.

वैद्या (कु.) माया पाटील

२. ‘मनमोकळेपणाने न बोलणे’ या अहंच्या पैलूविषयी पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी लक्षात आणून दिलेली सूत्रे

एका साधकामध्ये ‘मनमोकळेपणाने न बोलणे, इतरांमध्ये न मिसळणे’, या लक्षणांची तीव्रता अधिक होती, तसेच अहंची तीव्रताही पुष्कळ प्रमाणात होती; परंतु ‘मनमोकळेपणाने न बोलण्यामागे अहंचे कोणते विचार होते ?’, ते त्याच्या लक्षात येत नव्हते. याविषयी त्याला विचारल्यावर ‘इतरांशी काय बोलायचे ? हे लक्षात येत नाही’, एवढेच त्याचे चिंतन झालेले असायचे. त्यावर त्याला उपाययोजना सांगूनही त्याच्यात विशेष पालट होत नव्हता. त्याचे प्रयत्न एका टप्प्यापर्यंतच होत होते. काही प्रसंगांतील त्यांची विचारप्रक्रिया जाणून घेतल्यानंतर पू. अश्विनीताईंनी ‘त्यांच्या अहंचे प्रकटीकरण कशा पद्धतीने होते ?’, हे समजावून सांगितले.        

१. ‘सहसाधक अनौपचारिक बोलतात, म्हणजे ते वेळ वाया घालवतात. मी सतत सेवेत असतो. मी वेळ वाया घालवत नाही’, असे अहंयुक्त विचार त्याच्या मनात होते. या विचारांमुळे तो स्वतःला श्रेष्ठ समजत होता आणि इतरांमध्ये मिसळत नव्हता, तसेच सहसाधकांविषयी त्याच्या मनात पूर्वग्रहही निर्माण झाला होता. अहंच्या पैलूची तीव्रता अधिक असल्यामुळे ‘यातील योग्य-अयोग्य विचारायला हवे’, हेही त्याला समजत नव्हते.

२. स्वतःला श्रेष्ठ समजत असल्यामुळे त्याचे वागणे ‘रोबो’प्रमाणे झाले होते. ‘रोबो’ जसा ताठ चालतो, त्याच्या कोणत्याच कृतींमध्ये लवचिकता नसते, त्याप्रमाणे त्याच्या हालचाली साचेबद्ध पद्धतीने होत असत.

३. प्रसंग घडल्यावर मनामध्ये निर्माण झालेल्या भावभावना तो कधी प्रकट करत नव्हता. त्यामुळे त्याचा तोंडवळा नेहमी पुष्कळ गंभीर असायचा.

अशा रीतीने पू. अश्विनीताईंनी त्याचे विचार जाणून घेऊन आणि त्याचे वागणे यांचा संबंध लक्षात आणून देऊन अहंची तीव्रता दाखवून दिली. त्यांनी साधकाला ‘अहं निर्मूलनासाठी कठोर प्रयत्न केल्यावर गुरु कृपा करतात आणि अहं निर्मूलन होते’, असे सांगून त्याला आश्वस्त केले अन् प्रयत्नांसाठी प्रोत्साहन दिले.

३. अहं निर्मूलनाचे प्रयत्न करणे, साधनेत किती आवश्यक आहे, हे मनावर बिंबवण्यासाठी पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी सांगितलेली अनमोल सूत्रे !

अ. गुरुकार्य चांगले होण्यासाठी स्वतःच्या अहंचा त्याग करायला हवा. ‘अहं जोपासणे, हे ध्येय न ठेवता गुरुकार्य चांगले होणे’, हे ध्येय ठेवायला हवे.

आ. ‘स्वतःकडून चुका होऊ नयेत’, हा संकुचितपणाचा विचार झाला. त्याऐवजी ‘गुरुकार्यात चूक व्हायला नको’, असा व्यापक विचार हवा. व्यापक गुरूंचे व्यापक कार्य संकुचित मनाने करणे अयोग्य आहे.

इ. बुद्धीवरील अहंचे अावरण दूर झाल्याविना बुद्धीचा ईश्वरप्राप्तीसाठी त्याग होत नाही. बुद्धीवरील अहंचे आवरण नष्ट करून तिचे सद्सद्विवेकबुद्धी रूपांतर करायला हवे.

ई. सेवेचे दायित्व घेतल्यानंतर अहं निर्मूलन करण्याची प्रक्रिया व्हायला हवी. अहंवृद्धीची नको. यासाठी सतत शिकण्याच्या स्थितीत रहायला हवे. दायित्व म्हणजे गुणवृद्धी आणि अहं निर्मूलन प्रक्रिया होय.

उ. अहंला तळहाताच्या फोडाप्रमाणे न जपता त्याचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न केल्यास ईश्वरप्राप्ती लवकर होते.

‘काय जपायचे आणि कशाचे निर्मूलन करायचे ?’, हे समजायला हवे.

