पुणे – वर्ष १९९९ च्या आधीपासून जाती होत्या. पण राष्ट्रवादी काँग्रेस आल्यानंतर जातींमधील द्वेष वाढला. शरद पवार यांनी एका मुलाखतीमध्ये ‘महाराष्ट्राला एकत्र आणण्याचा केंद्रबिंदू छत्रपती शिवाजी महाराज आहेत’, असे म्हटले होते. मग त्यांच्या भाषणाचा अथवा पक्षाच्या भूमिकेचा आरंभ ‘शाहू, फुले, आंबेडकर’ याने का होतो ? मूळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या उल्लेखाने का होत नाही ?, असा थेट प्रश्न विचारत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जातीच्या राजकारणाला पुन्हा अधोरेखित केले. शहरातील पत्रकार परिषदेला संबोधित करतांना त्यांनी शरद पवार यांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तर दिले.
राज ठाकरे पुढे म्हणाले की,
१. बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडे जातांना ‘ते ब्राह्मण आहेत, असा विचार ठेवून जात नाही, तर ते इतिहास संशोधक आहेत’, या विचाराने त्यांच्याकडे जातो. शरद पवार यांनाही मराठा म्हणून भेटत नाही. या जातीपातीच्या जोखडातून बाहेर पडायला हवे. प्रबोधनकार ठाकरे तुम्हाला परवडणारे नाहीत. प्रबोधनकार ठाकरे यांना १०० टक्के कृतीत आणा आणि मग तुम्हाला तुमची जागा कळेल.
२. चुकीचा इतिहास लिहिला गेला असेल, तर तो कोणता हे पुढे आणावे. वर्ष १९५० मध्ये पहिली आवृत्ती आली, तेव्हा मात्र कुणी पुढे आले नाही. राजकारण्यांचे दलाल लोकांची माथी भडकावण्याची कामे करतात.
३. नरेंद्र मोदी हे विकासाच्या सूत्रावर पंतप्रधान झाले. धर्माविषयीचे वातावरण आधीपासून होते. आता जातीविषयीचे वातावरण सिद्ध करण्यात येत आहे. निवडणुकीसाठी जातीच्या राजकारणाचा उपयोग केल्यावर निवडणुकीच्या नंतरचे परिणाम अतिशय भयानक असतील.