श्रावण पौर्णिमा (नारळी पौर्णिमा)

१. समुद्राचे पूजन

श्रावण पौर्णिमेला समुद्रकिनारी रहाणारे लोक वरुणदेवतेप्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक आहे, तसेच ते सर्जनशक्तीचेही प्रतीक मानलेले आहे.

नदीपेक्षा संगम आणि संगमापेक्षा सागर अधिक पवित्र आहे. ‘सागरे सर्व तीर्थानि’ असे वचन आहे. सागराची पूजा म्हणजेच वरुणदेवतेची पूजा. जहाजांनी मालाची वाहतूक करतांना वरुणदेव प्रसन्न असल्यास तो साहाय्य करतो.

२. श्रावणी

अ. तिथी : ‘श्रावणातील पौर्णिमेला त्याच दिवशी श्रवण नक्षत्र असल्यास हा वैदिक विधी करायचा असतो.

आ. विधी करण्याची पद्धत : श्रावण पौर्णिमेस श्रवण नक्षत्र आल्यास त्या दिवशी किंवा नागपंचमीला हस्त नक्षत्रावर ऋग्वेदी लोकांनी, यजुर्वेद्यांनी श्रावण पौर्णिमेला, सामवेद्यांनी भाद्रपदातील हस्त नक्षत्रात आणि श्रावण किंवा भाद्रपद पौर्णिमेला अथर्ववेद्यांनी हा विधी करावा. श्रावणी निरनिराळ्या वेदांच्या लोकांनी आपापल्या गृह्यसूत्रांनुसार श्रावणी करायची असते.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र’)