ऊ. ‘अहं असेल, तर ईश्वरप्राप्ती होणार नाही’, याची जाणीव प्रत्येक प्रसंगात किंवा प्रत्येक कृती करतांना व्हायला हवी.

ए. अहं निर्मूलनाचे प्रयत्न क्षणोक्षणी करायला हवेत, तरच त्याचे निर्मूलन होते, अन्यथा ‘कधी अहंवृद्धी होईल ?’, हे सांगता येत नाही.

ऐ. आपल्यातील स्वभावदोष आणि अहं यांमुळे गुरूंना अपेक्षित अशी सेवा होत नाही.

४. अहं निर्मूलनाचे प्रयत्न तळमळीने करणार्‍या पू. (सौ.) अश्विनी पवार !

माझा या वर्षात सेवेनिमित्त पू. (सौ.) अश्विनीताईंशी संपर्क अधिक प्रमाणात आला. ‘त्या अहं निर्मूलनाचे प्रयत्न तळमळीने करतात’, असे लक्षात आले.

अ. त्यांच्याकडून एखादे सूत्र नियोजित वेळेत सांगितले गेले नाही, तर त्या स्वतःची चूक प्रांजळपणे सांगतात. अनेक वेळा ते सूत्र सहसाधकांकडून त्यांच्यापर्यंत पोचलेही नसते, तरी त्या चुकीचे दायित्व घेतात.

आ. सत्संगात साधक चूक न स्वीकारता स्पष्टीकरण देत असतील किंवा एखादे सूत्र विचारल्यावर पुनःपुन्हा सांगूनही योग्य पद्धतीने उत्तर देत नसतील, तरीही त्या स्थिर राहून त्या साधकाला वेगवेगळ्या पद्धतीने समजेल, असे सांगतात.

इ. साधकाकडून एखादी चूक झाली, तरी त्या साधकाला चूक शांतपणे सांगतात. त्यात कुठेही इतरांना न्यून लेखणे, असे नसते. त्यात ‘मला अधिक कळते, अधिकारवाणी’, या अहंच्या पैलूंचा स्पर्शही नसतो.

ई. त्यांना वैद्यकीय क्षेत्राचे ज्ञान नाही. त्या त्यातील सर्व बारकावे गांभीर्याने समजून घेतात. त्या शिकण्याच्या स्थितीत राहून जाणून घेतात. त्या त्यातील शंकाही प्रतिमा न जपता मोकळेपणाने विचारतात.

उ. त्या सत्संगात शांत आणि स्थिर असतात. ‘त्या अनुसंधानात आहेत’, असे जाणवते.

ऊ. त्या मोजकेच बोलतात. त्यातून सर्व समजते. ‘एखादे सूत्र सुटले आहे’, असे होत नाही. त्या आवश्यक असेल, त्या वेळीच उदाहरण देतात किंवा अन्य सूत्रे सांगतात. ‘त्यांच्या वाणीतील चैतन्यात वाढ झाली आहे’, असे जाणवते.

पू. अश्विनीताई करत असलेले अहं निर्मूलनाचे प्रयत्न समजणेही कठीण आहे; कारण ती प्रक्रिया सूक्ष्म स्तरावरील असून माझ्या अल्प बुद्धीला समजणे कठीण आहे. गुरुदेवांच्या कृपेने जे समजले, ते त्यांच्याच चरणी अर्पण करते.

५. साधकांना अहंच्या पैलूंविषयी जाणीव करून देऊन त्यांची व्यष्टी साधना गतीमान होण्यासाठी प्रयत्नरत असणार्‍या पू. (सौ.) अश्विनी पवार !

अशा प्रकारे पू. (सौ.) अश्विनीताई साधकांना त्यांच्यातील अहंच्या पैलूंचे प्रकटीकरण वेगवेगळ्या पद्धतीने कसे होते ? याचे आणि त्यामुळे त्यांची वागण्यातील सहजता निघून गेल्याचे लक्षात आणून देत होत्या. त्यांच्या या निरीक्षणामुळे अहंच्या तीव्रतेची जाणीव प्रकर्षाने होत होती, तसेच ‘कोणकोणत्या स्तरांवर प्रयत्न करायला हवेत’, हेही लक्षात येत होते. ‘केवळ संतच अशा प्रकारे निरीक्षण करून साधकांना साधनेत साहाय्य करू शकतात’, असे मला जाणवले. साधकांची व्यष्टी साधना गतीमान होण्यासाठी गुरुदेवांनी संतांचा सत्संग दिला आहे. त्यासाठी श्रीकृष्ण आणि गुरुदेव यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

‘आम्हा सर्व साधकांना पू. (सौ.) अश्विनीताईंचा साधनेच्या दृष्टीने लाभ करुन घेता येऊ दे’, अशी श्रीकृष्ण आणि गुरुदेव यांच्या चरणी कळकळीची प्रार्थना !’

– वैद्या (कु.) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.१२.२०२०)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.