बुलढाणा – जिल्ह्यातील तढेगाव येथे समृद्धी महामार्गावर काम करणार्या कामगारांना घेऊन जाणारा डंपर तढेगाव फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला उलटून झालेल्या भीषण अपघातात १३ कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून ३ जण गंभीर घायाळ झाले आहेत. ही घटना २० ऑगस्ट या दिवशी दुपारी १२.३० वाजता घडली. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. गंभीर घायाळ झालेल्या ३ रुग्णांवर सिंदखेडराजा येथील प्राथमिक उपचार केंद्रात उपचार चालू आहेत.
सिंदखेडराजा-मेहकर महामार्गावर बसला बाजू देत असतांना रस्त्याच्या बाजूला उभा केलेला डंपर पावसामुळे रस्ता खचून कलंडला. त्यामुळे टिप्परच्या मागच्या भागात लोखंडी बारवर बसलेले १६ जण त्याखाली दबले गेले. यातील १३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतील मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. हे सर्व कामगार समृद्धी महामार्गाच्या कामासाठी मध्यप्रदेशातील खरगोन येथून आलेले होते. वाचलेल्या तिघांमध्ये पाच वर्षीय मुलीचा समावेश आहे.