प्रेमळ आणि आनंदाने सेवा करणारे ओरोस (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. कृष्णा मळीक (वय ७८ वर्षे) !

आषाढ कृष्ण पक्ष प्रतिपदा (२४.७.२०२१) या दिवशी श्री. कृष्णा मळीक (वय ७८ वर्षे) यांचे निधन झाले. श्रावण कृष्ण पक्ष प्रतिपदा (२३.८.२०२१) या दिवशी त्यांचे मासिक श्राद्ध आहे. त्या निमित्त त्यांच्या समवेत सेवा करणार्‍या साधिका श्रीमती जयश्री सुर्वे यांना कै. मळीककाका यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे आणि सहसाधक श्री. सुरेश दाभोलकर यांनी कै. कृष्णा मळीक यांना अर्पण केलेली शब्दसुमनांजली येथे दिली आहे.

कै. कृष्णा मळीक

श्रीमती जयश्री सुर्वे, डिगस, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग.

१. मळीककाका फार प्रेमळ होते.

२. सर्व विज्ञापनदाते आणि अर्पणदाते यांच्याशी प्रेमाने बोलून त्यांच्याशी जवळीक साधून त्यांना साधना सांगणे

ओरोस (जिल्हा सिंधुदुर्ग) बाजारपेठेतील सर्व जण कै. मळीककाकांना ओळखायचे. काका पेठेत गेले की, हसून तेथील प्रत्येकाची विचारपूस करायचे. त्यांची त्या सगळ्यांशी जवळीक होती. पेठेतील प्रत्येक जण त्यांना शक्य असेल, तसे विज्ञापन किंवा अर्पण द्यायचे. काका त्यांना साधनाही सांगायचे. त्यांच्या समवेत सेवेला गेल्यावर आम्ही आनंद अनुभवायचो.

३. प्रत्येक सेवा आनंदाने आणि परिपूर्ण करणे

पूर्वी आम्ही एकत्र सेवा करायचो. त्यांना कुठलीही सेवा सांगितली, तरी ते ‘मला जमणार नाही’, असे सांगायचे नाहीत. ते त्यांना दिलेली सेवा आनंदाने परिपूर्ण करायचे.

‘कै. मळीककाका यांची पुढील साधना चालू राहून त्यांची आध्यात्मिक प्रगती होऊ दे’, अशी प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) चरणी प्रार्थना करते.’ (२६.७.२०२१)


शांती लाभो तव आत्म्याला हीच माझी मती ।

कै. कृष्णा मळीक यांच्या मासिक श्राद्धानिमित्त त्यांचे सहसाधक श्री. सुरेश दाभोलकर यांनी यांना अर्पण केलेली शब्दसुमनांजली !

अशी पाखरे येती, आणिक प्रीती लावूनी जाती ।
दोन जिवांचे नाते जुळले, आठवणी मागे रहाती ।
ईश्वरचरणी लीन होऊनी गुरुचरणी जाती ।
शांती लाभो तव आत्म्याला हीच माझी मती ।। १ ।।

ईश्वरचरणी लीन होऊनी केली सेवा-साधना ।
त्या गुणांनी सेवा करण्या प्रवृत्त केले मला ।
त्यांनीच मस्तकी टिळा लावण्याचा छंद मला लावला ।
सेवा-साधना करण्याची प्रेरणा दिली आम्हाला ।। २ ।।

नाते जोडिले सर्व प्रकारे माया केली मातेप्रमाणे ।
कौटुंबिक गोष्टींसाठी दिला आधार वडिलांप्रमाणे ।
वडील म्हणू कि भाऊ, असे तुमचे वागणे ।
कधी साधकाप्रमाणे, तर कधी मित्राप्रमाणे ।। ३ ।।

गुरुच देती तुमच्या जीवनाला आधार ।
नाही कष्ट दिले कुणा गुरुच वहाती सर्व भार ।
गुरु-शिष्य हीच परंपरा दाखवून दिली आजवर ।
कलियुगी साधना करा मंत्र रुजवला खोलवर ।। ४ ।।

कै. कृष्णा मळीककाकांना भावपूर्ण नमस्कार करतो आणि गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करतो.

श्री. सुरेश दाभोलकर, ओरोस, जिल्हा सिंधुदुर्ग. (३०.७.२०२१)