‘बालसंस्कार’ संकेतस्थळावरून स्वातंत्र्यदिनानिमित्त राबवण्यात आली ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषा ! 

हिंदु जनजागृती समितीचा उपक्रम

मराठी, हिंदी, कन्नड आणि इंग्रजी भाषिक ७ सहस्रांहून अधिक जिज्ञासूंचा उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

मुंबई – विद्यार्थ्यांना राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांचा इतिहास लक्षात यावा, तसेच त्यांनी केलेला पराक्रम अन् शौर्य समजावे, यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘बालसंस्कार’ या संकेतस्थळावरून स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषा उपक्रम घेण्यात आला. ही प्रश्नमंजुषा मराठी, हिंदी, कन्नड आणि इंग्रजी या भाषांमध्ये घेण्यात आली. यामध्ये राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांच्याविषयी ज्ञान वाढावे, यासाठी २५ प्रश्न देण्यात आले होते. विद्यार्थ्यांसह युवा पिढीमध्ये देशासाठी बलीदान देणार्‍या क्रांतीकारकांचा आदर्श ठेवून राष्ट्राप्रती प्रेम निर्माण व्हावे, हाच या प्रश्नमंजुषा उपक्रमाचा उद्देश होता. समितीच्या वतीने नव्यानेच घेण्यात आलेल्या या उपक्रमाला समाजातील जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यामध्ये ‘इंग्रजांविरुद्ध धैर्य, उत्साह त्याचप्रमाणे कुशलतापूर्वक लढणारी कर्नाटकच्या कित्तूर संस्थानची पराक्रमी राणी कोण ?’, ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आजादी दूंगा’, हे घोषवाक्य कोणाचे आहे ?’, ‘पुण्यामध्ये प्लेग पीडित रुग्णांवर उपचार करण्याच्या नावावर अत्याचाराचा हैदोस घालणार्‍या अत्यंत क्रूर इंग्रज अधिकारी रँडचा वध कुणी केला ?’, असे विविध प्रश्न विचारण्यात आले होते. मराठी प्रश्नमंजुषा ६ सहस्रांहून अधिक जणांनी सोडवली, तर हिंदी प्रश्नमंजुषा १ सहस्रांहून अधिक जणांनी सोडवली. कन्नड प्रश्नमंजुषा ३१७ हून अधिक जणांनी सोडवली, तर इंग्रजी प्रश्नमंजुषा ३८० हून अधिक जणांनी सोडवली आहे. यामध्ये एकूण ६०० हून अधिक जणांना २५ पैकी २५ गुण मिळाले आहेत.

प्रश्नमंजुषा सोडवून पूर्ण झाल्यानंतर ती ‘Submit’ केली असता दिलेल्या प्रश्नांची उत्तरे योग्य किंवा अयोग्य आहेत हेही दिसत होते. त्यामुळे प्रश्नमंजुषेमध्ये दिलेली उत्तरे चुकली असल्यास योग्य उत्तर कोणते हेही जिज्ञासूंना लक्षात येत होते.